शैक्षणिक संस्थेमधील बांधकाम अनधिकृत असून त्याबद्दल महापालिकेत तक्रार करण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. दिलीप साठे उर्फ दिलीप पाटील (२९) आणि विकास कांबळे (२३) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा >>>उल्हासनगर, अंबरनाथच्या उपजिल्हा रूग्णालयाची क्षमता वाढणार; आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
तक्रारदार यांची भिवंडी येथील नारपोली भागात शैक्षणिक संस्था असून त्यांच्या शाळेतील पाण्याच्या टाकीचे नुतणीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्याची माहिती दिलीप याला मिळाली होती. त्याने तक्रारदार यांना हे काम अनधिकृत असून महापालिकेकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या सचिवाला याची माहिती दिली, तसेच त्यांना दिलीप याला भेटण्यास सांगितले. सचिव हे दिलीप यांना भेटले असला त्याने अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा महापालिकेत तक्रार करण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
हेही वाचा >>>कल्याण डोंबिवलीतील वाढत्या घरफोड्यांनी नागरिक हैराण
याघटनेनंतर तक्रारदार यांनी पोलीस आयुक्तालयात यांसदर्भाची तक्रार दाखल केली. हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे येताच, त्यांनी तक्रारदार यांना संपर्क साधला. तसेच सापळा तयार करुन दिलीपला सचिवामार्फत पैसे घेण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ बोलावले. सोमवारी सायंकाळी दिलीप आणि त्याचा साथिदार विकास याला घेऊन स्थानकाजवळ आला असता, वेषांतर करून आलेल्या पोलिसांनी त्यांना एक लाख रुपयांची खंडणी घेताना हातोहात पकडले. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.