मटक्याचा अड्डा चालवणाऱ्या एका गुंडाने पोलीस ठाण्यात येऊन घातलेला हैदोस ठाणे पोलिसांची इभ्रत धुळीला मिळवणारी घटना आहे. पण पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारी ही पहिलीच घटना नाही. अशाच अनेक प्रकरणांत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, या सर्वाबाबत पोलिसांचे उत्तर अद्याप एकच आहे.. चौकशी सुरू आहे..
कोण कुठला तो बाबू नाडर त्याने गेल्या आठवडय़ात ठाणे पोलिसांच्या पाच शिपायांना बेदम चोपले. तेही पोलीस ठाण्यात जाऊन. या शिपायांनी नाडर याच्या मटक्याच्या अड्डय़ावर जाऊन दरोडा टाकला, असा आरोप आहे. नाडर कुणी ठाण्यातील महान समाजसेवक वगैरे नव्हता. मटकाकिंग अशी त्याची ओळख. रात्री आपल्या अड्डय़ावरील पैसे चोरणारे पोलीस असल्याचे कळताच या नाडरच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने पोलीस ठाण्यात जाऊन अटकेत असलेल्या शिपायांना चोप दिला. नुसता चोप नाही, तर अख्खे पोलीस ठाणे डोक्यावर घेतले म्हणे. पोलिसांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. नाडरने चोप दिला हे खरे, पण शिपायांना नव्हे तर त्याच्या अड्डय़ावर पोलिसांना बोलविणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीला. पोलीस ठाण्याच्या आवारातच मटकाकिंगने हैदोस घातला हे मात्र पोलिसांनीही मान्य केलेय. या सगळ्याची आता चौकशी सुरू आहे.
असेच काहीसे अमित काळे यांच्याबद्दल घडले होते. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मुंब््रयातील रशीद कंपाउंड परिसरात पोलिसांनी ठरल्याप्रमाणे कोम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेचे नेतृत्व केले ते साहाय्यक पोलीस आयुक्त अमित काळे यांनी. या मोहिमेमुळे रहिवाशांना नाहक त्रास झाल्याचा आरोप करत त्याच रात्री स्थानिक आमदाराने मुंब्रा पोलीस ठाणे गाठले. गर्दीची सहानभूमी मिळविण्यासाठी काळे यांना सर्वासमोर यथेच्छ शिवीगाळ गेली. अगदी काळे यांच्या आई-बहिणीचा उद्धार केला. काळे यांची मोहीम चुकली होती का..हा तपासाचा भाग असू शकतो. मात्र, आमदाराने गाजवलेली मर्दुमकी मती गुंग करणारी होती. पोलिसांकडे या सगळ्याचे चित्रीकरण आहे. पुरावे वगैरे म्हणतात ते तर खंडीभर असावेत. चौकशी वगैरे झाली. पुढे काळे यांची बदलीही झाली..पण त्या शिवराळ आमदाराचे कुणीच काही वाकडे करू शकले नाही. चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे.
क्राइम बँ्रचचे वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांचीही सध्या अशीच चौकशी सुरू आहे. गुन्ह्य़ांचा छडा लावणे, खबरे पेरणे, माहिती मिळवून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे हे खरे तर गुन्हे अन्वेषण पथकाचे मुख्य काम. मात्र, शहाजी जाधवांचे काही भलतेच सुरू होते. ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्द नसलेल्या वाडय़ातील एका भेसळीप्रकरणी जाधवांच्या हाती काही सुगावे लागले. या प्रकरणी त्यांच्या पथकाने काहींना ताब्यातही घेतले. रॉकेल, पेट्रोल भेसळीचे असे अनेक अड्डे खरे तर शिळ-महापे रस्ता, मुंब्रा, डायघर, कल्याण परिसरात पावलोपावली आढळून येतात. परंतु जाधव यांची नजर पडली ती वाडय़ावर. असो मुद्दा तो नाही. तर ताब्यात घेतलेल्यांकडून लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जाधव यांच्यासह तिघा हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे. अटकेत असलेल्या काही हवालदारांकडे फॉच्र्युनर, इन्होवा अशा आलिशान गाडय़ा सापडल्या आहेत. येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन या नयनरम्य परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या लेडीज बारमध्ये यापैकी काहींची भागीदारी असल्याचाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. अर्थात चौकशीनंतर आणखी बरेच काही बाहेर येण्याची शक्यता आहेच.
मुंब््रयाच्या पल्याड शिळ-डायघर भागात लकी कंपाउंड परिसरात दोन वर्षांपूर्वी एका बेकायदा इमारतीखाली ७४ निष्पापांचा बळी गेला. ही घटना घडण्यापूर्वी दोन महिन्यांआधी याच भागातील पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांना लाच प्रकरणात अटक झाली होती. दिव्यात उभ्या राहणाऱ्या बेकायदा बांधकामांना अभय देण्यासाठी या दोघांना पैसे हवे होते. ठाणे महापालिकेत साहाय्यक आयुक्तपदी कार्यरत असणारे शाम थोरबोले यांचे वसुली दलाल म्हणून हे दोघे काम करत असल्याचे पुढे तपासात उघड झाले. थोरबोले यांच्याकडे दिव्यातील बेकायदा बांधकामे रोखण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती. खरे तर हे काम जिकिरीचे. मग थोरबोले यांनी एक शक्कल लढवली. आपल्या हद्दीत कुठे काय सुरू आहे हे तपासण्यासाठी त्यांनी चक्क दोन पोलीस हवालदार नेमले. या दोघांनी थोरबोले यांना बांधकामांची माहिती द्यायची आणि बांधकाम पाडण्याचा देखावा उभा केला जायचा. कारवाई थांबविण्यासाठी मग बोली ठरायची. थोरबोले यांना हवी असलेली रक्कम वसूल करण्याची जबाबदारी त्या दोघा हवालदारांची. मिळालेल्या रकमेचा किती हिस्सा कोणाचे हेही ठरलेले. या सगळ्या मंडळींना रंगेहाथ ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांच्यावर आरोपपत्र निश्चित झाले आहे. लकी कंपाउंड दुर्घटनेत ठाणे महापालिकेचे बरेचसे अधिकारी-कर्मचारी गजाआड गेले. मात्र, स्थानिक पोलीस ठाण्यातील एखाददुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली. खरे तर थोरबोले प्रकरणामुळे बेकायदा बांधकामांना पोसणारी महापालिका आणि पोलिसांची साखळी आधीच उघड झाली होती. तरीही लकी कंपाउंड दुर्घटनेचा तपास पोलीस ठाण्यांच्या दिशेने का सरकला नाही, यासाठीही एक वेगळी चौकशी समिती स्थापली जाऊ शकते.
गेल्या दीड-दोन वर्षांत ठाणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगणारी ही काही मोजकी उदाहरणे आहेत. या काळात सोनसाखळी चोऱ्या, घरफोडय़ा यांसारख्या सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरविणाऱ्या घटनांची तर मोजदादच करायला नको. मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या, भाजी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या, बस पकडण्यासाठी थांब्यावर उभ्या असणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून तरुणांच्या टोळ्या धूम ठोकू लागल्या आहेत. हे सगळे रोखणे पोलिसांच्या हाताबाहेर जाऊ लागलंय की काय, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. गुन्हे अन्वेषण पथकाची वाटचाल कशी सुरू आहे हे तर शहाजी जाधव यांच्यासारख्या मान्यवरांनी यापुर्वीच दाखवून दिले आहे. दहीहंडी वगैरेसारख्या उत्सवांमध्ये वाद्यांचा आवाज वाढवाल तर याद राखा, असा दम देऊन सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनातील भावना व्यक्त करू पाहणाऱ्या लक्ष्णीनारायण यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आवाज पुढे का क्षीण झाला हे न उलगडणारे कोडे आहे. खरे तर या घटनाक्रमाचीही चौकशी व्हायला हरकत नव्हती. परंतु आपणच आपली लक्तरे वेशीवर टांगू नयेत म्हणून बहुधा ती झाली नसावी. तथाकथित राजकीय आंदोलने, ढणढणाट करणारे उत्सव, त्यावर कुणाचाही नसलेला वचक या सगळ्यात पिळला जाणारा ठाणेकर हे तर नित्याचे बनले आहे. तीन वर्षांपूर्वी महापौर निवडणुकीच्या तोंडावर भाजपची एक नगरसेविका गायब झाली आणि राजकीय आंदोलन सुरू झाले. बेकायदा बांधकाम पाडायला सुरुवात होताच अशाच पद्धतीने ठाणे बंद पाडत टीएमटीच्या बसगाडय़ा फोडल्या गेल्या. ही नगरसेविका कशी गायब झाली आणि अचानक कशी अवतरली त्याचीही म्हणे चौकशी सुरू झाली होती. अगदी काल-परवा घडलेल्या दिवा रेल्वे स्थानकातील आंदोलनाचे गूढही अद्याप कायम आहे. प्रवाशांचा संताप आणि त्यानंतर घडलेले बरेच काही यांमध्ये निश्चितच काहीतरी दडले असावे, असा संशय खुद्द पोलीस दलातही व्यक्त होताना दिसतोय. प्रवाशांच्या संतापाला हिंस्र वळण देणारे काही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यातही आलेत. या दंगलीची चौकशी सुरू आहे. मुंब््रयातील एका मुलाचे मारहाण प्रकरण थेट जिहादच्या पातळीवर नेऊन ठेवल्याचा वादही रंगतोच आहे. या घटनेचीही चौकशी करण्याचे आदेश दिले गेलेत. दोन दिवसांपूर्वी कासारवडवली भागात एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. विनयभंग करणारे तरुण एका विशिष्ट धर्माचे होते, असे सांगतात. भररस्त्यात मुलीला छेडले म्हणून या हट्टय़ाकट्टय़ा तरुणांना जाब विचारण्याचा प्रयत्न झाला. त्यावर तरुणांनी तलवारी काढून दहशत पसरवली. ठाण्यासारख्या सांस्कृतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या शहरात हे असे का होते आहे, याचीही कदाचित चौकशी केली जाईल. बाबू नाडरची होतेय अगदी तशीच..
जयेश सामंत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा