शीळ फाटा विभाग
डोंबिवलीची विकासाची अंतर्गत वाढ खुंटल्याने शहराच्या वेशीवर राहण्यास येणाऱ्या रहिवाशांचा आकडा एव्हाना काही लाखांच्या घरात पोहचला आहे. मात्र या भागातील दैनावस्था येथील रहिवाशांच्या हळूहळू लक्षात येऊ लागली आहे. हाच अनुभव शीळ फाटा, काटई, नेवाळी, नेतिवली या २७ गावांच्या परिसरात उभ्या राहिलेल्या निवासी संकुलांमधील रहिवासी घेत आहेत.
लोढा हेवन, रिव्हरवुड पार्क या कल्याण-शीळ फाटा मार्गावरील सर्वात जुन्या वसाहती. सुरुवातीला या वसाहतीचा साज काही और होता. आता मात्र चित्र बदलू लागले आहे. २७ गावांच्या परिसरात उभ्या राहिलेल्या नवीन वसाहती ग्रामपंचायत हद्दीत आहेत. ग्रामपंचायतींना घर, पाणीपट्टी वसूल करणे याव्यतिरिक्त भव्यदिव्य खर्च करून गाव, वसाहतींना नागरी सुविधा देण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून नागरी सुविधा मिळणे दूरच. ग्रामपंचायत हद्दीत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. नवीन वसाहतींना एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवरून पुरवठा केला जातो. अनेक ग्रामपंचायतींची एमआयडीसीची लाखो रुपयांची पाणी देयकाची थकबाकी थकवली असल्याने एमआयडीसीने पाणीकपात केली आहे. त्यामुळे घर अवाढव्य, १०० सोसायटय़ा असल्या तरी सोसायटीला पाणी करंगळीएवढे येते.

परिसराच्या समस्या
’डोंबिवली रेल्वे स्थानकातून लोढा हेवन परिसरातील नवीन वसाहतींकडे जाताना रिक्षा, बससाठी धावाधाव करावी लागते. रात्रीच्या वेळेस स्थानकापासून या भागात जाणे म्हणजे मोठे दिव्य असते.
’या वसाहतींमधील रस्ते पंचवीस वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे.
’परिसरात स्मशानभूमी नसल्याने वसाहतीबाहेरील एखाद्या खडकाचा शोध घेतला जातो.
’चार ते पाच हजार लोकवस्तीच्या वस्त्या, पण उद्याने बगीचे, मनोरंजननगरीसारखी साधने नाहीत.

आम्ही इकडचे की तिकडचे?
विठ्ठलवाडी
उल्हासनगरचे श्रीराम परिसराकडून कल्याण पूर्वेच्या भागातील विठ्ठलवाडी परिसराची हद्द सुरू होत असली तरी उल्हासनगर जवळ असल्याने या भागातील नागरिकांना आपण उल्हासनगरमध्ये येतो की कल्याण-डोंबिवलीमध्ये असा प्रश्न पडतो. जसा हा प्रश्न नागरिकांना पडतो तसाच काहीसा प्रश्न महापालिका अधिकाऱ्यांना पडत असल्याची शक्यता असल्यामुळे या भागाकडे दोन्हीपैकी कोणत्याही महापालिकेने आजपर्यंत लक्ष दिलेले नाही. त्यामुळे या भागातील अनेक महत्त्वांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे.
विठ्ठलवाडी परिसर हा भाग दाट चाळींचा असून त्यामध्ये खडेगोळवली आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसर येतो. या भागातील अरुंद रस्ते आणि अतिक्रमणे यामुळे नागरिकांना चालणेसुद्धा कठीण बनले आहे. रस्त्याची अवस्थाही खड्डय़ांची असून कित्येक वर्षे याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून दर वर्षी त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यानंतर त्याची अवस्था विदारक बनते. चाळींचे साम्राज्य वाढत असून पाण्याची चणचण नेहमीचीच आहे. महापालिकेच्या शाळा सोडल्यास या भागात पुरेशी प्रशासकीय यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचे दिसून येते. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडय़ा नाहीत की कचराकुंडय़ा नाहीत. त्यामुळे या परिसरातील घनकचऱ्याचीसुद्धा समस्या मोठी आहे. स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर असून सार्वजनिक शौचालयांची संख्यासुद्धा कमी आहे. त्यामुळे उघडय़ावर किंवा रेल्वे रुळांवर प्रातर्विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा परिसरातील नागरिकांना शौचालयास जाणेही जीवघेणे ठरते. सांडपाण्याचा निचराही पुरेसा होत नसल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा मिळवण्यासाठी उल्हासनगर गाठावे लागते.