अर्चना राऊत

नमस्कार मंडळी, काय मग पावसाळा एन्जॉय करत आहात की नाही? श्रावणालाही सुरुवात झाली आहे. श्रावण आला की बरेच जण मांसाहार वर्ज्य करून शाकाहार घेतात. हा शाकाहार घेण्यामागे धार्मिक कारण जरी असले तरी वैज्ञानिक दृष्टिकोनदेखील आलाच. ते असो! आपणास काय शाकाहार असू दे की मांसाहार, पौष्टिक, स्वादिष्ट आणि तितकीच सात्त्विक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

वसईतील समाज हा विविध जाती-पंथातील लोकांनी मिळून समृद्ध झाला आहे. असाच वसईतील समाज म्हणजे पांचाळी समाज होय. या समाजातील लोक लोहारकाम, सुतारकाम तसेच मोठय़ा प्रमाणावर डायमेकिंगचा व्यवसाय करतात. आपल्या कामासोबतच विचारांनी देखील समृद्ध असलेल्या या समाजातील ज्ञातिबांधवांना मांसाहार जितका प्रिय आहे तितकाच शाकाहारदेखील अत्यंत प्रिय आहे. या समाजातील अनेक पदार्थ अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट असतात. त्या अनेक पदार्थापैकी आपण आज अतिशय सात्त्विक, पौष्टिक आणि तितकाच स्वादिष्ट पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे ‘मोळे मूग’ होय.

श्रावण महिना आला की पांचाळी स्त्रियांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा उत्साह असतो. श्रावणातील प्रत्येक व्रतवैकल्ये त्या आवर्जून करतात. काही जण तर चातुर्मासदेखील करतात. मग या चातुर्मासात कांदा, लसूण तसेच तामसी पदार्थ वर्ज्य असतात. मग या पूर्ण चातुर्मासात रोज मोळे मूग, भात किंवा पानगी आणि हळद मिठाचे लिंबाचे लोणचे असाच आहार घेतला जातो.

या मोळे मुगाची गंमत म्हणजे श्रावण करणारे लोक दर सोमवारी फक्त देवाला मोळे मूग आणि भाताचा नैवेद्य दाखवतात. असे म्हटले जाते की मुगाची प्रवृत्ती ही शांत आणि सात्त्विक असते म्हणून तांडवनृत्य करून आपले रौद्र रूप धारण करणाऱ्या शिवशंकराला मोळे मुगाचा नैवेद्य अर्पण केला जातो. पांचाळी समाजातील अनेक कुटुंबातील महिला या दिवशी म्हणजेच श्रावणी सोमवारी एकत्र येऊन मोळे मूग आणि भात असा मस्त बेत आखतात. तुम्ही विचार कराल मोळे मूग आणि भात हा कसला एकत्रितरीत्या येऊन बेत आखण्याचा पदार्थ? पण कसं आहे, पूर्वी महिला फक्त घर, चूल आणि मूल या चौकटीतच वावरायच्या. आपल्या या रोजच्या दिनक्रमातून बाहेर पडण्यासाठी श्रावणी सोमवारचे निमित्त असायचे. मग काय मत्रिणी, जावा, नणंदा एकत्र येऊन गप्पागोष्टींची मैफल जमायची. एकमेकींशी गप्पा मारून मनातील सुखदु:खाची देवाणघेवाण व्हायची. तेवढाच काय तो मनाला विरंगुळा असायचा.

आज या समाजातील स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या आहेत, नोकरीसाठी बाहेर पडत आहेत, विभक्त कुटुंब पद्धतीचे पेव सर्वत्र असल्याने हम दो हमारे दो असे असले तरी अजूनही पांचाळी महिला या श्रावणी सोमवारी एकत्र येऊन मोळे मुगाचा बेत आखतात. गप्पागोष्टींना उधाण आणतात आणि सुखदु:खाची देवाणघेवाण करतात. म्हणजेच आजच्या धावत्या युगात आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न पांचाळी ज्ञातिबांधव कसोशीने करतात.

तुम्ही येत्या श्रावणी सोमवारी मोळे मूग करून आपल्या कुटुंबीयांसोबत त्याचा आस्वाद नक्की घ्या.

मोळे मूग बनविण्याची कृती

’ साहित्य : एक वाटी भिजवलेले मूग, पाव वाटी साजूक तूप, तीन वाटी नारळाचे दूध, दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट, एक छोटा चमचा साखर, ४ ते ५ काळीमिरी, एक इंच आल्याचा तुकडा, १ ते २ हिरव्या मिरच्या, ४ ते ५ आंबोशी (कच्च्या कैरीच्या लांबट फोडी करून त्याला मीठ लावून कडक उन्हात वाळवतात. या आंबोशी वर्षभर टिकतात.), चवीपुरतं मीठ, सैंधव मीठ वापरले तरी चालेल.

’ कृती : सर्वप्रथम काळीमिरी, आलं आणि हिरव्या मिरच्या यांचे वाटण करून घ्यावे. एका कुकरमध्ये साजूक तूप गरम करून त्यात भिजवलेले मूग आणि काळीमिरी, आलं, मिरचीचे वाटण टाकून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, नारळाचे दूध, साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून आंबोशी घालावी व कुकरला एक किंवा दोन शिट्टय़ा घ्याव्यात. मोळे मूग हे थोडे सैलसरच असतात.

वाफाळता भात, त्यावर गरमागरम मोळे मूग आणि वरून साजूक तुपाची धार.. बाहेर मस्त श्रावणातला पाऊस.. आह! बेत तर जमणारच!!