डोंबिवली ते दिवा या दरम्यान नव्याने विकसित झालेल्या कोपर रेल्वे स्थानकामुळे भोपर, कोपर व रेतीबंदर या भागाला महत्त्व प्राप्त झाले. गेल्या तीन ते चार वर्षांत जागेची वाढती मागणी, रेल्वे स्थानकापासून जवळ असल्याने हा भाग मोठय़ा प्रमाणात विकसित झाला आहे. मात्र, या विकासावर पालिकेचे नियंत्रण नसल्याने बहुतांश परिसर बेकायदा चाळींनी व्यापला आहे. यातील काही भाग सीआरझेड क्षेत्रात येऊनही तेथील खाडीकिनारा संरक्षित करण्याची काळजी पालिकेने घेतलेली नाही. परिणामी हा परिसर दिवसेंदिवस बजबजपुरी बनत चालला आहे.
या भागातील काही गृहसंकुलांच्या भोवती मोठय़ा प्रमाणात चाळी उभारण्यात येत आहेत. या चाळींना परिसरातील गृहसंकुलांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांमधून पाणी चोरून वापरले जाते. या बेकायदा बांधकामांमध्ये नगरसेवक, त्यांचे समर्थक यांचे हितसंबंध असल्याने आणि प्रभाग क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी या टोळीत सहभागी असल्याने कारवाई होण्याचा मुद्दाच निकालात निघतो.
डोंबिवली पश्चिमेत महापालिकेचे आरक्षित भूखंड लाटण्यात आले आहेत. चौपाटीसाठी आरक्षित असलेल्या चाळीस एकरच्या पट्टय़ात एक हजाराहून अधिक चाळी उभारण्यात आल्या आहेत. मोकळ्या वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेतीबंदर परिसरातही बेकायदा चाळी, इमारती उभारण्यात येत आहेत. रेतीबंदर भागातून माणकोली उड्डाण पूल होणार आहे. त्यामुळे या जागेचे यापुढील काळातील महत्त्व विचारात घेऊन हा भाग भूमाफियांनी गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. देवीचापाडा, गरीबाचापाडा, कुंभारखाणपाडा, ठाकुर्ली या खाडीकिनाऱ्याच्या गोलाकार भागात अनेक प्रसिद्ध विकासकांनी गृहसंकुले उभारली आहेत. या भागात नागरी सुविधा देताना विकासकांना स्थानिक भूमिपुत्र रस्ते, पदपथ, पोहोच रस्ते करून देण्यात अडथळे आणत आहेत. विकासक लाखो रुपये भरणा करून आपल्या गृहसंकुलांना पालिकेतून पाणी व इतर सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. या सुविधांवर स्थानिक भूमिपुत्र डल्ला मारून दहशत, दमदाटीचा अवलंब करून मिळणाऱ्या सुविधांची वाताहत करतात.
परिसराच्या समस्या
’२००२ पासून येथील रस्त्यांची देखभाल दुरुस्तीच झालेली नाही.
’चाळीस वर्षांपूर्वी लोकांना पालिका प्रशासनाने ज्या सोयी सुविधा दिल्या आहेत त्यावरच आजही येथील नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे.
’जलवाहिन्या अपुऱ्या आहेतच; मात्र त्यासोबत जुन्या जलवाहिन्यांतून गळती होत असल्याने पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. विशेषत: भोपर, नांदिवली पंचानंद, पी अॅन्ड टी कॉलनी परिसरात ही समस्या आहे.
’पालिकेच्या एक-दोन शाळा सोडल्या तर येथे शाळा नाही. त्यामुळे येथील मुले पायपीट करत डोंबिवलीत शाळेसाठी येतात. त्यांना चालायला रस्ता नाही. पावसाळ्यात चिखलातून वाट काढत घर गाठावे लागते.
’परिवहन बसेसची सुविधा नसल्याने रिक्षाशिवाय पर्याय नाही. रिक्षाचालकही अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात.
’रस्त्यांवर दिवे नाहीत की विजेचाही पुरवठा सुरळीत नसल्याने रात्री नऊनंतर सर्व सामसुम होते.
’येथील नागरिकांना
कोपर अगदी हाकेच्या अंतरावर असूनही तेथे
जाता येत नाही. त्यांना मोठा वळसा घालून डोंबिवली गाठावी लागते. भोपर खाडीवर पूल उभारण्याची मागणी अद्याप पूर्णत्वास आलेली नाही.
तीर्थस्थानाकडेही दुर्लक्ष
टिटवाळा हे कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील एक तीर्थस्थान आहे. या ठिकाणच्या श्रीमहागणपतीच्या दर्शनासाठी विविध भागांतून भाविक येत असतात. टिटवाळा म्हणजे शहराचा भाग असले तरी एक मोकळे गाव होते. आजूबाजूच्या टेकडय़ा, माती, गवत, तलाव असे मोकळे निसर्गरम्य दृश्य या भागात दिसत होते. टिटवाळ्याचे हे नैसर्गिकपण जपण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
टिटवाळ्याला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या गर्दीचा महापालिकेसाठी काही लाभ उठवता येईल का, म्हणून प्रशासनाने या भागात मनोरंजननगरी, पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून काही सुविधा उपलब्ध करून दिल्या असत्या तर येथून मोठा महसूल मिळाला असता. टिटवाळ्यात पालिकेचे अनेक आरक्षित भूखंड आहेत. या नागरी सुविधांचे भूखंड पालिकेने विकसित केले असते तरी या भागात येणाऱ्या नागरिकांना नागरी सुविधांचा लाभ घेता आला असता. मात्र हे गणित महापालिकेस कधी जमले नाही. त्यामुळे श्रीमहागणपतीमुळे प्रसिद्ध असलेले टिटवाळा-मांडा आज बेकायदा नगरी म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
मागील पाच वर्षांपासून टिटवाळा, मांडा भागातील सरकारी, वनजमिनी, पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर भूमाफिया, स्थानिक नगरसेवकांनी बेसुमार बेकायदा चाळी बांधून हा परिसर विद्रूप करून टाकला आहे. या सगळ्या व्यवस्थेत पालिकेचे अधिकारी, पोलीस, वन विभागातील कर्मचारी अशी मोठी टोळी कार्यरत असल्यामुळे पालिकेसह कोणतीही यंत्रणा ही बेकायदा बांधकामे थोपवण्याच्या मागे लागत नाहीत. टिटवाळा परिसरात मोठाली गृहसंकुले उभी राहत आहेत. या संकुलांचे विकासक टिटवाळ्यातील निसर्गसौंदर्याचा लाभ उठवत संकुलातील रहिवाशांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देत आहेत. रिक्षा, बाजार अशा किटाळलेल्या कोंडाळ्यात वर्षांनुवर्षे टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर अडकला आहे. टिटवाळ्यात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा देणारे श्रीमहागणपती रुग्णालय आहे. पंचक्रोशीतील रुग्ण त्याचा लाभ घेत आहेत.