भरत लक्ष्मण गोडांबे
वनस्पती अभ्यासक
कोणत्याही उत्सवात फुलांची आरास ही त्या सणाला अधिक शोभा आणते. नवरात्रही त्याला अपवाद नाहीच पण या काळात निसर्गही अनेक प्रकारच्या रानफु लांची उधळण, आरास करत असतो. तशी तर निसर्गात वर्षभर फुलं फुलत असतात, पण पावसाळ्यातला बहर हा काही विशेष असतो. नवरात्रीच्या निमित्ताने या काळात फुलणाऱ्या, दिसणाऱ्या अशाच काही रानफुलांचा मागोवा घेऊ.
तेरडा : पाऊस सुरू होऊन साधारण एक महिना झाला की, हे रानफूल फुलायला सुरुवात होते. गुलाबी रंगाचा तेरडा आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतो. याचे अनेक रंगांचे भाऊबंद सफेद, लाल, निळा, जांभळा त्याची लागवड केली जाते.
सोनकी : पिवळ्या धम्मक रंगाची ही छोटी छोटी काहीशी सूर्यफुलाच्या आकाराची दिसणारी फुलं म्हणजे सोनकी. सोनकीचा खरा बहर पाहायचा असेल तर जायला पाहिजे साताऱ्याच्या कास पठारावर. कास पठार आणि त्याच्या आजूबाजूला सोनकी माळरानावर जणू सोनकीचे गालिचे अंथरलेले असतात.
स्मिथिया : मिकीमाऊस चेहऱ्याचा आकाराचा दिसणारा हे फूल त्याला मराठीमध्ये कवळा असे नाव आहे. पिवळ्या रंगाची ही छोटी छोटी फुलं मोठे मोठे डोळे करून आपल्याकडे पाहत असतात असंच वाटतं.
कुरडू : फिकट गुलाबी रंगाचे बाणाच्या टोकाप्रमाणे आकार कुरडूची फुले दसरा, दिवाळी यानिमित्ताने लावल्या जाणाऱ्या तोरणात हमखास असतात. यावर अनेक फुलपाखरे रुंजी घालताना दिसतात.
रानतीळ : फिकट गुलाबी फुलं, उलटय़ा लटकलेल्या भोंग्यासारखी रोपाच्या वरच्या बाजूला पहायला मिळतात. याच्या जोड पाकळ्यांमधील एक पाकळी मोठी आणि गर्द गुलाबी रंगाची असते जणू जीभ बाहेर काढली आहे म्हणून याला महाकाली असेही म्हणतात.
एकदांडी : सफेद पिवळसर झाक असलेले अतिशय गोंडस असे छोटेसे फूल रानोमाळी आपल्याला पाहायला मिळते त्याचे नाव एकदांडी. इंग्रजीमध्ये याला कोट बटन असेदेखील म्हणतात. बटनासारखाच याचा आकार. एका लांब दांडीवर एकच फूल असते म्हणून कदाचित याला एकदांडी असे नाव असेल. फुलपाखरू मात्र मोठय़ा संख्येने आपल्याला या फुलांवर मधुप्राशन करण्यासाठी आलेली पाहायला मिळतात.
रानभेंडी : आपल्या भेंडीची एक जंगलातली बहीण असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. रानभेंडीची फुले फिकट पिवळ्या रंगाची असतात. आतमध्ये गर्द तपकिरी रंग असतो, ज्यावर मधु प्रसारासाठी कीटक मोठय़ा प्रमाणात आकर्षित होतात.
खुळखुळा : त्याला खुळखुळा हे नाव पडलं ते याच्या फळांवरून. त्याची फळं सुकली की ती हवेबरोबर हलताना खुळखुळा वाजल्यासारखा आवाज येतो म्हणून त्याला खुळखुळा असं म्हणतात. फुलं मात्र पिवळ्या रंगाची, रोपाच्या टोकाकडे येतात.
कोरांटी : कोरांटीची फुलंदेखील या काळात रानात फुलतात. रानात आपल्या दोन रंगांची कोरांटी पाहायला मिळते. त्यातला एक म्हणजे गुलाबी रंग आणि दुसरा म्हणजे पिवळा. पिवळ्या रंगाच्या फुलांना फुले असणाऱ्या झाडाला काटे असतात म्हणून त्याला काटेकोरांटी असेही म्हणतात. कोरांटीची फुले अलगद काढावीत आणि त्याचे टोक जिभेवर टेकवावे तो त्याचा मधुरस चाखण्यासाठी.
गणेशवेल : पावसाळ्यात शेपूच्या भाजीसारखी दिसणारी पानं असणारी एक वेल उगवते आणि त्याला भडक लाल रंगाची छोटी छोटी भोंग्याच्या आकाराची लांब देठ असणारी फुलं येतात.
पावसात खूप फुलं फुलतात. पावसाच्या सुरुवातीला काही झाडांना फुले येतात. पावसाच्या मध्यावर काहींना फुलायला सुरुवात होतात आणि मग हा बहर हळू हळू पाऊस जसा संपायला लागतो तसा संपायला लागतो, फळे येतात त्यात बिया तयार होतात. उन्हात ही फळं तडकतात, बिया पडतात आणि मग सुप्तावस्थेत जातात ते थेट पुढच्या पावसाळ्यापर्यंत. गरज आहे ती त्यांचा अधिवास जपण्याची, निसर्गातील आपला हस्तक्षेप कमी करण्याची.