सण असो वा उत्सव.. घरगुती कार्यक्रम असो वा लग्न समारंभ. नटण्या-थटण्याची जणू सुवर्णसंधी तरुणी, महिलांसाठी चालून येत असते. सुंदर दिसावं असं त्यापैकी प्रत्येकीलाच वाटत असतं. या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक दक्षही असतात. उत्सव, समारंभात पेहरावाकडे खास लक्ष देणाऱ्या तरुणी चेहरा, केस, त्वचा, डोळ्यांचे सौंदर्य जपण्याविषयी विशेष दक्ष असतातच, शिवाय चटकन लक्ष जाणार नाही, अशा नखांच्या सौंदर्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देताना दिसतात. अधिकाधिक आकर्षक दिसण्याचा कटाक्ष पाळणाऱ्या तरुणींना गेल्या काही वर्षांपासून ‘ट्रेण्डी नेल आर्ट्स’ खुणावू लागल्या आहेत. नखांचे सौंदर्य जपण्यासाठी नखांवर हवी तशी कलाकुसर करून घेण्याकडे अलीकडे तरुणींचा कल वाढताना दिसत आहे. हायापायांच्या नखांना विविधरंगी नेल पॉलिश करायचे, इतकेच काय ती जपली जाणारी फॅशन आता पुढील टप्प्याच्या दिशेने प्रवास करताना दिसू लागली आहे. शहरातील बाजारपेठा, मॉल्स या ठिकाणी खास नेल आर्टिस्टचे कक्ष दिसू लागले असून, ठाण्यासारख्या वेगवान नागरीकरण होत असलेल्या शहरात तर ही कला अधिकच बहरताना दिसू लागली आहे. त्यामुळे सौंदर्यात भर पाडणाऱ्या नेल आर्ट्सला मागणीही मोठी आहे.
नखांवर नेलपेंट लावले की काम फत्ते हा विचारच आता मागे पडू लागला आहे. प्रत्येक दिवशाच्या पोषाखाशी सुसंगत असे मॅचिंग नेल आर्ट करण्याची भन्नाट फॅशन सध्या लोकप्रिय होताना दिसू लागली आहे. सोनेरी, चंदेरी, ऑक्साइड रंगांचे नेल आर्ट मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. घरच्या घरी करता येणारी ही नेल आर्ट नखांचे सौंदर्य वाढवून एक वेगळे रूप देते. त्यामुळे बाजारामध्ये नव्याने आलेली आकर्षक रंगसंगती, नखांवर नेल आर्ट केलेली कृत्रिम नखे, विविध रंगांच्या चमकी, तसेच विविध प्रकारच्या नेल आर्टने तरुणींना भुरळ पाडली आहे. आर्टिफिशियल नेल टेक्नॉलॉजीला शहरामध्ये मोठी मागणी असून मॉल्स, ब्युटी पार्लर्समध्ये तुमच्या नखांवर कलाकुसर घडविणाऱ्या आर्टिस्टला मोठी मागणी असल्याचे दिसून येते.
वेगवेगळ्य़ा डिझाइन्स, स्टोन्स, चमकी, तारे, मोती लावून नखांना सजविण्यात येते. नखांना सजविण्याच्या या प्रकारामुळे एक ट्रेण्डी लूक येतो. नखं सजविण्याच्या या फॅशनसाठी २०० ते ८०० रुपयांपर्यंत खर्च येतो. यासाठी बाजारात खास स्टिकर्सही उपलब्ध आहेत. शहरातील मॉल्स, महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये खास प्रशिक्षण घेतलेल्या आर्टिस्टला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.
नखांचं सौंदर्य खुलवण्यासाठी पूर्वी लाल, गुलाबी किंवा ब्राऊन नेलपॉलिश वापरलं जात असे. नखांच्या फॅशनच्या बाबतीत हा इतिहास झाला. आता बाजारात हजारो शेड्समधील नेलपॉलिश उपलब्ध आहे. अलीकडच्या काळात बाजारात पील ऑफ नेलपॉलिशही मिळते. ते लावल्यामुळे नखांमध्ये आगळ्या प्रकारची चमक येते. साधं नेलपॉलिश काढायचं असल्यास रिमूव्हरची गरज भासते. पण पील ऑफ नेल पॉलिश काढण्यासाठी त्याची आवश्यकता भासत नाही. ते एका कोपऱ्यात पकडूनही काढता येते. नेल पॉलिशला जास्त चमक द्यायची असेल तर त्यासाठी ग्लिटरचाही वापर केला जातो. नेलपॉलिश वाळल्यावर त्यावर ग्लिटर लावलं तर जास्त चमक येते. बाजारात मिळणारी गोल्डन, सिल्व्हर इत्यादी निरनिराळी स्टिकल्स नखे सुंदर बनवण्यासाठी वापरली जातात. पूर्वी नेलपॉलिश लावण्यासाठी फक्त नेलब्रशचा वापर होत आहे. मात्र, आता तेवढं करून भागत नाही. आजकाल नेलआर्ट खूप प्रचलित आहे. त्याद्वारे नखांवर कलाकुसर केली जाते. नेल आर्टसाठी बाजारात पेंट, जेम्स, स्टिकल्स, वॉटरप्रूफ कलर इत्यादी उपलब्ध आहेत. नखांवर दोन रंगांच्या नेलपॉलिशची रंगसंगती साधत डिझाईन बनवता येतं.
विशिष्ट प्रकारची जेम्स वापरल्यानेही नखं सुंदर दिसू लागतात. नखांवर वॉटरप्रूफ रंगांनी कल्पक डिझाईन बनवून नवे रूप दिलं जातं. आता हळूहळू ऑटो क्रॅक नेलपॉलिश लावण्याचीही फॅशन वाढू लागली आहे. यामध्ये नखांवर क्रॅक्स (भेगा) भासवले जातात. ही नवी स्टाईल सध्या अधिक प्रचलित होत आहे. नेल आर्ट ही एक अशी शैली आहे. ज्यामध्ये असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. कोणी पाचही नखांवर एकच प्रकारची नक्षी रंगवतात, तर कोणी वेगवगळ्या. सध्या तर चार नखांवर एक सारखा रंग आणि एका नखावर वेगळी आकर्षक नक्षी काढण्याचा ट्रेण्ड आहे. नखांना चौकोनी, अंडाकार, गोलाकार, टोकधार असे वेगवेगळे आकार देऊन त्यावर रंगरंगोटी व नक्षीकाम करून अधिक आकर्षक बनविण्याकडे तरुणींचा कल वाढत आहे. सध्या बाजारात विविध रंगाचे बारीक टोक असलेले नेल पेनही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर
विविध आकाराचे चित्र असलेले स्टिकर्सही बाजारात मिळतात.
कुठे मिळतात..
ठाणे गावदेवी मार्केट, शहरातील प्रमुख मॉल्स. सौंदर्य प्रसाधन विक्रीच्या दुकानांमध्ये हे प्रकार उपलब्ध आहेत.
– शलाका सरफरे