सर्वसाधारणपणे कॉस्मोपॉलिटन शहरांना स्वत:ची वैशिष्टय़पूर्ण अशी खाद्यसंस्कृती नसते. ठाणे शहरही त्याला अपवाद नाही. मिश्र लोकवस्तीप्रमाणे येथील खाद्यसंस्कृतीतही कमालीची विविधता आहे. मिठाईचे दुकाने ही तशी कोणत्याही शहरातील बाजारपेठांचा अविभाज्य घटक असतात. मात्र त्यांचा प्रभाव त्या त्या परिसरातील रहिवाशांपुरता अथवा त्या मार्गाने ये-जा करणाऱ्यांपुरता मर्यादित असतो. काही खवय्ये मुद्दामहून वाट वाकडी करून विशिष्ट पदार्थासाठी ठरावीक दुकानात येत असतात. मात्र त्यांची संख्या अपवादात्मक आणि मर्यादित असते. तीन दशकांपूर्वी ठाण्यात सुरू झालेल्या एका मिठाईच्या दुकानाने मात्र आपली खासियत आणि प्रभाव मर्यादित ठेवला नाही. जसजसे ठाणे शहर वाढले, तसतसे या मिठाईच्या दुकानानेही नव्या वस्त्यांमध्ये शिरकाव केला. त्यामुळेच आता ठाण्यात मिठाई म्हटले की जी दोन-तीन नावे चटकन आठवतात, त्यात ‘टीप-टॉप’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. तीस वर्षांपूर्वी गोखले रोडवर रोहित शहा यांनी ‘टीप-टॉप’ नावाने पहिले दुकान सुरू केले. आता ठाणे-कळवा भागात टीप-टॉपची दहा दुकाने आहेत.
पन्नास वर्षांपूर्वी मुंबईतून ठाण्यात आलेल्या रमणलाल शहा यांनी रेल्वे स्थानकाजवळ ठाणा पॉवर लॉँड्री सुरू केली. त्यानंतर विष्णूनगरमध्ये कचिन्स टेलर्स हे दुकान उघडले. वडिलांच्या या कापड व्यवसायाला पुढे नेत रोहित शहा यांनी गोखले रोडवर जीन्स जंक्शन सुरू केले. ते अजूनही कार्यरत आहे. त्यांचा मुलगा जयदीप सध्या त्याचा कारभार पाहतो. मात्र दरम्यानच्या काळात शहा कुटुंबाने स्थानक परिसरात ‘मॉन्जिनीज’ची एजन्सी घेतली होती. ‘मॉन्जिनीज’चे केक आणि फरसाण विक्रीच्या अनुभवातून आपणही अशा प्रकारचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यातून ‘टीप-टॉप’चा जन्म झाला.
‘जीन्स जंक्शन’च्या अनुभवाने ‘टीप-टॉप’ सुरू करताना ब्रॅण्डिंगचे महत्त्व रोहित शहांना माहिती होते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून त्यांनी दर्जा, गुणवत्ता आणि चवीबरोबरच ‘टीप-टॉप’च्या ब्रॅण्डिगकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले. मिठाईच्या प्रकारात कमालीची विविधता आणली. पेढे, बर्फी या नेहमीच्या सर्रास आढळणाऱ्या गोड जिन्नसांव्यतिरिक्त बंगाली, पंजाबी, गुजराती आदी देशभरातील विविध प्रांतांतील वैशिष्टय़पूर्ण मिठाई त्यांनी ‘टीप-टॉप’मध्ये उपलब्ध करून दिली. ‘मॉल’मध्ये जशा सर्व प्रकारच्या गृहपयोगी वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याची सोय असते, तसे ‘टीप-टॉप’ने भारतीय बनावटीचे जवळपास सर्व मिठाईचे प्रकार उपलब्ध करून दिले. सुरुवातीच्या काळात इतर सर्वसाधारण मिठाई विक्रेत्यांप्रमाणे ‘टीप-टॉप’मध्येही दुकानामागे मिठाई बनवली जात होती. मात्र पुढे दुकानांची संख्या आणि व्याप्ती वाढल्यानंतर त्यांनी घोडबंदर रोडवर १९८६ पासून मिठाई बनविण्याचा स्वतंत्र कारखाना सुरू केला. तेव्हापासून ‘टीप-टॉप’ची सर्व दुकाने म्हणजे मिठाई विक्री करण्याची फक्त शोरूम्स ठरली आहेत.
ताजी मिठाई आणि चवीतला सारखेपणा हे तत्त्व ‘टीप-टॉप’ने अगदी सुरुवातीपासून कटाक्षाने पाळले. त्यासाठी विविध पदार्थाचा निश्चित फॉम्र्यूला निश्चित केला. त्या फॉम्र्यूलाबरहुकूम पदार्थ बनलाय की नाही, याची नेमलेले तज्ज्ञ चाचणी करतात, त्यानंतरच तो पदार्थ दुकानात विक्रीसाठी उपलब्ध होतो. अगदी दिवाळीसारख्या नेहमीपेक्षा कितीतरी पटीने अधिक मागणी असतानाच्या काळातही या पद्धतीत बदल होत नाही. ‘टीप-टॉप’चे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे पॅकेजिंग. बाजारहाटीची नवी संस्कृती लक्षात घेऊन त्यानुसार अत्यंत आकर्षक पद्धतीचे पुडे ‘टीप-टॉप’ने मिठाईसाठी वापरले. दरवर्षी त्याची रंगसंगती आणि आकार बदलले जातात.
गुजरातमध्ये लोकप्रिय असलेला उंधियो हा पदार्थ ‘टीप-टॉप’ने पहिल्यांदा ठाण्यात आणला. त्याला गुजराती समाजाने चांगला प्रतिसाद दिलाच, पण त्याचबरोबर इतर ठाणेकरांनीही या पदार्थाला दाद दिली. होळी सणानिमित्त सेवन केली जाणारी थंडाई ‘टीप-टॉप’ने द्यायला सुरुवात केली. त्यामुळे धुळवडीच्या दिवशी संपूर्ण ठाण्यात अघोषित संचारबंदी असली तरी टीप-टॉपची दुकाने मात्र खुली असतात. सँडविच ढोकळा हा असाच एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार. ढोकळा आणि इडलीचे फ्यूजन असलेल्या या सँडविचच्या मध्यभागी हिरवीगार चटणी असते. टीप-टॉप’चा ‘अक्रोड हलवा’ही प्रसिद्ध आहे.
शहरातील मिष्ठांन्नांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यांनंतर रोहित शहा यांनी संपूर्ण भोजन थाळी देणे सुरू केले. विशिष्ट रक्कम भरून भरपेट (अनलिमिटेड) मेजवानीच्या या सशुल्क पंक्ती प्रपंचासही ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. रोहित शहा, त्यांचे भाऊ जयंत, मनोज, मुलगा जयदीप आदी कुटुंबातील सदस्य सध्याचा टीप-टॉपचा कारभार सांभाळतात. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षप्रमाणे शेकडो जणांना टीप-टॉप समूहाने रोजगार दिला आहे.

विवाह सोहळ्यांचे मल्टिप्लेक्स
दशकभरापूर्वी नव्या ठाण्यात एकाच ठिकाणी अनेक चित्रपट पाहण्याची सोय असणारी बहुसिनेमागृह संस्कृती (मल्टिप्लेक्स) रुजत असताना त्याच काळात २००४ मध्ये ‘टीप-टॉप’ने नव्या आणि जुन्या ठाण्याच्या सीमारेषेवर तीन हात नाक्याजवळ टीप-टॉप प्लाझा नामक भव्य मॅरेज मल्टिप्लेक्स उभारले. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील या भव्य वास्तूत लग्न सोहळ्यासाठी उपयुक्त लहान-मोठे दहा सभागृह उपलब्ध आहेत. किमान ५० ते कमाल दोन हजार माणसांची सोय होऊ शकेल, असे विविध आसन क्षमतेची सभागृहे या सात मजली इमारतीत आहेत. एकाच इमारतीत इतक्या संख्येने सभागृह असणारी ही राज्यातील बहुधा एकमेव इमारत असावी. याशिवाय ७२ निवासी कक्ष आहेत. ‘टीप-टॉप’च्या या प्लाझा अवताराने ठाणेकरांना प्रथमच तारांकित हॉटेलची सुविधा उपलब्ध करून दिली. बहुतेक ठिकाणी विवाहासाठी सभागृहासोबत केवळ जेवणाची सोय असते. ‘टीप-टॉप प्लाझा’ने त्यापलीकडे जात लग्नपत्रिका, मंडावळ्या, रुखवातीचे सामान, नववधूच्या हातावर मेंदी काढण्यासाठी लागणारे कसबी कलावंत, पारंपरिक वेशभूषा, सनई-चौघडा, भटजी हे सर्व उपलब्ध करून दिले आहे. जेवणाच्या चवीची कल्पना यावी म्हणून मेन्यू ठरविण्यापूर्वी वर आणि वधू दोन्ही पक्षातील एक-दोघांना हॉलचे व्यवस्थापक एखाद्या कार्याच्या वेळी मुद्दामहून बोलावून घेतात. ‘टीप-टॉप’ने खाद्य महोत्सव भरवून या चव चाचणीला अधिक व्यापक स्वरूप दिले आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आगामी लग्नसराईतील नियोजित वधू-वरांच्या प्रतिनिधींना त्यांचा मेन्यू ठरविता यावा म्हणून ‘टीप-टॉप’ प्लाझामध्ये भव्य खाद्य महोत्सव भरविला जातो. त्यात ठाण्यातील अनेक प्रतिष्ठितांनाही आमंत्रित केले जाते. पूर्वी एकदाच हा खाद्य महोत्सव भरविला जात असे. मात्र प्रतिसाद वाढू लागल्याने आता ऑक्टोबर महिन्यात दोनदा असा खाद्य महोत्सव आयोजित करावा लागत असल्याची माहिती रोहित शहा यांनी दिली. एका खाद्य महोत्सवात किमान दोन हजार माणसे उपस्थित असतात. या खाद्य महोत्सवात स्टार्टरचेच इतके प्रकार असतात, ती बहुतेक खवय्यांचे पोट मेन कोर्सच्या कक्षात शिरण्यापूर्वीच भरते. या खाद्य महोत्सवातच वऱ्हाडी मंडळी आपापल्या लग्नातील मेन्यू ठरवितात. भारतातील जवळपास सर्वच प्रांतातील खाद्य पदार्थ ‘टीप-टॉप’मध्ये उपलब्ध आहेत.

नव्या पिढीचा डेस्टिनेशन वेिडगकडे असलेला ओढा लक्षात घेऊन आता लोणावळ्यात दुसरे ‘टीप-टॉप प्लाझा’ उभारीत आहोत. या ठिकाणीही लग्न सोहळ्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातील. त्यानिमित्ताने ‘टीप-टॉप’ प्रथमच ठाण्याबाहेर सीमोल्लंघन करणार आहे. मिठाईतल्या साखरेप्रमाणे जिभेवरही गोडवा ठेवला. त्यामुळे दुधात साखर तसे ठाणे शहराच्या संस्कृतीचा एक भाग होऊ शकलो, असे मला वाटते.
– रोहित शहा, टीप-टॉप समूह.

 

– प्रशांत मोरे

Story img Loader