घरात असणाऱ्या फिश टँकमध्ये वेगवेगळ्या माशांची झुंबड असली तरी सगळ्यांपेक्षा काहीतरी निराळे मासे आपल्याकडे असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुळात फिश टँकमध्ये पाळले जाणारे मासे दिसायला आकर्षक, नाजूक असावेत असा आग्रह नेहमीच असतो. कारण घरातील माशांच्या या अस्तित्वामुळे घराची शोभा वाढत असते. आपल्या फिश टँकमध्ये निरनिराळे मासे ठेवण्यासाठी अशा आकर्षक माशांचा शोध सुरू होतो. या माशांच्या प्रजातीमध्ये शारीरिक वैशिष्टय़ांमुळे स्वत:चे वेगळेपण जपलेला आणि लोकप्रिय असलेला मासा म्हणजे फ्लोरान. आकाराने इतरांपेक्षा थोडा मोठा आणि डोक्याकडचा भाग गोल आकारात फुगलेला असल्याने हे फ्लोरानचे शारीरिक वैशिष्टय़ ठरते.
फ्लोरान किंवा फ्लॉवर हॉर्न ही प्रजात नैसर्गिक नाही. मलेशिया, थायलंड आणि तैवान या देशातून वेगवेगळ्या प्रजातींचे मासे एकत्र करून फ्लोरान हे ब्रीड तयार करण्यात आले. मलेशियातील कालोई या मूळ माशाचा डोक्याचा उंच भाग आणि शेपटी यामुळे फ्लोरान माशाला डोक्याकडील उंच भाग आणि शेपटीचे वेगळेपण प्राप्त झाले आहे. तसेच रेड डेविल, अॅरीमॅक, ब्लड पॅरट अशा प्रजातींच्या एकत्रीकरणातून १९९३ साली फ्लोरान ब्रीड तयार केले गेले. यानंतर १९९९ साली वेगवेगळ्या जाती तयार झाल्या. रेग्युलर, पर्ल स्केल, गोल्डन आणि फेडर फ्लोरान अशा चार जातींचा यात समावेश होता. रंगांमध्ये खूप नावीन्य आणि वेगळेपण या माशांमध्ये पाहायला मिळते. साधारण दहा ते बारा वर्षे फ्लोरान मासे जगू शकतात.
गोल्डन मंकी, काम्फा, झेनझू, किंग काम्फा, काम्फा मलाऊ, सिल्क, गोल्डन अॅप्पल, इंडो मलाऊ, टॅन किंग अशा वेगवेगळ्या नावांनी आणि शारीरिक वैशिष्टय़ांमुळे ओळखला जाणारा फ्लोरान मासा जगभरात लोकप्रिय आहे. भारतात मुंबई, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात फ्लोरान माशाचे ब्रीडिंग केले जाते.
एकटा जीव..
फ्लोरान हा मासा फिश टँकमध्ये इतर माशांच्या गर्दीत पाहायला मिळणार नाही. नेहमी एकटे राहणे हा मासा पसंत करतो. स्वभाव रागीट असल्याने आपल्यासोबत अन्य माशांचे अस्तित्व हा मासा सहन करीत नाही. न्आपल्यासोबत मादीचे राहणेसुद्धा या माशाला मान्य नसते. मादीचे अस्तित्व फ्लोरान ओळखू शकत नाही. ब्रीडिंग करण्याच्या दोन महिने आधी फ्लोरान मादीला नर फ्लोरानच्या फिश टँकमध्ये एखादा काचेचा दरवाजा लावून ठेवावा लागतो. जेणेकरून हे एकमेकांना ओळखू लागतात आणि ब्रीडिंग करण्यासाठी उपयुक्त ठरतात. रागीट स्वभावामुळे फिश टँकमध्ये झाडे झुडपे ठेवल्यास आपल्या हालचालीमुळे ती तोडण्याची शक्यता असते.
अतिखाणे नको. अन्यथा अपचन
फ्लोरान हा मासा मुळात खाणे जास्त पसंत करतो. माशांच्या तयार खाद्यपदार्थापेक्षा जिवंत मासे खाणे फ्लोरानला अधिक आवडते. लहान मासे त्यामध्येसुद्धा कोई हा मासा खायला आवडतो. मात्र अतिखाणे दिल्याने अपचनाची समस्या या माशाला अधिक भेडसावते. फ्लोरान माशाच्या डोक्यावर असलेल्या फुग्यासारख्या भागाला होल इन द हेड हा आजार होण्याची शक्यता असते.