खरे तर ‘आपले घर भले आणि आपण’ ही आधुनिक शहरांची संस्कृती. ढोकाळी नाक्यावरील ‘प्रथमेश हिल्स’ हे संकुल मात्र त्याला अपवाद आहे. संकुलाच्या कुंपणापलीकडे जात सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम या सोसायटीतर्फे राबविले जातात. विशेष म्हणजे एकदिलाने सोसायटी सदस्य अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात..
प्रथमेश हिल्स- ढोकाळी नाका, कोलशेत रोड, ठाणे (प)
घोडबंदर येथील कापूरबावडीपासून अवघ्या काही अंतरावर प्रथमेश हिल्स ही सोसायटी आहे. १५ मजल्यांच्या या इमारतीत एकूण ६० सदनिका आहेत. त्याचप्रमाणे २० गाळे, दोन खाजगी दवाखाने आणि एक व्यायामशाळाही आहे. २०१२ मध्ये हे संकुल उभारण्यात आले. संकुलाचे अध्यक्ष सुनील कुमार शर्मा, सचिव डॉ. राजेंद्र थोरात आणि खजिनदार सुभाष कलकेरी यांच्यासह ११ सदस्य या संकुलाची धुरा सांभाळत आहेत. स्वच्छतेचे भान बाळगल्यामुळे इमारतीच्या आवारात कचऱ्याचा कागदी बोळाही दिसत नाही. येथील रहिवासी स्वच्छतेविषयी कमालीचे जागरूक आहेत. जमा झालेला ओला आणि सुका कचरा नागरिक स्वत: वेगळा करून देतात. घरोघरी येणारी दैनिके रहिवासी रद्दीत देत नाहीत. त्याऐवजी ती अनाथ मुलांना वाचण्यासाठी दिली जातात. संकुलालगत असलेल्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. पुन्हा या रस्त्यावर पथदिवे नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित प्रशासनांनी त्याची नोंद घेऊन कार्यवाही करावी, असे आवाहन रहिवाशांनी केले आहे.
रद्दीदानातून वाचन, कलेचे संस्कार
माजिवडा येथील नवजीवन विद्या मंदिर या अनाथ मुलांच्या शाळेला सामाजिक मदत व्हावी म्हणून इमारतीतील रहिवाशांनी घरी येणारी वृत्तपत्रे दान करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार दर रविवारी सर्व घरातील रद्दी संकुलाच्या कार्यालयात जमा होते. यानंतर शाळेचे वाहन येऊन जमा झालेली रद्दी गोळा करून मुलांपर्यंत पोहचवते. त्यातील उपयुक्त माहितीचे कात्रण काढून ठेवले जाते. उर्वरित कागदांचा कलाकृती निर्माण करण्यासाठी वापर केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि कलेची आवड जोपासावी यासाठी हा उपक्रम राबविला जातो.
आर्ट ऑफ लिव्हिंग
संकुलातील रहिवाशांच्या सोयीसाठी दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे वर्ग भरतात. संकुलातील अनेकजण नियमितपणे या वर्गाचा लाभ घेतात.
कचरा व्यवस्थापन
शहरातील कचरा व्यवस्थापन हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. प्रथमेश हिल्समधील रहिवासी याबाबतीत काटेकोर आहेत. येथील प्रत्येक घरातून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करून दिला जातो. तसेच संकुलाच्या आवारात मोठय़ा प्रमाणात स्वच्छता राखली जाते. त्यामुळे आवारात कचऱ्याचा बोळाही कधी आढळून येत नाही. इमारतीत तीन महिन्यांपूर्वीच महानगर गॅसवाहिनीही सुरू करण्यात आली आहे.
सुरक्षा
इमारतीत एकूण १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. तसेच इमारतीच्या एकूण दोन प्रवेशद्वारांवर तीन-तीन असे सहा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उत्तम नियोजन आहे.
उत्सवांचा उत्साह
संकुलात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सण साजरे करण्यात येतात, तसेच नवरात्रोत्सवही मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. यामध्ये सर्व रहिवासी सहभागी होतात. याशिवाय अन्य सण आणि उत्सवही उत्साहाने साजरे होत असतात.
फेरीवाल्यांचा त्रास
इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील पदपथांवर मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास येथील रहिवाशांना सोसावा लागतो. अनेक वेळा प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांच्या गाडय़ा उभ्या असतात.
अपघातांची भीती
कोलशेत रोडवरून अनेक वाहनचालक भरधाव वेगात वाहने चालवतात. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना जीव मुठीत धरून चालावे लागते. या परिसरात ना थांबरेषा आहेत ना गतिरोधक. तसेच ज्या ठिकाणी शाळेच्या मुलांची बस थांबते, त्या ठिकाणी पावसाळी शेड नसल्याने मुलांना पावसात भिजत उभे राहावे लागते. या संदर्भात पालिकेशी संवाद साधला, मात्र अद्याप काही प्रतिसाद मिळाला नाही.