ग्रेट डेन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वान आणि मनुष्य यांचं नातं अगदी प्राचीन काळापासूनचं आहे. तोच सिलसिला आजच्या जमान्यातही कायम आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा सर्वात लोकप्रिय प्राणी आहे. इमानदार, प्रेमळ, निष्ठावान, संरक्षक अशा कारणांसाठी श्वानांना पहिली पसंती मिळत असली तरी आता त्याचं दिसणं, ऐट, डौल या गोष्टींवरही भर दिला जातो. यासोबतच श्वानपालन हे सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण म्हणूनही ओळखलं जातं. या सर्व गोष्टी अलाहिदा! पण ऐट आणि दिसण्याच्या बाबतीत इतर श्वानांमध्ये उठून दिसणाऱ्या ‘ग्रेट डेन’ या कुत्र्याची ब्रीड नावाजली जाते. सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरात ‘ग्रेट डेन’चा वावर आहे.

मूळचे जर्मनीत सापडलेल्या ‘ग्रेट डेन’ या कुत्र्याच्या जातीला जगभरातील विविध ब्रीड क्लबमध्ये मान्यता मिळाली आहे. इंग्लिश मॅफटीफ, आयरिश वुल्फ हाऊंड अशा वेगवेगळ्या जातींचे हे मिश्र ब्रीड आहे. साधारण १४ व्या शतकापासून या ब्रीडचा इतिहास सापडतो. मात्र जर्मनीमध्ये १८ व्या शतकात ‘ग्रेट डेन’ ब्रीडची विशेष ओळख झाली. जर्मनीमध्ये पूर्वी ‘ग्रेट डेन’ ब्रीडला जर्मन मॅफटीफ, जेंटल जायंट, डेवुशे डॉगे या नावाने ओळखत असत. डेवुशे डॉगे याच नावावरुन इंग्रजीतील डॉग हा शब्द रुढ झाला. अलीकडे जगभरात ‘ग्रेट डेन’ या नावाने हे ब्रीड ओळखले जाते.

‘ग्रेट डेन’ कुत्र्याच्या नर प्रजातीची साधारण उंची ३० ते ३४ इंच एवढी असते. तर मादी प्रजातीची उंची कमीत कमी २८ इंचाएवढी असावी लागते. जास्त उंची आणि मजबूत शरीरयष्टी हे या कुत्र्यांचे आकर्षण आहे. उंची आणि मजबूत शरीरयष्टी या शारीरिक वैशिष्टय़ांमुळे इतर कुत्र्यांपेक्षा हे ब्रीड वेगळे ठरते. जागतिक विक्रमासाठी ४४ इंचाएवढी उंची नोंदवून युरोपमधील झेऊस हा ‘ग्रेट डेन’ ब्रीड असलेला कुत्रा सप्टेंबर २०१४ साली मरण पावला.

‘ग्रेट डेन’ कुत्र्याचे ब्रीड फारसे रागीट नसले तरी या कुत्र्याची शरीरयष्टी पाहून भीती निर्माण होते. घरात राखणदारीसाठीदेखील हे कुत्र्याचे ब्रीड पाळले जाते. देहयष्टी मजबूत असली तरी फार हुशार हे ब्रीड नसल्याने बॉम्बनाशक पथकांमध्ये या कुत्र्यांचा समावेश केला जात नाही. साधारण ५ ते ६ महिन्यांपासून योग्य प्रशिक्षण या कुत्र्यांना देणे आवश्यक असते. अन्यथा जास्त रागीट स्वभाव होण्याची शक्यता असते. पुण्यातील गौरी नारगोळकर या अनेक वर्षांपासून ग्रेट डेन कुत्र्यांचे ब्रििडग करत आहेत. गौरी यांनी ब्रीिडग केलेले ४६ ‘ग्रेट डेन’ कुत्रे इंडियन चॅम्पियन बनलेले आहेत.

उत्तम आहार, व्यायामाची गरज

‘ग्रेट डेन’ कुत्र्याची शरीरयष्टी मजबूत असल्याने या कुत्र्यांचा आहार योग्य असावा लागतो. मजबूत शरीरयष्टीसाठी प्रथिनांची आवश्यकता जास्त असल्याने मांसाहारी अन्नाचा समावेश या कुत्र्यांच्या जेवणात असावा लागतो. इतर कुत्र्यांचे संपूर्ण दिवसभरातील जेवण ग्रेट डेन कुत्र्यांना एका वेळच्या जेवणासाठी द्यावे लागते. मात्र उत्तम आहारासोबत योग्य व्यायामाची गरज या कुत्र्यांना जास्त असते. अन्यथा एका जागेवर तासन्तास बसून या कुत्र्यांच्या पायाला त्रास होण्याची शक्यता असते.

शिकारीसाठी उपयुक्त ‘ग्रेट डेन’

पूर्वीच्या काळी ‘ग्रेट डेन’ हे कुत्र्याचे ब्रीड शिकारीसाठी मोठय़ा प्रमाणावर वापरले जात. रानटी डुक्कर, अस्वल किंवा मोठे प्राणी मारण्यासाठी ‘ग्रेट डेन’ हे ब्रीड अतिशय उपयुक्त होते. याच वैशिष्टय़ामुळे ‘ग्रेट डेन’ याला बोअर हाऊंड या नावाने संबोधत. ‘ग्रेट डेन’ कुत्र्यांच्या कळपासमोर वाघसुद्धा माघार घेऊ शकतो.

रंगाप्रमाणे नाव बदलणारे ब्रीड

‘ग्रेट डेन’ कुत्र्याच्या ब्रीडमध्ये फॉन ब्लॅक ब्रीड आढळते. साधारण तपकिरी रंगात असणाऱ्या या कुत्र्याच्या तोंडावर काळा रंग असतो. हरली क्वीन डेन या नावाच्या कुत्र्याचा मुख्य रंग पांढरा असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके पाहायला मिळतात. निळसर रंगाचा कुत्रा ब्लू डेन नावाने ओळखला जातो.  बोस्टन डेन कुत्र्याच्या संपूर्ण शरीरावर काळा रंग असून पायावर पांढरा रंग दिसून येतो. ब्रिंडल डेन कुत्र्याच्या शरीरावर वाघासारखे पट्टे आढळतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on great dane dog