एखादी गोष्ट ‘ऑफबीट’ म्हणजे थोडय़ा tvvish01वेगळ्या विचाराने, पद्धतीने आणि बदलाने करायला आत्यंतिक मनस्वीपणा खरंच असावा लागतो. अशा मनाचे बाहय़ जगात उमटलेले आविष्कार प्रसन्न, अचंबित करणारे आणि नवीन दिशा देणारे ठरतात. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक ‘बीट ऑफ’ घटना, कलाकृती घडत असतात. मानवी मनाला खऱ्या अर्थाने आव्हान देणाऱ्या आणि स्पर्श करणाऱ्या आपल्या रोजच्या जीवनातील घटनांची, कलाकारांची, शास्त्रज्ञांची आणि जिद्दीने नवीन काही तरी साकार करणाऱ्या मानवी मनांची दखल घेणारं हे सदर.
संगीत क्षेत्रातील खास तंत्र म्हणजे रेकॉर्डिग किंवा ध्वनिमुद्रण. या रेकॉर्डिगची वाटचालपण खूपच रंजक आहे. म्हणजे १९७० सालच्या आधीच्या काळापर्यंत गायक-वादक यांचा ताफा एखादं गाणं प्रचंड तयारीने, अनेक रिहर्सलनंतर रेकॉर्ड करत असे. नादब्रह्म आणि स्वरब्रह्म यांच्या आनंदमय वातावरणातून घडलेल्या या कलाकृती म्हणूनच आजही प्रसन्न, टवटवीत वाटतात; पण विज्ञानाने या तंत्रज्ञानात झपाटय़ाने बदल करायला सुरुवात केली आणि १९८० नंतर अ‍ॅनालॉग रेकॉर्डिगच्या क्लिप्स बनू लागल्या. मग कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, साधना सरगम अशा त्या काळाच्या नवोदित (आता प्रस्थापित) गायिका डमी गायिका म्हणून क्लिप्सवर गाणं गायच्या आणि त्यानंतर लतादीदी, आशादीदी यांच्या आवाजात हे गाणं तयार व्हायचं. पुढे मल्टिट्रॅक आणि डिजिटल रेकॉर्डिगचा काळ आला आणि प्रत्येक ट्रॅक वेगवेगळे रेकॉर्ड होऊ लागले. साधारण १९९६-९७ सालानंतर हार्डडिस्क रेकॉर्डिग आणि स्पेक्ट्रल सिंथेसिस या सॉफ्टवेअरचं वर्चस्व वाढू लागलं. यामध्ये तांत्रिकदृष्टय़ा सोयीचं पण एकसंध अभिजात संगीताची गुणवत्ता घसरवणारं ‘कॉपी पेस्ट’ हे तंत्र सुरू झालं आणि कोणतंही गाणं तुकडय़ातुकडय़ाने रेकॉर्ड केलं जाऊ लागलं. सॅडी, प्रॉट्रल्ज, न्यूएण्डो या अचाट सॉफ्टवेअरमुळे तर संगीत जगतात कोणतीही उलथापालथ करण्याची शक्यता साध्य झाली. म्हणजे इतकं की, बेसूर गायलं तरी अ‍ॅवॉर्ड मिळेल एवढी गायन-वादनाच्या गुणवत्तेतील सुधारणा आजच्या घडीला हे सॉफ्टवेअर बेमालूमपणे करत आहे. म्हणजे इथे गाणं पूर्ण गाण्याची गरजच नसते. साथीदार कोण, काव्य काय, गाण्याचा भाव काय हे पाहायला वेळच नसतो! सगळं कसं गतिमान, प्रोफेशनल आणि शुष्क.. याचा अपेक्षित परिणाम म्हणजे आजचं एखादं गाणं जेमतेम एक आठवडाच लक्षात राहतं. त्यामुळे १९७०च्या काळातील संगीतासारखं, या गाण्यांनी मनाची पकड घेण्याचा प्रश्नच येत नाही.
खरं तर या परिस्थितीतून बाहेर पडावं असं अनेक कलाकारांना आणि संगीतकारांना वाटत असणार; पण नेमकी दिशा मिळत नसावी का? या प्रश्नाचं उत्तर १८ डिसेंबरला यू टय़ूबवरून प्रसारित झालेल्या ‘चैत्र चांदणं!’ या कलाकृतीनं दिलं. ‘चैत्र चांदणे, मनात फुलले, दरवळला एकांत। चंद्र झुल्यावर, झुलवा अलगद, आज जागवा रात। साजणा नका सोडवू हात’ असे आर्जवी नादमय शब्द असलेल्या मधुकर आरकडे (‘बीज अंकुरे अंकुरे’ शीर्षकगीताचे कवी) यांच्या बैठकीच्या लावणीला संगीतकार विनय राजवाडे यांनी स्वरबद्ध केलं आणि माधुरी करमरकर यांच्या चिरतरुण आवाजात ही लावणी २१ वादकांच्या साथीने सलग (एका टेकमध्ये) रेकॉर्ड केली गेली. पुन्हा एकदा १९७० च्या काळासारखी सर्वानी मिळून सूर, ताल, लय यांचा आनंद घेत एकसंध कलाकृती समरसून निर्माण केली. या सर्वानी ४०-५० तासांच्या रिहर्सलनंतर भव्य यशराज स्टुडिओजच्या दालनात आजचे आघाडीचे रेकॉर्डिगतज्ज्ञ विजय दयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त चार तासांत बिनचूक पाच टेक दिले. या क्षणाचा आनंद खरोखरच शब्दांत व्यक्त करणारा नसणार! यू टय़ूबवर अल्पावधीत लाखो लाइक्स मिळालेल्या या कलाकृतीच्या तालवाद्याचे नियोजन माधव पवार यांनी, तर त्याचे संगीत संयोजन आदित्य ओक यांनी करून
बैठकीच्या लावणीला अपेक्षित असा उत्तम सांगीतिक माहोल तयार केला आहे.
संगीतकार विनय राजवाडे यांच्या अत्यंत तळमळीने आणि चिकाटीने केलेल्या या प्रयत्नावर ज्येष्ठ तसेच तरुण पिढीच्या कलाकारांनी दिलेल्या प्रतिक्रियादेखील यू टय़ूबवर पाहता येतील. रवींद्र साठे, पं. उल्हास बापट, अविनाश ओक, सुनील बर्वे, राहुल रानडे, प्रमोद चांदोरकर, कमलेश भडकमकर, अवधूत गुप्ते यांच्या प्रतिक्रिया समर्पक आहेत. यामधील ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींची ‘तो काळ परत येतोय..’ ही प्रतिक्रिया शब्दश: खरी ठरो आणि संगीत जगताला पुन्हा एकदा १९७०च्या काळातलं बहारदार ‘चैत्र चांदणं’ यानिमित्ताने अनुभवायला मिळो!
प्रा. कीर्ती आगाशे

Story img Loader