व्यक्तीच्या जीवनात आव्हानांतून दृश्यमान होणारे कर्तृत्व अनेक वेळा अनुभवास येते. कर्वेबाईंच्या जीवनप्रवासात वरील विधानाची प्रचीती येते. स्वातंत्र्यपूर्व काळात बाईंच्या घरचे वातावरण स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या चळवळींनी भारलेले होते. प्रबुद्ध भारत ही स्वातंत्रोत्तर भारताची प्राथमिकता असणार आहे. त्यासाठी संस्कारित समाजाची जडणघडण करू शकणारी शिक्षणव्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्या दृष्टीने त्यांच्या मनाची मशागत होत होती.
१९४८ मध्ये डॉ. कर्वे यांनी मुंबईच्या महाविद्यालयात फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली व कर्वे कुटुंबीय ठाण्यात वास्तव्यास आले. पुण्यासारख्या शिक्षणप्रधान शहरातून ते आले होते. तेव्हा त्या दर्जाची शिक्षणव्यवस्था ठाण्यात नव्हती. कर्वे कुटुंबीयांना ती उणीव भासू लागली. तेव्हा नौपाडय़ातील ब्राह्मण सोसायटीत भाऊ सहस्रबुद्धे एक प्राथमिक शाळा चालवीत असत, पण वार्धक्यामुळे तेव्हाच्या लोकल बोर्डाने त्यांना शाळा बंद करण्याची सूचना दिली. तेव्हा पालकांच्या पुढे यक्ष प्रश्न उभा राहिला. कर्वेबाईंचा स्वभाव परिस्थिती आहे, तशीच स्वीकारण्याचा कधीच नव्हता. जीवनात येणारी प्रत्येक अडचण एक संधी मानून त्यावर मात करण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. नौपाडय़ातील शाळा बंद होणार हे समजल्यावर त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला. ‘आपणच शाळा काढली तर !’ उत्तम तऱ्हेने शाळा चालवली तर सगळ्याच पालकांची सोय होणार होती. एक समाजकार्य म्हणून हे क्षेत्र निवडावे, असे त्यांना सतत वाटत होते. नौपाडय़ातील हिंदू भगिनी मंडळातील कामामुळे त्या येथील समाजाशी परिचितही झालेल्या होत्या. समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून स्त्रियांच्या कार्यक्षेत्राविषयी मालतीबाई बेडेकरांसारख्या विदुषींकडून चर्चाही होत होती. नवीन पिढीला वळण लावण्याचे काम स्त्रियांनी आपल्या खांद्यावर घ्यावे, देशाचे ऋण मानून या कार्यात सहभागी व्हावे, यासाठीचा पुरस्कार समाजधुरीणांकडून होत होता. बाईंनी कोणताही पूर्वानुभव नसताना स्वत:मधील दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही शुभ कार्यास समाजातील मान्यवरांचा आशीर्वाद मिळतो, सहकार्य मिळते. त्याचप्रमाणे नौपाडय़ातील कर्वेबाईंच्या या नव्या शाळेसही प्राथमिक विभागाची मान्यता, जागा, शिक्षकवृंद अशा सर्व गोष्टी उपलब्ध होत गेल्या. ब्राह्मण सेवा संघ, हितवर्धिनी सभा (उमा निळकंठ व्यायामशाळा) या दोन संस्थांनी उत्तम सहकार्य केले. शाळेला समाजाने स्वीकारले. शाळा विद्यार्थीप्रिय झाली.
गरज ही जशी शोधाची जननी असते, तशीच ती प्रगतीची दिशादर्शकही असते. मोठय़ा भावंडांबरोबर येणारी त्यांची लहान भावंडे शाळेच्या पायऱ्यांवर बसून राहत. शाळेच्या वातावरणात रमणारी त्यांची मने आणि वर्गात बसून काही तरी नवीन शिकण्याची गरज बाईंना पूर्व प्राथमिक विभाग सुरू करण्यास प्रवृत्त करती झाली.
६ जून १९५२ हा प्राथमिक शाळेचा आरंभदिन ठरला. चार इयत्ता मिळून शाळेत ४६ विद्यार्थी दाखल झाले. पुढे १९५५ मध्ये माँटेसरी विभाग आणि १९६४ मध्ये माध्यमिक विभागाची सुरुवात झाली. पुढे क्रमश: वर्ग वाढत जाऊन शाळेला पूर्णत्व प्राप्त झाले.
जागेची वाढती गरज, स्वतंत्र व सर्व सोयींनी युक्त इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, चित्रकला वर्ग या आवश्यक असणाऱ्या गोष्टी व त्यासाठी निधीची आवश्यकता ही नवीन आव्हाने बाईंनी स्वकर्तृत्वाने पार केली. आरंभी म्हटल्याप्रमाणे दर्जेदार शिक्षणाचा ध्यास व त्यासाठीच्या रचना या गोष्टी बाई जातीने करून घेत असत. शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग, वक्तृत्व, पाठांतर, क्रीडा, कला या सर्वागांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची काळजी बाई जातीने घेत असत. केवळ पुस्तकी ज्ञानावर विसंबून चतुरस्र व्यक्तिमत्त्वाची घडण होऊ शकत नाही, यावर त्यांचा विश्वास होता.
कर्वेबाई ‘शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्’ हे संस्कृत वचन त्या नेहमी आठवत व त्यासाठी आग्रह धरीत. १९८९-९० मध्ये शाळेचा बाजूला असलेला व शाळेच्या विस्तारासाठी आरक्षित असलेला भूखंड ताब्यात आल्यावर त्यांनी क्रीडा केंद्राचा आराखडा तयार केला. उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू न करता शरीराची मशागत करू शकणारे सुसज्ज क्रीडा संकुल, कलादालन, विज्ञान प्रबोधिनी, व्हच्र्युअल क्लासरूम किंवा ई-लर्निग, माहिती तंत्रज्ञान शिक्षण, परकीय भाषा शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, इंग्रजी भाषा संवादकौशल्य आणि त्यासाठी प्रज्ञा भाषा केंद्राची निर्मिती केली.
उपक्रम, अनुभूती, सहभाग, संस्कार, संवाद, सहविचार ही ठळक वैशिष्टय़े बाईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा