फाल्गुन महिन्यातील शेवटचा रंगांचा सण असणारा धुलीवंदन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील बाजारपेठेत रंग, पिचकारी सारख्या वस्तूंनी सजली आहे. असे असले तरी यावर्षी रंग आणि पिचकारींच्या दरात सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने रंग, पिचकाऱ्यांचे दर वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे यावर्षी धुलीवंदन सण साजरा करण्यासाठी नागरिकांच्या खिशाला अधिकची कात्री बसणार आहे.
हेही वाचा >>>कळवा रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्तांची कारवाई
ठाण्यातील जांभळीनाका, गांवदेवी मंदिर बाजारपेठ, नौपाडा येथील बाजारपेठा या धुलिवंदनाच्या निमित्ताने रंगीबेरंगी रंग, पिचकाऱ्यांनी सजल्या आहेत. विविध आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पिचकाऱ्यांचे भाव वाढलेले आहेत. ५० रुपयांपासून ५०० रुपये किंमत असणाऱ्या पिचकाऱ्या देखील बाजारात आहेत. मात्र पिचकारीच्या किंमतीत ३० ते ४० रुपयांची वाढ झाली असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.
नैसर्गिक रंगाला मागणी असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग दिसून येत आहे. त्यामध्ये फिक्कट रंग तसेच गडद रंग देखील उपलब्ध आहेत. ठराविक वजनाचे प्लास्टिक वापरण्यावर बंदी असल्यामुळे यंदाच्या धुलिवंदनला दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या विक्रीसाठी ठेवत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाची होळी प्लास्टिक मुक्त करा हा संदेश विक्रेते स्वतः देत आहे.
इंधन दरवाढ आणि कच्चा मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे यंदा रंगांच्या आणि पिचकारीच्या किंमतीत वाढ झाली आहे. असे असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पिचकारी खरेदीसाठी ग्राहक उत्सुक आहे. – राजू यादव, विक्रेते.
वस्तू मागील वर्षाची किंमत यंदाची किंमत
पिचकारी ४०० रुपये ४५० रुपये
साधे रंग २० ते ७० रुपये किलो ३० ते ९० रुपये किलो
नैसर्गिक रंग ८० ते १९० रुपये किलो १०० ते २५० रुपये किलो