बदलत्या काळानुसार मानवाच्या पेहरावात बदल होत गेले. सुरुवातीला काही वर्षांच्या अंतराने होणारा पेहरावातील बदल आता सतत बदलत असलेला ‘ट्रेंड’ बनला आहे. अगदी केशरचनेपासून चप्पल-बुटापर्यंत प्रत्येक गोष्ट ‘फॅशन’ स्टेटमेंट ठरू लागली आहे. शहराशहरांनुसार ‘फॅशन’चा हा कल बदलताना दिसतो. मुंबईला लागून असलेल्या ठाण्याची स्वत:ची अशी वेगळी स्टाइल नसली तरी ठाण्यापलीकडे राहणाऱ्यांना नवनवीन फॅशनशी समरूप व्हायला ठाणेच जवळचे वाटते. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील बदलत्या फॅशन ट्रेण्डचा वेध घेणारे हे साप्ताहिक सदर आजपासून..
बदलत्या जीवनशैलीनुसार पाश्चात्त्य प्रकारच्या वेशभूषेचा ट्रेंड आपल्याकडे वाढत चालला आहे. त्यातही टी-शर्ट आणि जीन्स ही तर जणू तरुणाईचे प्रतीके बनली आहेत. अशा प्रतीकांवर आता मराठीची मुद्रा उमटू लागली आहे. केवळ उमटूच नव्हे, तर ती झळाळूही लागली आहे, असे म्हणता येईल. इतक्या मोठय़ा प्रमाणात बाजारात सध्या मराठी कविता, वाक्ये, संवाद छापलेल्या टी-शर्टची चलती सुरू झाली आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा.. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. नभ उतरू आलं, अंग झिम्माड झालं.. श्रावणमासी हर्ष मानसी.. घन ओथंबून येती.. अशा कवितांच्या ओळी असलेले टी-शर्ट घालून फिरणारे तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने पाहायला मिळतात.
एकाच रंगात रंगलेल्या ‘प्लेन’ टी-शर्टची मागणी घटून चित्रे असलेले किंवा काही तरी अक्षरनक्षी असलेल्या रंगीबेरंगी टी-शर्टना पसंती मिळत आहे. अशा टी-शर्टवर मराठीची मुद्रा उमटवण्याची सुरुवात ठाण्यातीलच उन्मेश जोशी या तरुणाने सात वर्षांपूर्वी केली. हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला की ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे यापलीकडे जात संपूर्ण महाराष्ट्रभर अशा टी-शर्टची मागणी वाढू लागली. नव्या उद्योजकांनी यामध्ये उतरून ही फॅशन घराघरांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याची मुहूर्तमेढ मात्र ठाण्यातूनच सुरू झाली. अभिव्यक्तीचा वेगळा मार्ग म्हणून पाहिल्या जाणाऱ्या टी-शर्ट फॅशनचा हा ट्रेण्ड कायम राखण्यासाठी त्यामध्ये नावीन्यपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न कायम सुरू असतो. त्यामुळेच तरुणांमध्ये या टी-शर्टचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच आहे.
ठाण्यात लहानाचा मोठा झालेल्या उन्मेष जोशीने एमबीए करून एक्स्पोर्ट मॅनेमजेंटचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर टी-शर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय सुरू केला. याच व्यवसायाला बळ देण्यासाठी उन्मेषने प्रख्यात अक्षरसुलेखनकार अच्युत पालव यांच्या मदतीने मराठी अक्षरे असलेल्या टी-शर्टची निर्मिती केली. मराठी कवितांतील प्रसिद्ध ओळींपासून या उपक्रमाला सुरुवात झाली. ज्ञानेश्वरांची ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके’, सुरेश भटांची ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ यांसारख्या कवितांच्या माध्यमातून मराठी टी-शर्टनी मराठी तरुणांच्या मनामनांमध्ये स्थान मिळवले. ज्ञानेश्वरांपासून ते सुरेश भटांपर्यंत आणि अशोक बागवेंपासून अभिजित पानसेपर्यंत, बालकवींपासून नलेश पाटील, महेश म्हात्रे, ना. धों. महानोरांपासून ते बोरकरांपर्यंतच्या अनेक कवींच्या ओळींनी शंभराहून अधिक वेगवेगळ्या डिझाइन्स यामध्ये उपलब्ध झाल्या आहेत.
दर वर्षीमराठी भाषा दिनानिमित्ताने टी-शर्ट तयार करण्याचा पायंडा ठाण्यात ‘भारतीय’ या ब्रॅण्डने पाडला असून दरवर्षी तो पाळला जातो. त्यामुळे मराठी भाषा दिनाच्या दिवशी या नव्या टी-शर्टची मोठी खरेदी होते. परदेशातसुद्धा मराठी टी-शर्टना पसंती मिळत असून युरोप, अमेरिका या भागांमध्ये टी-शर्टला मोठी मागणी आहे. दादर, मुलुंड, घाटकोपर आणि ठाण्याबरोबरच नाशिक, पुणे आणि इतरही शहरांमधील निवडक दुकानांमध्ये टी-शर्ट विक्री केली जाते.
मुली, बालकांसाठीही टी-शर्ट
ठाण्यातील विविध दुकानांत मुलींसाठीही वेगळ्या फिटिंगचे टी-शर्ट आहेत. त्यात काही खास मुलींना आवडतील अशा कविता आहेत. शांता शेळके आणि इतर अनेक कवयित्रींच्या कविता यात प्रिंट केलेल्या आहेत. लहान मुलांचे टी-शर्ट्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ५ ते ६ डिझाइन्स आहेत. यावर विंदा करंदीकर, संदीप खरे यांच्या बालकविता छापण्यात आल्या आहेत.
टी-शर्ट.. एक चळवळ!
ठाण्यामध्ये सुरू झालेली मराठी टी-शर्ट ही एक चळवळ बनली असून भारतीय अस्मिता, किल्ला, मराठी कट्टा अशा वेगवेगळ्या ब्रॅण्डचे मराठी टी-शर्ट बाजारात उपलब्ध आहेत. मराठी टी-शर्टचा वाढता प्रतिसाद लक्षात आल्यानंतर या टी-शर्टची कॉपी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. पायरेटेड टी-शर्ट हेच या निर्मितीचे यश असल्याचे जाणकार सांगतात.
मराठी साहित्यात अभंग आहेत, ओव्या आहेत. त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न आम्ही केला. इंग्लिश मेसेजेस प्रिंट केले जातात. तसेच मराठीतून मेसेजेस तयार करण्याची गरज निर्माण झाली होती. याच संकल्पनेतून हे टी-शर्ट बाजारात आणण्यात आले. साहित्यिकांची परवानगी घेण्यापासून इतर अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला. टी-शर्टचे रंग आणि त्यावरचे डिझाइन या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच चांगल्या दर्जाचे टी-शर्ट बाजारात आले आहेत. नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याच्या आमच्या प्रयत्नाला तरुणांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. – उन्मेष जोशी
मुद्रा मराठी..
*मराठी कविता, पाऊसगाणी
*अभंग, ओव्या, श्लोक
* संयुक्त महाराष्ट्र चळवळीती हुतात्मे
* महाराष्ट्र गीत, सेनापती बापट यांच्या ओळी
* पु.ल. देशपांडे, शांता शेळके, कुसुमाग्रज, श्रीनिवास खळे, यशवंत देव, कमलेश भडकमकर यांच्या साहित्यकृतींतील ओळी
* प्रतापगड, रायगड अशा किल्ल्यांसह शिवछत्रपतींची राजमुद्रा.
कुठे मिळेल? : मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे येथील वेगवेगळ्या दुकानांमध्ये हे टी-शर्ट उपलब्ध आहेत. ठाण्यात उन्मेष जोशी यांची यश अॅपरल नावाची दुकाने आहेत. त्याबरोबर अनेक कपडय़ांच्या दुकानांमध्ये मराठी टी-शर्ट मिळतात, तर अनेक टी-शर्ट निर्माते ऑनलाइन विक्री करतात.
किंमत.. : २५० ते ३५० रुपयांपर्यंत