मानस मंदिर, शहापूर
शहापूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेला आणि माहुली किल्ल्याच्या जवळ असलेला हा परिसर अतिशय रमणीय आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरच्या अलीकडे एक फाटा माहुली किल्ल्याकडे जातो. त्याच मार्गावर मानस मंदिर वसलेले आहे. येथे प्रवेश केल्यानंतर आपण एखाद्या मंदिरांच्या गावातच आलो आहे की काय असे वाटते. या परिसरात किमान १० ते १२ मंदिरे असावीत. परंतु सर्व मंदिरे भव्यदिव्य आणि पांढरीशुभ्र. आधुनिक स्थापत्य कलेचा एक आदर्श नमुनाच. परिसराच्या मध्यभागी आणि उंचावर एक भव्य मंदिर आहे. या मंदिरात भगवान महावीर यांची एक सुंदर आणि भव्य मूर्ती आहे. मंदिराचा गाभारा एकसंध, भव्य आणि कलाकुसर केलेला आहे. संगमरवरी दगडावरील कोरीव काम आणि उत्कृष्ट शिल्पकला मंदिरात पाहायला मिळतात. अन्य मंदिरांमध्येही त्या त्या देव-देवतांच्या व साधुसंतांच्या मूर्त्यां व पादुका आहेत.या परिसरात एक क्षेत्रपालाचे मंदिर आहे. क्षेत्रपाल म्हणजे रक्षणकर्ता. या मंदिराच्या मागे एक मोठा वटवृक्ष असून त्यावर एक साप असून, जैन धर्मीय यालाच क्षेत्रपाल म्हणतात. फणा काढलेल्या या सापाचे सारेच जण दर्शन घेत असतात.मानस मंदिर हे आशिया खंडातील जैन धर्मीयांचे सर्वात मोठे मंदिर मानले जाते. जैन धर्मीयांचे असले तरी सर्वच धर्माचे लोक येथे भेटी देतात. काही मंदिरांमध्ये सातत्याने प्रार्थना सुरू असतात, त्यामुळे येथील वातावरण नेहमीच भक्तीमय असते. मंदिराच्या बाजूला हिरवाईने नटलेले सुंदर बगीचे तयार करण्यात आले असून त्यात विविध प्राण्यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. रस्त्याच्या बाजूला या हिरव्यागार बागा मनाला ताजेतवाने करून जातात. येथील रस्ते आणि एकूण या परिसरात कमालीची स्वच्छता आहे. या सुंदर व स्वच्छ वाटा पाहताना येथील उत्कृष्ट व्यवस्थापनाबाबत कौतुकाचे शब्द आपल्या मुखातून आपोआप निघतात.
हिरवाईने नटलेल्या या मंदिर परिसरात एक तलाव असून, या तलावाच्या काठी अनेक डेरेदार वृक्ष लावण्यात आले आहेत. तलावाच्या काठी भाविकांना बसण्यासाठी उत्तम सोय करण्यात आली आहे. येथे लहाना मुलांना बागडता यावे यासाठी विशेष दखल घेण्यात आली आहे. या मंदिर परिसरात भाविकांसाठी धर्मशाळा व भोजनालय तयार करण्यात आले आहे. तिथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. ‘शत्रुंजय तीर्थधाम भुवनभानू मानस मंदिरम् ट्रस्ट’च्या माध्यमातून या मंदिर परिसराचे व्यवस्थापन केले जाते. याच ट्रस्टच्या माध्यमातून अल्पदरात येथे चविष्ट व जैन पद्धतीचे जेवण मिळते. हिरव्यागार परिसरातील पांढरीशुभ्र मंदिरे असलेला हा परिसर नक्कीच मनाला भुरळ घालतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एखाद्या दिवशी मन ताजेतवाने करण्यासाठी व शांततेचा अनुभव घेण्यासाठी या परिसरातला नक्कीच भेट द्या.
संदीप नलावडे
मानस मंदिर, शहापूर
कसे जाल?
’ शहापूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरून एक फाटा जातो.
’ आसनगाव रेल्वे स्थानकातून रिक्षाने २० ते २५ मिनिटात या परिसरात पोहोचता येते.
’ एसटी किंवा अन्य परिवहन सेवेची बस मानस मंदिरकडे थेट जात नसल्याने स्वत:चे खासगी वाहन असल्यास उत्तम.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा