tv08प्रजासत्ताक दिन सोमवारी आल्याने यंदा वीकएन्ड ‘विस्तारला’ आहे. त्याचेच निमित्त साधत ठाण्यात ‘हार्टलँड कला महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २६ जानेवारी या कालावधीत होणारा हा महोत्सव म्हणजे ठाण्यातील कलाप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. विविध कला शिकण्यापासून, ते अशा कलाविष्कारांच्या स्पर्धेपर्यंत आणि प्रभात फेरीपासून साहसी खेळांच्या स्पर्धापर्यंत विविध गोष्टी करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.
महोत्सवाचा प्रारंभ शनिवार २४ जानेवारीला लोकपुरम संकुलाशेजारी असलेल्या मैदानात होईल. यामध्ये मुलांसाठी चित्रकला, टॅटू काढणे, मातीच्या वस्तू बनवणे, मेहंदी, व्यक्तिचित्रे काढणे अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २५ जानेवारी रोजी ग्लेडी अल्वारिस मार्गावरील दोन कि लोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेली भिंत ठाण्यातील विविध शाळांतील मुले रंगवणार आहेत. याच दिवशी हौशी छायाचित्रकारांसाठी ‘डायव्हर्सिटी ऑफ ठाणे’ ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार, २६ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत अल्वारिस रस्त्यावर अनेक कलाविष्कारांची प्रभात फेरी (कार्निवल) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये एरोबिक, झुंबा नृत्य, वाद्यवृंद अशा विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर साहसी खेळ, लगोरी, भोवरा फिरवणे आणि पतंग उडवणे अशा विविध खेळांचाही आनंद या वेळी ठाणेकरांना घेता येणार आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून काशीनाथ घाणेकर नाटय़गृहासमोरील एमराल्ड प्लाझा येथील पहिल्या मजल्यावर एका आर्ट गॅलरीचे उद्घाटनही होणार आहे. त्यामध्ये ठाणे-मुंबईमधील कालाकारांच्या चित्रकृती व शिल्पकृती यांचे प्र्दशन व विक्री करण्यात येईल. हे प्र्दशन सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत रसिकांसाठी खुले राहील.
’कधी – २४ ते २६ जानेवारीदरम्यान
’स्थळ – ग्लेडी अल्वारिस रोड, हिरानंदानी मेडोज, लोकपुरम, ठाणे (प.)

काळा तलाव महोत्सवात ‘महासूर्यकुंभ’
कल्याणच्या ऐतिहासिक परंपरेचे दर्शन सर्वाना घडावे यासाठी गेली पाच वर्षे कल्याणमध्ये ‘काळा तलाव महोत्सव’ केला जातो. या वर्षी हा महोत्सव २३ आणि २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. २३ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते जलदेवतेचे पूजन व आरती होणार आहे. जागतिक तापमानवाढीची समस्या लक्षात घेता मानवतेच्या कल्याणासाठी उपयुक्त ऊर्जेबद्दल माहिती व त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याचे प्रात्यक्षिक दर्शविणारा ‘महासूर्यकुंभ’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात शालेय विद्यार्थी सौरकुकरचा वापर करून अन्न शिजवून त्याचा आस्वाद घेतील. २४ जानेवारी रोजी सायंकाळी सारेगमपविजेती जुईली जोगळेकर हिच्या सुरेल गाण्यांचा ‘सदाबहार आशा’ हा  कार्यक्रम होणार आहे.
डोंबिवलीत भावगीतांचा प्रवास उलगडणारी मैफल
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाला गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रविवारी २५ जानेवारी रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात रात्री आठ वाजता गजानन वाटवे यांनी गायलेल्या गीतांपासून ते सलील कुलकर्णी-संदीप खरे या जोडगोळीने स्वरसाज चढविलेल्या भावगीतांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखविणारी मैफल सादर केली जाणार आहे. मराठी मनामनांत घर करून राहिलेली अवीट गोडीची गाणी श्रीरंग भावे, नचिकेत देसाई आणि विद्या करलगीकर हे गायक कलावंत सादर करणार आहेत. संगीत संयोजन अप्पा वढावकर यांचे, तर निवेदन अरुण नूलकर यांचे आहे. या वेळी झपाटा मार्केटिंगच्या वतीने या भावगीत मैफलीच्या ध्वनिचित्रफितीचे (डीव्हीडी) प्रकाशनही करण्यात येणार आहे.   
पॅराडाइज महोत्सवात विविध कलागुणांना वाव
लोढा पॅराडाइज वसाहत फेडरेशन आणि संवाद जनप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पॅराडाइज महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २३ ते २७ जानेवारी या कालावधीत लोढा पॅराडाइज, ठाणे(प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री गणेश प्रतिष्ठापना करून माघी गणेश उत्सव साजरा केला जाईल. २४ आणि २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत अ‍ॅम्फी थिएटर, लोढा पॅरेडाइज येथे नृत्य स्पर्धा होतील. २५ व २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत अ‍ॅथेन-सी समोर, लोढा पॅराडाइज येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत अ‍ॅम्फी थिएटर येथे महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या पैठणीच्या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांसाठी २३ ते २७ जानेवारीदरम्यान अ‍ॅरिस्टोसमोर, मेळा आणि खरेदी जत्रा ठेवण्यात आली आहे.
उथळसरला तरुणाईसाठी ‘साल्सा नाइट’
ठाणे शहराला पब, डिस्को संस्कृतीची फारशी ओळख नाही. या पाश्र्वभूमीवर शहरात नव्याने उभ्या राहिलेल्या काही तारांकित हॉटेलांनी हा ट्रेंड बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काल-परवापर्यंत ‘गझल नाइट्स’पुरती ओळखली जाणारी बडी हॉटेलं आता वेगवेगळे प्रयोग करू लागली असून काही ठिकाणी ‘रॉकबँड शो’ आयोजित केले जातात. अशाच स्वरूपाचा प्रयोग उथळसर भागात असलेल्या युनायटेड-२१ या तारांकित हॉटेलच्या व्यवस्थापनाने सुरू केला असून शुक्रवारी ‘साल्सा नाइट’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘साल्सा’ हा लॅटिन अमेरिकन नृत्य प्रकार गेल्या काही वर्षांपासून भारतात चांगलाच लोकप्रिय होतो आहे. फिटनेस राखण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या नृत्य प्रकारात याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो.
बुधवारी ‘कृष्ण’नृत्यनाटिका
चोखंदळ कलारसिकांच्या पसंतीस उतरेली कृष्णचरित्रावर आधारित ‘कृष्णा’ ही नृत्यनाटिका बुधवार, २८ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता उमा नीळकंठ व्यायामशाळा, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे (प) येथे सादर केली जाणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता नर्तक नकुल घाणेकर, नृत्यांगना सोनिया परचुरे आणि संपदा जोगळेकर या नाटिकेत सहभागी होत आहेत. संत सूरदास आणि कवी माधव चिरमुले यांच्या काव्यरचना कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. प्रवेश विनामूल्य आहे.
गुरुशिष्यांचा नृत्य न्यास
लहजा नृत्य संस्थेच्या वतीने शहरातील पाच गुरू आणि शिष्यांचा एकत्रित नृत्याविष्काराचा नृत्य न्यास हा कार्यक्रम शुक्रवार, २३ जानेवारीला रात्री ८ वाजता सावित्रीबाई फुले नाटय़गृह, एम.आय.डी.सी. डोंबिवली (पू.) येथे होणार आहे. यात शीतल कपोते (कथ्थक), पवित्र भट (भरतनाटय़म), ज्योती शिधये (कथ्थक), वैशाली दुधे (कथ्थक), माधवी गांगल (भरतनाटय़म) हे आपल्या शिष्यांसह नृत्याविष्कार सादर करणार आहेत. शास्त्रीय नृत्यकलेचा प्रसार व्हावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कल्पनाशक्तीचे रंग उडवा
ट्री हाऊस हायस्कूल कल्याण यांच्या वतीने ‘कल्पनाशक्तीचे रंग आकाशात उडवा’ या कल्पनेवर आधारित ‘जिगसॉ पझल’मधून पक्ष्याची कलाकृती साकारण्यात येणार आहे. शुक्रवार, २३ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल, गोदरेज हिलसमोर, बारवी, कल्याण (प.) येथे हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी वय वर्षे ३ ते १२ या वयोगटातील ११०० विद्यार्थी हा पक्षी साकारणार आहेत.
मिनी मॅरेथॉन स्पर्धा
मातोश्री आनंदीबाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शालेय मिनी मॅरेथॉन २०१५  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २४ जानेवारी रोजी रवी पाटील मैदान, तुकाराम नगर, डोंबिवली (पू.) येथे सकाळी ७.३० वाजता या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चार गटांत ही स्पर्धा होणार असून मैदानी व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगणे व इंधन वाचविण्याचा संदेश या स्पर्धेतून देण्यात येणार आहे.
संकलन : शलाका सरफरे
‘वीकेण्ड विरंगुळा’ सदरासाठी कार्यक्रम पाठवण्यासाठीचा पत्ता :  ‘लोकसत्ता’ ठाणे कार्यालय, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रस्ता, ठाणे (प). ई-मेल : newsthane@gmail.com

naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
dharmaveer producer mangesh desai writes special post for pravin tarde
“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?