करोना महासाथीने मागील दोन वर्ष बंदिस्त केलेल्या समाजाला नववर्ष पालखी सोहळ्यानिमित्त आनंदी उत्साही वातावरण अनुभवता येणार आहे. टाळेबंदीच्या काळात कल्याण डोंबिवली शहर बंदिस्त झाले असताना कुटुंबीयांची पर्वा न करता वैद्यकीय, आरोग्य, सामाजिक कार्यातील अनेक करोना सेवक निस्पृह भावनेने रात्रंदिवस रुग्ण, सामाजिक कार्यात व्यस्त होते. अशा सेवकांचे नववर्षानिमित्त स्मरण करून समाजाने त्यांना सामूहिक सलाम करावा, या उद्देशाने यावेळी श्री गणेश मंदिर संस्थानने नववर्षाच्या पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्याचा जागर करण्याचा निर्णय घेतला आहे.
रक्तदान शिबिर, करोना प्रतिबंधीत लसीचे लसीकरण, नवीन आरोग्य केंद्रांची उभारणी, रुग्णालयांमध्ये २४ तास अखंड सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, कक्ष परिचर कर्मचारी, स्मशानभूमीत करोना रूग्णांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेणारे सामाजिक कार्यकर्ते, पार्थिव दहनासाठी अखंड सेवेत असलेले स्मशानभूमीतील पालिका कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, करोना काळात शहर स्वच्छतेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारे सफाई कामगार या सर्वांचा प्रातिनिधिक सन्मान पालखी सोहळ्यानिमित्त करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी सोमवारी (२८ मार्च) दिली.
करोना रुग्णांची संख्या घटली आहे. ही साथ ओसरत चालली आहे. दोन वर्ष आर्थिकदृष्ट्या आक्रसलेल्या हातांना काम मिळावे. प्रत्येक घराघरात नववर्ष आनंदाने साजरे व्हावे. ज्या कुटुंबीयांच्या घरातील कर्ते सदस्य, जिव्हाळ्याचे सदस्य गेले अशा कुटुंबियांच्या दुःखात समाजाने सहभागी व्हावे. त्या धक्क्यातून कुटुंबियांना बाहेर काढावे, हा पालखी सोहळा आयोजनामागील मुख्य उद्देश आहे, असे संस्थाचे अध्यक्ष दामले यांनी सांगितले. ढोल पथकांचा पालखी सोहळ्यातील सहभागाविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. याविषयी सोमवारी रात्री अंतिम निर्णय होणार आहे.
अमृतमहोत्सवी रांगोळ्या
भारताचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने पालखी सोहळ्याचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर मदन ठाकरे चौक ते अप्पा दातार चौक दरम्यान स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी संदेश देणाऱ्या ७५ रांगोळ्या संस्कार भारतीतर्फे काढण्यात येणार आहेत. ७५ कलाकार ८० किलो रंग आणि ३०० किलो रांगोळींच्या माध्यमातून रांगोळी चैत्र पाडव्याच्या दिवशी काढणार आहेत. डोंबिवलीतील राष्ट्र पुरुषांचे पुतळे, धर्मस्थळ यांच्यासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार आहेत.
पालखी मार्ग
चैत्र पाडव्याच्या दिवशी सकाळी पाच वाजता गणेश मंदिरात गणपतीची महापूजा होईल. सकाळी साडेसहा वाजता पालखी डोंबिवली पश्चिम येथील नाख्ये समूहाच्या पंडित दीनदयाळ रस्त्यावरील मारुती मंदिर येथे नेण्यात येईल. तेथे गुढी उभारण्यात येईल. मारुती मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. पंडित दीनदयाळ रस्ता कोपर पूल, टंडन रस्ता, डॉक्टर राजेंद्र प्रसाद रस्ता, फडके चौक, मानपाडा रस्ता, बाजीप्रभू चौक मार्गे पालखी फडके रस्त्याने गणेश मंदिराकडे येणार आहे.
हेही वाचा : ठाणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची कार्यालये बंद, उशीरा जाग आलेल्या प्रशासनाची कारवाई
“करोना प्रतिबंध नियम पालन करुन आणि पोलिसांच्या सहकार्याने पालखी सोहळा पार पडणार आहे. पालखी मंदिरात आल्यानंतर करोना सेवकांचा सन्मान केला जाईल. गणेश मंदिरात सकाळी आठ ते बारा या वेळेत रक्तदान शिबिर, अत्रे ग्रंथालय येथे करोना प्रतिबंधीत लसीचे शिबिर ठेवण्यात आले आहे. पालखी सोहळ्याच्या अग्रभागी सायकल व दुचाकी असतील,” अशी माहिती संयोजक राहुल दामले यांनी दिली.