‘अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’ची शानदार सांगता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुन्या नव्या लोकप्रिय हिंदी गाण्यांना इंडो-पॉप संगीताची फोडणी देत सध्याची आघाडीची पाश्र्वगायिका शाल्मली खोलगडे हिने अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या अखेरच्या दिवशी हजारो रसिकांना सुरांच्या सप्तरंगी दुनियेची सफर घडविली. शाल्मलीच्या सुरांवर तरुणाईने बेधुंद होत ठेका धरला.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित आणि लोकसत्ता माध्यम प्रायोजक असलेल्या अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी शाल्मली खोलगडेच्या हिंदी पॉप गाण्याने रसिकांना अक्षरश: वेड लावले. वरच्या पट्टीतली हिंदी पॉप गाणी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत सादर करताना तिने मनमोहक नृत्याने तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडले.

आपल्या बॉलिवूड पदर्पणात गायलेल्या ‘मं परेशान परेशान’ या गाण्याने शाल्मलीने सुरुवात केली. मग पुढे उर्वशी. उर्वशी, हम्मा हम्मा, बँग बँग या उडत्या चालीच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हिंदी गाण्यासोबतच मराठीतल्या फ्रेश, हे मन माझे या गाण्यालाही रसिकांनी जोरदार दाद दिली. आपल्या सादरीकरणात पुढे शाल्मलीने गिटारचा ताबा घेतला. गिटारवर सादरीकरण करत असताना शांत चालीची ‘इंना सोना तेनु रबने बनाया’ आणि ‘दिल दि या गल्ला’ ही गाणी पेश केली.

त्यानंतर चन्ना मेरिया, बंनो रे बंनो, रे कबिरा, ले जाये हवाये, इलाही मेरा जी आये आये अशी एकाहून एक सरस गाणी शाल्मलीने सादर केली. पुढे तिने पुन्हा आपला मोर्चा उडत्या चालीच्या हिंदी पॉप गाण्यांकडे वळवला. आंटी जी आंटी जी, बत्तमीज दिल, गुल्लाबो, मुझे तो तेरी लत लग गई आणि दम मारो दम या गाण्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचा शेवट शाल्मलीने पंजाबी गाण्यांनी केली.

समाजमाध्यमांवरील ट्रेंडिंगमध्ये बाजी

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी हजेरी लावल्याने अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलची चर्चा फेसबुक आणि ट्विटर सारख्या समाज माध्यमांतही जोरात सुरू आहे. शुक्रवारी निलाद्री कुमार आणि शनिवारी अलका याज्ञिक यांच्या सादरीकरणाला हजारो रसिकांनी हजेरी लावली होती. त्याची चर्चा आणि एकंदरीत फेस्टिव्हलबद्दल ट्विटरवर रसिकांनी मते व्यक्त केली होती. त्यामुळे देशाच्या ट्वीटर ट्रेंडमध्ये पहिल्या पाच ट्रेंडिंग विषयात जागा मिळाली होती. ही ट्रेंडिंग चर्चाही कौतुकाचा विषय ठरली.

कलादालनात सैनिकांना मानवंदना

फेस्टिव्हलमध्ये दर्शनी भागात उभारण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे कलादालन रसिकांचे लक्ष वेधून घेत होते. तीन दिवस रंगलेल्या या महोत्सवात संगीत, खाद्य आणि चित्रकारांनी रेखाटलेली विविध शैलीतील चित्रे ही रसिकांसाठी पर्वणी ठरली. ज्योत्स्ना कदम, प्रभाकर पाटील, केशव कासार, अजित चौधरी, पंकज बांदेकर, अक्षय करोडे आणि नानासाहेब येवले यासह अनेक दिग्गज चित्रकारांनी कलेचे सादरीकरण केले. या कला दालनाच्या परिसरात अनेक कलाकारांनी कॅनव्हास वर सामाजिक विषयांवर रेखाटन केले. हातात बंदूक घेऊन देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतीय सनिकांची प्रतिकृती यावेळेस साकारण्यात आली होती. या माध्यमातून पुलावामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध कलाकारांनी रेखाटलेली बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे रसिकांचे लक्ष वेधून घेत होती.

मान्यवरांची मांदियाळी

या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदियाळी होती. गेली चार वष्रे खासदार श्रीकांत शिंदे हा महोत्सव भरवत असून, विविध उपक्रमातून ते नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवतात. चार वर्षांपासून शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलने ही भूक भागवली आहे, असे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रिवद्र पाठक, बालाजी किणीकर, सुभाष भोईर, शांताराम मोरे, गोपाळ लांडगे, अरिवद वाळेकर, मनीषा वाळेकर, सुनिल चौधरी, वामन म्हात्रे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार शिंदे यांनी, अंबरनाथकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानले. परदेशात एखाद्या शहराची ओळख तिथे होणारया फेस्टिव्हलमुळे होत असते, तशीच काहीशी ओळख अंबरनाथची झाली, त्यात अंबरनाथकरांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.