वर्षां देवस्थळी, अंबरनाथ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ पूर्व विभागातील मोरिवली पाडय़ातील आनंद उपवन या वसाहतीत राहायला येण्यापूर्वी आम्ही सर्व रहिवाशांनी बरीच स्वप्ने पाहिली होती. कर्ज काढून, आधीचे घर विकून नव्या प्रशस्त जागेत आम्ही राहायला आलो. मात्र लवकरच आमच्या सर्व स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला. कारण सुविधा बाजूलाच राहिल्या उलट विविध प्रकारच्या समस्यांनी आमचे जगणे मुश्कील करून टाकले आहे. आमच्या इमारतीकडे येणारे दोन रस्ते तुंबलेल्या गटाराने अडविलेले आहेत. तिसरा मार्ग चक्क एक भिंत बांधून अडविण्यात आला आहे. विशेष म्हणजे विकास आराखडय़ात असूनही या रस्त्याची अशी दारुण अवस्था आहे. सध्या आम्ही आनंद उपवनवासी तसेच परिसरात नव्याने उभ्या राहिलेल्या इमारतींमधील रहिवासी अक्षरश: कसेबसे वाट काढत ये-जा करीत आहोत. या मार्गावरून धड चालणेही मुश्कील आहे. दुचाकी जेमतेम घरापर्यंत नेता येते. चारचाकी वाहन असेल तर मोठा वळसा घालून चौथ्या मार्गाने यावे लागते. शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा चौथा मार्ग अजिबात सोयीचा नाही. कारण शेअर रिक्षा स्टॅन्डपासून तब्बल १५ मिनिटांची पायपीट करावी लागते. त्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. आमचा हा विभाग सखल भागात असल्याने पावसाळ्यात येथे पाणी तुंबते. सोसायटीतील सांडपाण्याचाही योग्य प्रकारे निचरा होत नाही. त्यामुळे दलदल माजून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पथदिवे नाहीत. यासंदर्भात पालिकेकडे विचारणा केली असता निधी नसल्याचे कारण दिले जाते. एकूणच आमचे आरोग्यच या परिस्थितीमुळे धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाकडे आम्ही जून महिन्यापासून याविषयी पत्र व्यवहार करीत आहोत. केवळ आमचीच सोसायटी नव्हे तर जयदीप टॉवर, साई दर्शन, उत्कर्ष रेसिडेन्सी, तुलसा गार्डन, शनि सोहम्, तेलंगे हाईटस् आदी सोसायटय़ांमधील ३५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदनही पालिकेला दिले आहे. मात्र पालिका प्रशासन आम्हाला न्याय देऊ शकलेले नाही.

वाहतूक पोलिसांअभावी रस्त्यावर काँक्रीट कोंडी

तुषार घोलप, बदलापूर

बदलापूर शहरात सध्या रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू असून याचे स्वागतच आहे. सध्या बदलापुरात ऐन मोक्याच्या ठिकाणी ही सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. पूर्वेला रेल्वे स्थानकापासून कुळगांवाकडे जाणारा रस्ता, तर पश्चिमेला बस स्थानकाकडून बाजारपेठेकडे जाणारा रस्ता, हे दोन्ही रस्ते शहरातील अतिमहत्त्वाचे रस्ते असून या कामांमुळे एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर कोंडी होत असून  वाहतुकीचा भार अन्य रस्त्यांवर पडल्याने हे रस्तेही वाहनांनी गच्च होत आहेत. बदलापूर पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाण पूल सकाळी ठरावीक वेळेत वाहनांनी भरून वाहात असतो. या वाहतुकीचा फटका शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बस, रुग्णवाहिका यांच्यावर पडतो. परंतु दुर्दैवाने या रस्त्यांची वाहतूक कोंडी हटविण्यासाठी वाहतूक पोलीस या वाहनकोंडीच्या आजूबाजूलाही दिसत नाहीत. चौकाचौकांत उभे राहणे जितके आवश्यक आहे, तितकेच वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणीही वाहतूक पोलिसांनी उभे राहणे आवश्यक आहे. कारण शहरातील रस्ते करताना पालिकेने या वाहतूक विभागाचा रस्ते काम सुरू करण्यासाठी ना-हरकत दाखलाही घेतला आहे. त्यामुळे तेथे उपस्थित राहून वाहतूक नियमन करणे ही वाहतूक पोलिसांची नैतिक जबाबदारी आहे.

एसटी प्रवाशांचीसुरक्षितता ऐरणीवर

यशवंत सुरोशे, मुरबाड

कल्याण आगारातून अहमदनगर, पुणे, नंदुरबार, पारनेर या ठिकाणी जाणाऱ्या बस सुटतात. तसेच अन्य ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरून अनेक बसगाडय़ांची वाहतूक सुरू असते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाडय़ा कल्याणहून नगरकडे जाताना टोकावडे, आळेफाटा आणि अन्य थांब्यावर प्रवाशांच्या सोईकरिता थांबतात. हे थांबणे गैर नाही, मात्र कोठे थांबायचे याला काहीच धरबंध राहिलेला नाही. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी ठरावीक गाडय़ा आपल्या हॉटेलसमोर थांबाव्यात म्हणून बांधणी केलेली असते.

टोकावडे या ठिकाणी जिथे बसस्थानक आहे तिथे गटारे तुंबलेली आहेत. गाडीतून उतरल्यावर उग्र वास येतो. सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने महिलांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या महामार्गावरून दिवसभरात सुमारे दोनशे बसगाडय़ांची ये- जा होत असावी. मात्र तरीही या ठिकाणी बसथांब्याची शेड नसावी हे दुर्दैव आहे. हॉटेलच्या मालकांचा त्यांच्या व्यवसायावर भर अधिक असतो. अध्र्या तासासाठी थांबणाऱ्या प्रवाशांनाही आपल्या हक्कासाठी लढावे, असे वाटत नसावे. केवळ स्वच्छतागृह आहेत, म्हणून काही चालक प्रवाशांच्या सोयीसाठी बसथांब्यापासून दूरच्या हॉटेलपाशी बस थांबवतात. टोकावडे येथून प्रवास करताना बससाठी कोठे थांबावे हाच मूलभूत प्रश्न पडतो. त्या मानाने इतर सुविधांचा प्रश्न फारच गौण ठरतो. तसेच रात्रीच्या वेळेस अशा ठिकाणी थांबल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article of loksatta reader