दर पाच मैलांवर भाषा आणि संस्कृती बदलते असे म्हणतात. नागरीकरणाच्या रेटय़ातही हे वास्तव बदललेले नाही. ठाणे जिल्ह्य़ातील एकमेकांशेजारी असलेल्या शहरांमध्ये कमालीचा फरक जाणवतो. स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीतून पाकिस्तानात गेलेल्या सिंध प्रांतातून भारतात आलेल्या सिंधी निर्वासितांना तत्कालीन कल्याण तालुक्यातील लष्कराच्या बराकींमध्ये आश्रय देण्यात आला. तेच आताचे उल्हासनगर शहर. अल्पावधीतच महाराष्ट्रातील एक व्यापार-उद्योगाचे शहर म्हणून उल्हासनगर ओळखले जाऊ लागले. या शहरात सिंधी भाषकांची बहुसंख्या असली तरी महाराष्ट्रीयांची संख्याही लक्षणीय आहे. विशेषत: कॅम्प नंबर चारमध्ये मराठी भाषक मोठय़ा प्रमाणात आहेत. या मराठी भाषकांची वाचनाची भूक भागवावी या हेतूने मनोहर पुरणकर, राकेश कांबळी, प्रकाश जाधव, ईश्वर पाटील, सुरेश वारंग या त्या वेळच्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन १ डिसेंबर १९८२ ज्ञानदा सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावीत झालेल्या तरुणांनी या भागात शिवसेना शाखेची स्थापना केली. पुढे शिवसेनाप्रमुखांनीच या विभागात वाचनालय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार कार्यकर्त्यांनी प्रत्येकी पन्नास रुपये गोळा करून शाखेच्याच  जागेत ज्ञानदा वाचनालयाची स्थापना केली. १० ऑक्टोबर १९८३ रोजी ग्रंथालयास मान्यता मिळाली. या ग्रंथालयाच्या उद्घाटनासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या जवळची काही पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली आणि ग्रंथालयाच्या ग्रंथप्रसाराच्या कार्याला सुरुवात झाली. पहिल्या महिन्यात ग्रंथालयात केवळ एक सभासद होता. सध्या शाखेच्या भाडय़ाच्या जागेत ग्रंथालय परिसरातील नागरिकांना ग्रंथसेवा पुरवत आहे. ग्रंथालयात सध्या ७ हजार ९५६ एवढी पुस्तकसंख्या असून २७८ सभासद आहेत. कथा, कादंबऱ्या, राजकारण, इतिहास आदी विषयांवरील विविध पुस्तके ग्रंथालयात वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. ग्रंथालयाला सरकारकडून  १ लाख ६० हजार रुपये अनुदान मिळते. त्यातून दरवर्षी २५ ते ३० हजार पुस्तकांची खरेदी केली जाते. आज एवढय़ा वर्षांनंतर पुस्तकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत ग्रंथालयाची जागा अपुरी पडत आहे. मात्र तरीही ज्ञानदा वाचनालयाने उल्हासनगर भागात वाचनाची संस्कृती जपण्यासाठी आपली ग्रंथसेवा अविरतपणे सुरू ठेवली आहे. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी लहान मुलांना विनामूल्य ग्रंथसेवा ग्रंथालयातर्फे पुरवली जाते. ग्रंथालयाची जागा अपुरी असली तरी विद्यार्थ्यांना गरज असेल तेव्हा ग्रंथालयाची जागा अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली जाते. जागा अपुरी पडत असल्याने पुस्तकांची विषयानुसार मांडणी केली नसली, तरी काचबंद लाकडी कपाटात पुस्तकांची सुटसुटीत मांडणी केली आहे. मुक्तद्वार वाचनालय असल्याने वाचक त्यांना हवे असलेले पुस्तक स्वत: शोधून घेऊ शकतात.  ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांचा कल अनुवादित पुस्तकांकडे जास्त असल्याचे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल दर्शना गावडे यांनी सांगितले. वि.स. खांडेकर, पु.ल देशपांडे अशा लेखकांना वाचकांची पसंती आहे. तसेच तरुण वाचक चेतन भगत लिखित पुस्तकांकडे जास्त आकर्षित होत आहेत. जुन्या पुस्तकांचा चांगला संग्रह ग्रंथालयात असून प्रकल्पासाठी अनेकांना या पुस्तकांचा उपयोग होत असतो. पुस्तके ठेवण्याची सध्या जागेची होणारी गैरसोय पाहता शाखेच्या सभागृहातील काही जागेत हे ग्रंथालय स्थलांतरित केले तर अधिक चांगल्या प्रकारे ग्रंथसेवा पुरवली जाऊ शकते.-

– किन्नरी जाघव 

खुलासा –  गेल्या आठवडय़ातील शारदा वाचनालयाच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आता ग्रंथालयाचा ट्रस्टशी काहीही संबंध नाही’ असे छापून आले होते. मात्र हे ग्रंथालय ट्रस्टशी निगडित असून त्यांच्याच इमारतीत वाचनालय चालवले जात असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article of kinnari jadav