मुंब्रा स्थानकातून पूर्वेला बाहेर पडले की या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. स्थानकाबाहेरील जुना पुणे-मुंबई महामार्ग ओलांडला की एक गल्ली या डोंगरावर जाते. या गल्लीतून थोडे पुढे गेल्यास डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. या पायऱ्याच आपल्याला थेट मुंब्रादेवीच्या मंदिराकडे घेऊन जातात. या पायऱ्या चढताना थकायला होते, पण वर चढल्यानंतर डोंगरावरून सभोवातालचे निसर्गरम्य आणि नयनरम्य दृश्य पाहिल्यानंतर थकवा कुठच्या कुठे पळून जातो.
मुंब्य्राच्या या डोंगरावरून ठाण्याच्या खाडीचे अप्रतिम दृश्य दिसते. अगदी खाडीपल्याडची काही गावेही दिसतात आणि मन सुखावून जाते. मध्य रेल्वेचा मार्ग अगदी स्पष्ट दिसतो. धीम्या आणि जलद मार्गावरून गाडय़ा येत असतील, तर रेल्वेचे हे दृश्य पाहण्यास एक वेगळीच मजा येते. दिवा-मुंब्रा परिसरात लोहमार्गाचे जाळे कसे पसरले आहे याची माहिती या डोंगरावर गेल्यावर कळते.
डोंगरावर देवीचे छोटेसे मंदिर आहे. मुंब्रा म्हणजे नवदुर्गा. या मंदिरात नऊ देवींची मूर्ती आहे. दगडात या नऊ मूर्ती कोरलेल्या असून, त्यावर शेंदूर फासलेला आहे. नवरात्रीत या मंदिरात भाविकांची गर्दी असते, तसेच अनेक ट्रेकर मंडळीही हा डोंगर सर करण्यासाठी या भागाला भेट देतात. हे मंदिर जरी डोंगराच्या मध्यावर असले तरी ट्रेकर्स मंडळींना थेट माथ्यावर जायचे असते. पायऱ्यांनी या मंदिरापर्यंत येऊन नंतर ट्रेकर्स विविध मार्गानी हा डोंगर सर करतात. पावसाळ्यात येथे छोट-छोटे धबधबे निर्माण होत असल्याने भोवतालचा परिसर खूपच निसर्गसुंदर दिसतो. पावसाळ्यात बरीच माकडेही या परिसरात येत असल्याने त्यांच्या मर्कटलीला पाहात डोंगर चढण्यास वेगळी मजा असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा