कल्याण – अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसरातील उसाटणे-नाऱ्हेण येथे २ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय कीर्तन महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागातून कीर्तनकार, वारकरी मंडळी या ठिकाणी येणार असल्याने मलंगगड, तळोजा भागात विशेष वाहनतळांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. प्रस्तावित केलेल्या या वाहनतळांवर वाहने उभी करण्यात यावीत, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
नाऱ्हेण येथे कीर्तन सभा मंडप आहे. या सभामंडपापर्यंत एकही वाहन येणार नाही याची काळजी प्रत्येक कीर्तनकार, वारकरी आणि वाहन चालकांनी घ्यायची आहे. २ जानेवारी ते ९ जानेवारीपर्यंत कीर्तनकार, वारकऱ्यांची वर्दळ वाढणार असल्याने कीर्तन सभा मंडपापर्यंतचा रस्ता वाहनांसाठी पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. वारकरी रोप वे मार्गाने पायी चलत मार्गाने सभा मंडपापर्यंत येतील. २ जानेवारी रोजी दिंडी मलंगवाडी येथून सभा मंडपार्यंत येणार आहे. त्यामुळे या दिवशी सर्व प्रकारच्या वाहनांना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत रविवारी मध्यरात्री अर्धा तास फटाके फोडण्याला परवानगी
कल्याण, भिवंडी, वाडा, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कर्जत, नेरळ, मुरबाड, शहापूर परिसरातून येणाऱ्या वारकऱ्यांनी आपली वाहने नेवाळी नाका, मलंगवाडी रस्त्याने जोशी निवास येथील वाहनतळ क्रमांक पाच येथे उभी करावीत. मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर, डहाणू, डायघर, मुंंब्रा, कळवा, काटई, शिळफाट भागातून येणाऱ्या वारकऱ्यांंनी आपली वाहने साई अमृत हाॅटेलमागे आणि उसाटणे पोलीस चौकीजवळील वाहनतळ क्रमांक दोन येथे उभी करावीत. पुणे, लोणावळा, जुन्नर, आळेफाटा, नगर, रायगड, अलिबाग, नवी मुंबई, उरण, कोकणातून येणाऱ्या वारकऱ्यांनी आपली वाहने तळोजा रस्त्यावरील ईएसआर रस्ता भागातील वाहनतळावर उभी करावीत.
हेही वाचा – ठाण्यात १९ आणि २३ वर्षांच्या तरूणांकडून रेव्ह पार्टीचे आयोजन; पाच महिलांसह ९५ जण ताब्यात
३ जानेवारी ते ९ जानेवारी कालावधीत कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, नेरळ, मुरबाड, शहापूर भागातून येणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने नेवाळीमार्गे येऊन करवले वाहनतळावर उभी करावीत, असे आवाहन कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ पोलिसांनी केले आहे.