कल्पवृक्ष गार्डन, हायलँड, ठाणे (प.)
नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर येथील हायलँड परिसरात कल्पवृक्ष गार्डन हे चार इमारतींचे संकुल १४४ कुटुंबांना आसरा देत आहे. तब्बल चार हजार ६८३ चौरस मीटरमध्ये व्यापलेल्या या संकुलात मधोमध चार इमारती आणि आसपास मोकळी जागा आहे. कल्पवृक्ष एक टुमदार गृहसंकुल म्हणून ओळखले जाते.
कापुरबावडी जंक्शनपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर हायलँड येथे २००४ मध्ये कल्पवृक्ष गार्डन हे संकुल उभारण्यात आले. संकुलात एकूण चार इमारती असून प्रत्येक इमारत सात मजल्यांची आहे. दीपक साळवी संकुलाचे अध्यक्ष आहेत. सचिव विजय सावंत, खजिनदार सतीश वैगुडे यांच्यासह सदस्य संजीव सिंग, अंकुश राजमाने, राजू वाडिले, अश्विनी राणे, गिरीश जांभेकर, रामअवतार चव्हाण संकुलाचा कारभार पाहत आहेत. संकुलात राहणारे कुटुंबीय उच्चशिक्षित आहेत. डॉक्टर्स, वकील, अभियंते, पत्रकार अशी विविध क्षेत्रांतील मंडळी असल्याने त्यांच्या अनुभवाचा संकुलास फायदा होतो. बहुतेक कुटुंबे महाराष्ट्रीय आहेत. त्यामुळे आपल्याकडचे पारंपरिक सण, उत्सव सार्वजनिकरीत्या मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रोत्सव, होळी यांसारखे पारंपरिक सण दर वर्षी येथे साजरे करण्यात येतात. या सण-उत्सवांत संकुलातील सर्व जण सहभागी होतात. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये एकोप्याची भावना आहे.
विविध उपक्रम
संकुलातील कुटुंबीयांच्या आरोग्याचा विचार करून वर्षांतून दोन ते तीन वेळा वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रत्येक कुटुंबीयाची विनामूल्य तपासणी करण्यात येते. यामध्ये संकुलातील रहिवासी मोठय़ा प्रमाणात सहभागी होतात असे संकुलाचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले. तसेच लहान मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, पर्यावरणाविषयी जवळीक निर्माण व्हावी तसेच लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकी जपली जावी यासाठी इमारतीच्या भिंतीच्या कुंपणावर पर्यावरणाशी निगडित वेगवेगळ्या विषयांवर चित्रे काढणे तसेच रंगवणे असे उपक्रम राबविण्यात येतात. दर वर्षी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. त्यामध्ये संकुलातील सर्व जण सकाळपासून स्वच्छता करण्यासाठी उतरतात.
वाहनतळासाठी विशेष सोय
चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त पसरलेल्या या संकुलात वाहनतळासाठी विस्तृत जागा आहे. वाहनतळाचे योग्य नियोजन करण्यात आल्याने या संकुलात १४४ कुटुंबे राहत असूनही कोणत्याही अडचणीविना येथे प्रत्येकासाठी वाहनतळ उपलब्ध आहे. मोठमोठय़ा कार वाहनतळावर असूनही संकुलात फेरफटका मारताना कोणतीही अडचण जाणवत नाही.
सण-उत्सव
संकुलात दर वर्षी नवरात्रोत्सव आणि धूलिवंदन सण मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात येतो. या वेळी सर्व कुटुंबे एकत्र येत असतात. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवाचे व्यवस्थापन संकुलातील महिलांकडे असते. त्यासाठी नऊ महिलांची कार्यकारी समितीही दर वर्षी स्थापन केली जाते. संकुलातील सर्व जण मोठय़ा उत्साहात नऊ दिवसांच्या या उत्सवात सहभागी होतात, अशी माहिती सचिव विजय सावंत यांनी दिली. संकुलात मराठी टक्का जास्त असल्याने दिवाळीत प्रत्येकाच्या घरासमोर कंदील लावण्यात येतात. तसेच इमारतीच्या प्रवेशद्वारावरही मोठा कंदील लावण्यात येतो. पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात येते.
संकुलाचे प्रशस्त सभागृह
संकुलातील कुटुंबीयांना एखादा खासगी कार्यक्रम साजरा करायचा असल्यास संकुलात प्रशस्त सभागृह बांधण्यात आले आहे. संकुलातील रहिवाशांना माफक शुल्क आकारून हे सभागृह उपलब्ध करून दिले जाते.
घरादाराची श्रीमंती पैशांमुळे नव्हे तर शेजारी असलेल्या झाडांमुळे मोजली जाते. त्याबाबतीत कल्पवृक्ष सुदैवी आहे. इतरांनी हेवा करावा इतकी हिरवी श्रीमंती हे संकुल बाळगून आहे. संकुलाच्या चारही बाजूंनी नारळ, आंबे, विविध प्रकारची फुलझाडे आहेत. संध्याकाळी इथे विविध पक्ष्यांचे जणू संमेलनच भरते. त्यांच्या चिवचिवाटाने अगदी प्रसन्न वाटते, असे खजिनदार सतीश वैगुडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक कट्टा, मैदान
बहुमजली इमारतींच्या युगात घरापुढील अंगण गेले. शहरात मैदाने दुर्मीळ झाली. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. काही संकुलांनी मात्र आवर्जून मुलांसाठी उद्यान अथवा मैदाने राखून ठेवलेली दिसतात. कल्पवृक्ष त्यापैकी एक आहे. याच मैदानात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्यासाठी कट्टा उभारण्यात आला आहे. संध्याकाळी लहान मुले मैदानात खेळतात, तसेच कट्टय़ावर ज्येष्ठ नागरिक समवयस्कांसमवेत गप्पा रंगवितात.