भगवान मंडलिकटिटवाळा ते मुरबाड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी करून टिटवाळा ते नगर या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाला हिरवा झेंडा दाखविला आहे. टिटवाळा ते मुरबाड हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर विकासाच्या वाटेवर असलेली या भागातील गावे, खेडी, वाडय़ा विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील. या रेल्वे मार्गामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मरगळलेल्या स्थितीत असलेल्या या भागातील औद्योगिक वसाहतींना उभरते दिवस येतील. या भागातील पर्यटन स्थळांचा विकास करणे शक्य होईल. आतापर्यंत डोंगरदऱ्यात अडकून पडलेल्या या भागातील खेडुताला दळणवळण आणि पर्यायाने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होती. कल्याणच्या पलीकडे ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या विकासाला नवी संजीवनी देणारा हा प्रकल्प असणार आहे.
दीडशे वर्षांपूर्वी मुंबई ते ठाणे या मार्गावर रेल्वेचे पहिले इंजिन धावले. या ऐतिहासिक घटनेस तब्बल दीड शतकाचा कालावधी पूर्ण होत असताना ठाणे जिल्’ााच्या ग्रामीण भागात टिटवाळा ते मुरबाड मार्गावर नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्धार केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केला आहे. ही घोषणा एकदम झाली असेही नाही. या घोषणेपूर्वी गेल्या ४५ वर्षांपासून जुन्नर, आळेफाटा भागातील काही धडपडे कार्यकर्ते माळशेज रेल्वे कृती समिती स्थापून कल्याण ते माळशेज घाटमार्गे अहमदनगर हा रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयाने मार्गी लावावा म्हणून प्रयत्नशील आहे. कल्याण ते नगर हा रेल्वे मार्ग तयार झाला तर स्थानिक रहिवाशांसोबत सरकारला लाभ मिळेल असे या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. व्यापार, दळणवळणाचे फायदे आणि वाहतुकीचे विकेंद्रीकरण केले तर रस्ते वाहतुकीवर येणारा ताणही कमी होऊ शकणार आहे. आज इतक्या वर्षांनंतर या नव्या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सुरेश प्रभू यांनी घेतल्याने मध्ये, पश्चिम आणि हार्बर मार्गापुरता विचार करणाऱ्या कल्याण डोंबिवली, ठाणेकरांना आपल्याच भागातून एका नव्या दळणवळण पर्यायाचा लाभ मिळू शकणार आहे.
कृती समितीच्या रेटय़ातून रेल्वे मंत्रालयाने १९७४ मध्ये जुन्नर विभागाचे रेल्वेचे तत्कालीन अभियंता बी. सुधीरचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ते नगर रेल्वे मार्गाचा १०८ कोटीचा एक प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला होता. सुमारे सहाशे ते सातशे किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग आहे. या रेल्वे मार्गात माळशेज घाट हा एक मोठा चढ आणि आव्हानात्मक डोंगर भाग सोडला तर रेल्वेला खूप आव्हानात्मक असे या मार्गात काही नाही. सध्याचा रेल्वेचा आर्थिक काळ पाहिला तर निधीची उपलब्धता हेच मोठे आव्हान आहे. कल्याणहून मुरबाड, माळशेज घाट, शिवनेरी, जुन्नर, आळेफाटा, टाकळी धोकेश्वर आणि अहमदनगर असा प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे.
सध्या मुंबईनहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ने नाशिकमार्गे जो प्रवासी नगर दिशेने वळसा घेऊन जातो, तो प्रवासी, व्यापारी हा वळसा न घेता या रेल्वेमार्गावरून कल्याणहून (सध्या टिटवाळा) मुरबाडमार्गे थेट नगरला जाऊ शकतो. टिटवाळा ते नगरला जाण्यासाठी मधला मार्ग म्हणून अनेक वाहन चालक नियमित मुरबाड माळशेज घाटमार्गे आळेफाटय़ावरून नगरच्या दिशेने जातात. मुंबईहून नाशिकमार्गे नगरला जाण्यासाठी जो शंभर ते दीडशे किमीचा जास्तीचा प्रवास आहे तो प्रवास माळशेज घाटमार्गे कमी होतो. इतके हे अंतर सरळ आहे. नगर, जुन्नर, आळेफाटा भागातील शेतकरी नियमित भाजीपाला घेऊन नाशिक, माळशेज घाटमार्गे कल्याण, मुंबई, नवी मुंबईच्या बाजार समितीत वाहनाने येतो. ही या भागातील शेतकऱ्यांची नियमित कसरत आहे. माळशेज घाट माथा, जुन्नर भागातील शेतकरी तर पहाटे भाजीपाला घेऊन निघतात आणि मुरबाड, सरळगाव, टोकावडे, किन्हवली पट्टय़ात भाजीपाला विक्रीसाठी येतात. हे विक्रेते दुपापर्यंत विक्री व्यवहार करून पुन्हा आपल्या मार्गाला लागतात. हा अनेक शेतकरी, व्यापाऱ्यांचा व्यवसाय आहे. प्रस्तावित रेल्वे मार्ग झाला तर सर्वाधिक आनंद वर्षांनुवर्ष हा विक्री व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना तसेच या पट्टय़ातून ये-जा करणाऱ्या नोकरदारांना होणार आहे.
प्रस्तावित रेल्वे मार्गात शिवनेरी, हरिश्चंद्रगड ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत. हा रेल्वे मार्ग झाला तर या पर्यटन स्थळांचे महत्त्व आहे त्यापेक्षा कैक पटीने वाढणार आहे. अष्टविनायकांमधील लेण्याद्री, ओझर, कापर्डिकेश्वर ही तीर्थस्थाने या प्रस्तावित रेल्वे मार्गात आहेत. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची त्यामुळे सोय होणार आहे. रेल्वे मार्गामुळे पर्यटकांचा या ठिकाणचा ओढा वाढेल. ज्या भागातून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. त्या भागातील जमिनी, ठिकाणांना भाव येणार आहे. प्रवासी वाहतूक वाढल्याने साहजिक स्थानिक पातळीवर गरजेप्रमाणे व्यवसाय वाढतील आणि त्याचा लाभ खेडी, आदिवासी पाडय़ावरील व्यक्ती नक्कीच उचलतील.
दुर्गम पट्टय़ाच्या विकासाची वाट
टिटवाळा ते मुरबाड हा पट्टा ग्रामीण, आदिवासी पाडे असलेला भाग आहे. शेती, मुंबई, ठाणे परिसरातील नोकऱ्या, शेती हेच या भागातील सामान्यांचे जीवन आहे. मुरबाड येथे औद्योगिक वसाहत आहे. शैक्षणिक सुविधा आहेत. देशाचे लक्ष लागते असा म्हसा येथे जनावरांचा बाजार भरतो. या भागातील शेतकरी, कष्टकरी आपला भाजीपाला बस, ट्रक, टेम्पो, खासगी वाहनाने घेऊन कल्याण परिसरात नियमित येतो. टिटवाळा हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमधील एक महत्त्वाचा भौगोलिक भूभाग आहे. या भागात मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. टिटवाळा ते मुरबाड रेल्वे मार्ग सुरू झाला तर, या रेल्वे मार्गाचा शहापूर तालुक्यालाही लाभ होणार आहे. मुरबाड तालुक्याला खेटून शहापूर तालुक्याची हद्द आहे. जो प्रवासी कल्याण ते आसनगाव प्रवास करतो. तो प्रवासी मुरबाडपर्यंत प्रवास करून लेनाड, सरळगावमार्गे शहापूर तालुक्यात प्रवेश करू शकतो. शहापूर तालुक्यातील दंडकारण्याचा भाग म्हणून प्रसिद्ध असलेला स’ााद्रीच्या पर्वतरांगेमधील डोळखांब, शिरोशीलगतची खेडी, आदिवासे पाडे हा दुर्गम पट्टाही विकासाच्या प्रवाहात येऊ शकतो.
माळशेज रेल्वे शुभारंभ
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कल्याणऐवजी त्याच्या पुढच्या दोन स्थानकांमधील टिटवाळा हे ठिकाण निश्चित करून, टिटवाळा ते मुरबाड या सुमारे शंभर किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. कल्याण ते अहमदनगर या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गातील टिटवाळा ते मुरबाड या पहिल्या टप्प्याच्या सर्वेक्षणाची घोषणा करून प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या शुभारंभाचा संकेत दिला आहे. फक्त कल्याणऐवजी या रेल्वे स्थानकाजवळील टिटवाळा हे ऐसपैस मोकळ्या जागेतील ठिकाण त्यांनी निवडले आहे. ठाणे, कल्याण ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके झाली आहेत. त्यामुळे या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी आता लगतची रेल्वे स्थानके विकसित होणे आवश्यक आहे. हाच विचार करून कल्याणऐवजी टिटवाळा रेल्वे स्थानकाचा विचार करण्यात आला असावा. टिटवाळा ते अहमदनगर हा रेल्वे मार्ग होईल तेव्हा होईल, पण या रेल्वे मार्गातील पहिल्या टप्प्याची तर घोषणा झाली आहे. हेही कमी नाही.