महानगरी संस्कृतीत अनुसरल्या गेलेल्या आधुनिक जीवनशैलीने जुन्या खुणा एकेक करून नाहीशा होत असल्या तरी गतकाळाचे स्मरण करून देणाऱ्या काही गोष्टी अजूनही ठिकठिकाणी आपले अस्तित्त्व टिकवून असल्याचे दिसतात. ऐतिहासिक काळात नगरातील अभिजनांचे निवासस्थान असलेले असेच काही वाडे ठाणे-कल्याण परिसरात आढळून येतात. त्यापैकी काही वाडय़ांची सचित्र ओळख करून देणारे हे नवे पाक्षिक सदर…
शिवकालीन इतिहासात संदर्भ असलेल्या कल्याण परिसराचे भूतकाळाचे वैभव मांडणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी ज्या खासगी मालकीच्या होत्या त्या कालपरत्वे कोलमडून पडू लागल्याने त्यांना जमीनदोस्त करून तेथे आधुनिक इमले उभारण्यात आले. तर काही ठिकाणी जुनी बांधकाम शैली कायम ठेवून त्यात आधुनिक बदल करण्यात आले. अशा वास्तूंमध्ये कल्याणच्या गांधी चौकातील भिडे वाडय़ाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. हा परिसर आता भिडे वाडय़ाच्या नावानेच आता अधिक ओळखला जातो.
भिडेवाडय़ाचा जन्म साधारण दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. गोविंद वासुदेव भिडे नावाच्या व्यावसायिकांनी हा वाडा उभारला. त्यांच्या स्वत:च्या भाताच्या गिरण्या होत्या. त्याचप्रमाणे गोविंदराव जमीन व्यवहारासाठी कर्ज देणे, शेतीसाठी आवश्यक अर्थपुरवठा करणे अशी सावकारी कामेही करत असत. हे दोन्ही व्यवसाय या वाडय़ातूनच चालत असत. वाडय़ाची ही दुपाखी अर्थात दुमजली वास्तू केवळ लाकूड आणि दगडांतून साकारली आहे. मात्र, आजही ही वास्तू दिमाखात उभी आहे. या वाडय़ात एकूण २१ खोल्या आहेत. गोविंदराव भिडे यांच्या काळात वाडय़ात १५ कुटुंबे वास्तव्यास होती. परंतु, पुढे विभक्त कुटुंबपद्धती रुजू लागल्याने हळूहळू येथील बिऱ्हाडे कमी होऊ लागली. सध्या या वाडय़ात वसंत भिडे, मनीष भिडे आणि वैशाली भिडे असे तीनच कुटुंबीय राहतात. पूर्वापार भिडे कुटुंबीयांचे वास्तव्य या परिसरातच असल्याने आजही या परिसराला ‘भिडे गल्ली’ या नावाने ओळखले जाते.
भिडे वाडय़ाचा दिंडी दरवाजा प्रथमदर्शनी कोणालाही आकर्षित करणारा आहे. अलीकडच्या काळात केवळ गडकिल्ल्यांवरील वास्तूंमध्येच दिसणाऱ्या दिंडी दरवाजासारखा दिसणारा हा दरवाजा आजही भक्कम आणि एकसंध आहे. या दरवाजाला असलेली मोठी कडी, आतील बाजूस मागे असलेला लाकडी अडसर जुन्या काळातील आठवणी ताज्या करतात. विशेष म्हणजे या भल्या मोठय़ा दरवाजाला बिजागिऱ्या नाहीत. दिंडी दरवाज्यातून वाडय़ात प्रवेश केल्यानंतर भव्य अंगणात प्रवेश होतो. पूर्वी या अंगणात विविध आकाराची जाती, तांब्या-पितळाची भांडी, पाणी पिण्यासाठीची ‘टाकं’ अशा वस्तू असत. त्या वेळी त्यांचा सातत्याने वापर होत असे. मात्र अलीकडे या वस्तू केवळ शोभेपुरत्या उरल्या आहेत. भिडे वाडय़ात अखंड दगडातून साकारलेली पाच जाती आहेत. प्रत्येक जात्याचा आकार वेगवेगळा आहे. मोठय़ा आकाराच्या जात्याला ‘कुंदी जाते’ असे म्हटले जाते. ही सर्व जाती कुंदी या दगडापासून तयार करण्यात आली आहेत. पूर्वीच्या काळी भात भरडण्यासाठी या जात्यांचा वापर होत असे. भात सडवण्यासाठी ‘मुसळ’ वापरण्यात येई. विविध आकाराचे आणि अखंड दगडातून साकारलेले दुर्मीळ मुसळही वाडय़ात पाहायला मिळतात, मात्र त्यांचा कोणताही वापर होत नाही. या पुरातन वस्तूंची कामे आता ‘मिक्सर’मधून वेगाने पार पडतात. गुरांना पाणी पिण्यासाठी आणि पाण्याची साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र असे पाण्याचं ‘टाकं’ वाडय़ाच्या पुढच्या अंगणात आजही पाहायला मिळते.
अंगणातून घराकडे पुढे आल्यानंतर असलेल्या ओटीवर पूर्वी गोविंद भिडे यांचे सावकारीचे व्यवहार चालत असत. त्याची साक्ष देणारा लाकडी डेस्क आजही ओटीवर आहे. पूर्वी ओटीवर बैठकीसाठी गाद्या अंथरलेल्या असत. मात्र आता त्या ठिकाणी आधुनिक नक्षीकाम असलेला लाकडी पलंग बसवण्यात आला आहे. ओटीच्या भिंतीवर आजही ब्रिटिशकालीन संेट थॉमस कंपनीचे दुर्मीळ घडय़ाळ आहे. मात्र ‘लोलक’ असलेले हे घडय़ाळ दुरुस्ती होऊ शकत नसल्याने केवळ शोभेपुरते उरले आहे.
पूर्वीच्या काळी कुटुंब एकत्र आणि मोठे असल्यामुळे वाडय़ांत वर्षभरात एक-दोनदा तरी पाळणा हलत असे. त्यामुळे अनेक वाडय़ांत बाळंतिणीसाठी स्वतंत्र खोली असे. भिडे वाडय़ातही ओटीच्या एका बाजूला अशी खोली पाहायला मिळते. मात्र आता त्या खोलीचे औचित्य कमी झाल्याने ती आता रोजच्या वापरात आहे. ओटीतून घराकडे जाताना आणखी एका दिंडी दरवाज्याचे दर्शन होते. या दरवाज्याच्या पलीकडे प्रशस्त माजघर आहे. आजच्या काळातील घरांत ज्याला ‘लिव्हिंग रूम’ किंवा ‘हॉल’ म्हटलं जातं, तेच हे माजघर. भिडेवाडय़ाच्या माजघराचे वैशिष्टय़ म्हणजे, येथे भिंतीत कोरलेली अनेक कपाटे दिसतात. अशी कपाटे वाडय़ात अन्यत्रही आहेत. त्यांचा आजही तितकाच वापर केला जातो, हे विशेष. माजघराची जमीन दगडी कोब्याने तयार करण्यात आली आहे. या माजघरात घरातली सगळी मंडळी एकत्र गप्पा मारत बसत. जेवणांच्या पंक्तीसाठीही माजघराचा त्या काळी वापर होत असे. मात्र आता त्या ठिकाणी संगणक, संगणकाचे कपाट, वीजपुरवठा खंडित झाल्यास उपयुक्त पडणारे इन्व्हर्टर अशा आधुनिक गोष्टी अधिक उठून दिसतात.
माजघराच्या उजव्या हाताला असलेल्या खोलीचा वापर भाताचे कोठार म्हणून होत असे. भिडे कुटुंबाचा भात व्यवसाय संपुष्टात आल्यानंतर या कोठारांनाही अस्तित्व उरलेले नाही. त्यामुळे आता या कोठारांचे रूपांतर प्रशस्त आणि आधुनिक स्वयंपाकघरात करण्यात आले आहे. येथे सध्याच्या स्वयंपाकघरात दिसणाऱ्या सर्व वस्तू, भांडी पाहायला मिळतात. वाडय़ातील मूळचे स्वयंपाकघर पुढच्या बाजूस आहे. मात्र ती खोली भिंडे कुटुंबीयांनी एका व्यावसायिकासच भाडय़ाने दिली आहे. वाडय़ाच्या पुढय़ात असलेल्या दुसऱ्या खोलीत भिडे यांच्या जावयाचे आधुनिक रचना असलेले वातानुकूलित कार्यालय आहे.
वाडय़ाचे माजघर आणि मागील अंगण यांच्या दरम्यान पडवी आहे. पूर्वी अडगळीच्या वस्तू या पडवीत ठेवल्या जात. मात्र आज स्वयंपाकासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या बरण्या, वॉशिंग मशीन, वॉश बेसिन या आवश्यक गोष्टी ठेवण्यासाठी या खोलीचा वापर केला जातो. मागच्या अंगणातील दिंडी दरवाज्यातून भाताचे पीक घेऊन बैलगाडय़ा वाडय़ात येत. त्यामुळे हे अंगणही प्रशस्त आहे. मात्र तेथील दिंडी दरवाज्याची जागा आता पत्र्याच्या दरवाज्याने घेतली आहे. अंगणात विहीर आणि स्वच्छतागृह आहे. याच अंगणात पूर्वी गुरांचा गोठा होता. त्या गोठय़ात आता भिडे कुटुंबाच्या सध्याच्या -कॅटरिंग- व्यवसायासाठी लागणारी भांडी ठेवली जातात. स्वयंपाक घराला लागूनच एक खोली आहे. या खोलीला ‘विटाळशीची खोली’ असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना या खोलीत ठेवले जाई. मासिक पाळी दिवसांमध्ये महिलांचे दैनंदिन कामकाज या खोलीमध्येच चालत असे. काळानुरूप या सर्व प्रथा बाजूला पडत गेल्या; त्यामुळे आज या खोलीचाही वापर दैनंदिन कामासाठीच केला जातो. वाडय़ातील पुढील अंगण आणि मागील अंगण यांना थेट जोडणारा दुवा म्हणजे ‘बोळ’. वाडय़ात पूर्वीच्या काळी येणाऱ्या कामगारांना वावरण्यासाठी, दिवंगत व्यक्तीस पोहोचवून आल्यानंतर (वाडय़ाचे सोवळे भंग होऊ नये म्हणून) पुढच्या अंगणातून मागच्या अंगणात किंवा
मागच्या अंगणातून पुढच्या अंगणात जाण्यासाठी या बोळीचा वापर केला जात असे. सध्या तो फारसा वापरात नाही.
वेगवान नागरीकरणामुळे आपल्या आजूबाजूला होत असलेले असंख्य बदल पाहात भिडे वाडा आजही तसाच उभा आहे. आसपासच्या आधुनिक घरांच्या कोंडाळ्यातही हा वाडा उठून दिसतो. भिडे वाडय़ाची ही वास्तू दीडशे वर्षांच्या इतिहासाची, भिडे कुटुंबीयांच्या वाडय़ासोबत असणाऱ्या ऋणानुबंधांची आजही आठवण करून देते.
कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या शहरांना लागून असलेल्या खेडेगावांमध्ये १९६०- १९७०च्या दशकात कल्याणातील सावकारांच्या भातशेती होत्या. यामध्ये कल्याणजवळील म्हारळ, वरप, कांबा, चिकणघर, गांधारी, सापड (सापर्डे), उंबर्डे, वाडेघर, बारावे, गौरीपाडा या गावांचा समावेश होता. त्याचप्रमाणे अंबरनाथजवळील उसटणे, करवले, मलंगवाडी आणि बदलापूरजवळील कान्होर या गावांमध्येही भातशेती होती. याशिवाय कल्याण तालुक्यातील हेदूटणे, नांदिवली या गावांमध्येही या सावकारांची भातशेती होती. कल्याणातील भिडे, काणे, अभ्यंकर, मेघश्याम जोशी, पटवर्धन, धारप, वैद्य्, बिवलकर, ओक अशा सुमारे वीस ते पंचवीस कुटुंबांच्या मालकीची ही भातशेती होती. याच काळात कल्याणात भाताच्या गिरण्याही होत्या. शेतीवर पिकलेले भाताचे पीक शेतावरून बैलगाडीच्या साहाय्याने कल्याणातील वाडय़ांवर नेले जाई. वाडय़ावर बैलगाडीच्या माध्यमातून आलेले हे पीक वाडय़ांवरील भाताच्या कोठारात भरून ठेवले जाई. त्यानंतर वाडा मालक आपापल्या सोईनुसार, गरजेनुसार हे पीक कल्याण गावातील भात गिरण्यांवर भात कांडण्यासाठी पाठवत असे.
समीर पाटणकर