वसईच्या जडणघडणीत अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे योगदान आहे. पन्नासच्या दशकात स्थापन झालेल्या निर्मळ येथील जीवन विकास मंडळ ही अशीच एक संस्था. विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या या संस्थेचा नुकताच हीरकमहोत्सवी वर्ष साजरे झाले. वसईतील नागरिकांना आर्थिक सक्षम बनवण्याबरोबर त्यांचा सामाजिक विकास घडवण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली. बघता बघता संस्थेचे रोपटे वाढले आणि विविध क्षेत्रांत त्यांनी ठसा उमटवला.
जीवन विकास मंडळ, निर्मळ
१९५८ मध्ये त्या वेळच्या विषम समाजस्थितीची जाणीव होऊन त्यावेळी ज्येष्ठ संस्थापक, कार्यकर्ते एकत्र आले आणि एका संस्थेचा पाया रोवला. ही संस्था होती जीवन विकास मंडळ. त्याची स्थापना १४ सप्टेंबर १९५८ या पवित्र क्रुसाच्या सणाच्या दिवशी त्यावेळचे होलीक्रॉसचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर जोसेफ व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यंदा मंडळ आपला हीरकमहोत्सव साजरा करत आहेत. शिक्षण आणि आर्थिक सक्षमता ही त्या वेळच्या समाजाची गरज होती. त्यामुळे येथील समाजाला ज्ञानसमृद्ध करण्याच्या दृष्टीने १९६० साली ग्रंथालयाची तर लोकांची आर्थिक कुचंबणा दूर करण्यासाठी सहकार फंडाची स्थापना १९६२ साली झाली. त्यानंतर १९८८ साली जीवन विकास पतपेढीचे स्थापना करण्यात आली. सध्या या पतपेढीच्या संपूर्ण उत्तर वसईत पाच शाखा आहेत. कोकण विभागातून या पतपेढीस सहकारभूषण या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. सध्या जीवन विकास मंडळाच्या प्रमुख विश्वस्तपदी सिल्वेस्टर परेरा, अध्यक्षपदी सुनील रॉड्रिग्ज, सरचिटणीस ख्रिस्तोफर रिबेलो, खजिनदार नेल्सन दोडती हे आहेत.
चेतना पुस्तकालय
चेतना पुस्तकालय हे मंडळाच्या कार्याचा मानबिंदू आहे. १९६० साली पुस्तकालयची स्थापना करण्यात आली. दर्जेदार आणि वाचनीय ग्रंथसंपदा, संदर्भ साहित्य व सेवा सुविधांनी हे वाचनालय परिपूर्ण आहे. ग्रंथालयात महिला व बालकांसाठी स्वतंत्र अद्ययावत कक्ष तयार करण्यात आला आहे. जास्तीतजास्त वाचक आणि विशेषत: बालकांना आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयातील मांडणी व आसन व्यवस्था आकर्षक करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. या वाचनालयात सर्व भाषिक मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, दिवाळी अंक आहेत, तर २६ हजारांहून जास्त ग्रंथ, पुस्तके आहेत. संदर्भग्रंथांची ५००० पुस्तके आहेत. इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी सायबर कॅफे असून त्याचा वापर विनामूल्य उपलब्ध आहे. वसई तालुक्यातील पहिली ‘अ’ वर्गीय ग्रंथालय असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय (ग्रामीण भाग) पुरस्कार सलग दोन वेळा त्यांना मिळाला आहे.
जीविका विवेक मंच
दैनंदिन जीवनात अनेक ज्वलंत प्रश्नांवर सर्वसामान्य नागरिकांना योग्य भूमिका तयार करण्यासाठी तसेच विचार प्रवृत्त करण्यासाठी तसेच फेसबुक, ट्विटरच्या या आधुनिक जमान्यात व्यक्त होऊ देण्यासाठी मंडळाने उचललेले हे पुरोगामी पाऊल आहे. दर रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत अनेक ज्वलंत प्रश्नांवर आणि चालू घडामोडींवर चर्चा होते. या चर्चेत कोणीही लहानथोर भाग घेऊन त्या त्या विषयावर आपले मत मांडू शकतात. वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, विज्ञान, समाजकारण, राजकारण, धर्म असे विविध मुद्दय़ांवर प्रत्येक रविवारी चर्चा होत असते.
जीविका शिक्षण निधी
पतपेढीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या जीविका शिक्षण निधीतून समाजातील दुर्बल घटकांना तसेच पतपेढीच्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्याची योजना चालू केली आहे. या निधीचा सुयोग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने व पतपेढीच्या सर्व स्तरावरील सभासदांना यात सामावून घेण्याच्या दृष्टीने शिक्षण निधीतून प्राथमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण व पदवी पदव्युत्तर शिक्षण यासाठी यासाठी अर्थसाहाय्य देण्याकरिता या निधीतून तीन स्तरांवर आर्थिक मदत देण्याची योजना आहे.
कला-क्रीडा आणि महिला विभाग
तरुणांसाठी खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेमार्फत क्रीडास्पर्धा भरवण्यात येतात. शाळांना आर्थिक साहाय्य केले जाते. कला-क्रीडा विभाग म्हणजे युवा विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सध्या मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. महिला विभागामार्फत अनेक जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येतात. हा विभाग पूर्णत: महिला सांभाळत असून यामध्ये एकूण १०१ महिला सभासद आहेत. महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने मंडळाचा महिला विभाग १९९० पासून कार्यरत आहे.