तलावांचे शहर अशी ठाण्याची ओळख सांगताना मासुंदा, कचराळी, उपवन असे मोजकेच तलाव डोळ्यासमोर येतात. इतर तलाव मात्र तुलनेने दुर्लक्षित राहतात. अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाचपाखाडी विभागातील सिद्धेश्वर तलाव त्यापैकी एक. महापालिका मुख्यालयाच्या अगदी समोर असलेला हा महत्त्वाचा तलाव जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. या तलावाकाठी असलेल्या शहीद उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांनी सिद्धेश्वर तलाव सुशोभीकरणाचा आग्रह धरला आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही..

ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील शहीद उद्यान म्हणजे कमी जागेत निसर्गाचा मनमुराद आनंद देणारे ठिकाण. सकाळी फिरण्यासाठी गेले की इथे गुलाबी थंडी असते. प्राणवायू आणि तो टिकविण्यासाठी तंदुरुस्त शरीर कमावण्यासाठी शेकडो चालती आणि धावती पावले येथे येतात. पाचपाखाडी, खोपट, नितीन कंपनी, चंदनवाडी आदी ठिकाणांहून नागरिक येथे येतात आणि कामाचा सर्व क्षीण विसरून पुढील कामकाजासाठी भरभरून ऊर्जा नेतात.

पहाटे चालणे अनेकांना जड जाते. सवय नाही, त्रास होतो, अशी कारणे सांगणारे अनेक जण भेटतात; पण ठाणे महानगरपालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर सिद्धेश्वर तलावाच्या काठावरील शहीद उद्यानात गेल्यावर हळूहळू हलके वाटायला लागतं आणि त्रास मागे पडून चालणं सवयीचं होतं. सकाळच्या गुलाबी थंडीत हिरवळीवर रस्त्याच्या खडतर पृष्ठभागावर चालण्यापेक्षा ठाणेकरांची पावलं येथील हिरव्यागार गवताकडे वळतात. मोठय़ा संख्येने उद्यानातील वाऱ्याशी अनेक जण स्पर्धा करीत घाम गाळतात. शहीद उद्यान हे सध्या तंदुरुस्तीचं एक मुख्य ठिकाण बनलं आहे.

पहाटे साडेपाचला चालती पावले इकडे येण्यास सुरुवात होते.सध्या ऑक्टोबर हीटच्या झळा मागे सरून छान गारवा पडू लागला आहे. सकाळी तर धुकेही पडलेले असते. थंडीचा हा काळ आरोग्यवर्धक मानला जातो. त्यामुळे उद्यानात वॉकर्सची संख्या वाढली आहे. त्यात चाळिशी पार केलेल्या महिला-पुरुषांची संख्या अधिक आहे. काही जण अगदी अप टु डेट कॅनव्हॉसचे बूट, ट्रॅक सूट घालून फिरायला येतात. काही जण इअरफोनद्वारे गाणी ऐकत असतात. काही जण चालतात, तर काही जण हळूहळू धावतात.

हातात पाण्याची बाटली अथवा एनर्जी ड्रिंकने भरलेली बाटली अशी तयारी करूनच सकाळच्या व्यायामाला लोक सुरुवात करतात. उद्यानाच्या नावाप्रमाणे येथे शहिदांना ‘हे बलिदान व्यर्थ न होवो’ म्हणत श्रद्धांजली देणारे शिल्प आहे. २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. काही जण सकाळच्या वेळेत ध्यानधारण करीत असलेले दिसतात. भर उन्हाळ्यातही येथील तापमान तुलनेने कमी असते, अशी माहिती येथे नियमितपणे फिरायला येणाऱ्या नागरिकांनी दिली.

अ‍ॅक्युप्रेशर ट्रॅक..

उद्यानामध्ये दहा मीटरचा ‘अ‍ॅक्युप्रेशर ट्रॅक’ उभारण्यात आला आहे. या ट्रॅकमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोलाकार दगडींचा वापर करण्यात आला आहे. पायांचा मसाज व्हावा यासाठी ट्रॅकवर अनवाणी चालणाऱ्यांची संख्या अधिक असते.

ध्यानधारणा केंद्र 

येथील उद्यानामध्ये खास ध्यानधारणा केंद्र उभारण्यात आले आहे, मात्र अनेक जण बाहेरील ताज्या हवेत ध्यान करणे पसंत करतात. त्यामुळे ध्यानधारणा केंद्र ओस पडलेले दिसते. पावसाळ्यात या ध्यानधारणा केंद्राचा उपयोग होतो, असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. मात्र याचा वापर पावसाळ्यात निवाऱ्यासाठी होतो, असे येथे नियमित चालायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

औषधी वनस्पतींची हिरवाई

उद्यानात सर्वत्र कडुलिंब, करवंद, तुळस, हाडमोड आदी औषधी तसेच विविध फुलझाडे आहेत. उद्यान सिद्धेश्वर तळ्याच्या काठी असल्याने येथील हवा बारमाही थंड असते. तळ्यावर पाणी पिण्यासाठी विविध जातींचे पक्षी येतात. येथे ज्येष्ठांना बसण्यासाठी उभारण्यात आलेली ‘हट’ (झोपडीच्या आकाराची जागा) हे येथील एक आकर्षण आहे. गवतावर पाणी फवारण्यासाठी बसवलेल्या स्प्रिंकलचाही अनुभव आल्हाददायक असतो. उद्यानाच्या मध्यभागील गवतावर योगासने केली जातात. त्यातील काही जण गटाने योगासने करतात. अनेकदा दिवसा येथे ज्येष्ठ गटांच्या गप्पा रंगतात.

स्वच्छतागृहाची मागणी..

पार्कमध्ये नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पावसाळा सोडल्यास इतर सर्व ऋतूंमध्ये चालणाऱ्यांची येथे कमी नसते.

महापालिकेची ज्येष्ठांना भेट

या भागात उद्यान बांधून महानगरपालिकेने ज्येष्ठांना एक वेगळी भेट दिली आहे. येथे चालण्यासाठी सुसज्ज जागा असल्याने आमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या उद्यानामुळे आम्हालाही चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ  शकतात, याचा विश्वास वाटू लागला आहे. महापालिका या उद्यानाची योग्य प्रकारे काळजी घेते. त्यामुळे आम्ही दररोज सकाळी निश्चिंत मनाने येथे चालण्यासाठी येतो. शहराच्या मध्यभागी असे उद्यान उपलब्ध झाल्याने माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठांना एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. – डी.व्ही. टिके, ज्येष्ठ नागरिक

 

स्वच्छतागृहाची उणीव..

गेले वर्षभर मी या उद्यानामध्ये चालण्यासाठी येते. महापालिकेने येथे सुसज्ज असे उद्यान उभारले, मात्र स्वच्छतागृहाची कोणतीही सोय येथे करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण कमी होत चालले आहे.  तसेच येथील फुलझाडांमध्ये वाढ केल्यास वातावरण प्रसन्न होण्यास मदत होईल.  – प्रतिभा महाडिक, गृहिणी

 

तणावमुक्तीचे ठिकाण.

दिवसभर आपण अनेक विचारांनी ग्रासलेले असतो. निसर्गाच्या सहवासात कामाचा क्षीण अगदी नाहीसा होऊन जातो. रोजच्या कामांतून वेळ काढत शहीद उद्यानात येऊन आम्ही क्षीण घालवत असतो. पहाटे आणि रात्रीच्या वेळी आम्ही या मैदानात वॉकसाठी येत असतो. वॉकिंग ट्रॅक बनविल्याने शतपावलीचा आनंद द्विगुणित होतो.  – शीतल पवार, गृहिणी

 

निसर्गाच्या सान्निध्यातील सकाळ..

उद्यानाच्या माध्यमातून आम्ही निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आलो आहोत. दररोज सकाळच्या वेळी आम्ही येथे जमत असतो. वृद्धापकाळात आरोग्याचा समतोल राखण्यासाठी येथील वातावरण आणि भोवतालच्या सुविधांची मदत होते. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवल्याचे मोठे मानसिक समाधान मिळते. मॉर्निग वॉकच्या वेळी शांत वातावरणामुळे पहाटेची वेळ आणखी प्रसन्न होते.  – सुदाम थोरात, ज्येष्ठ नागरिक

 

 

 

Story img Loader