ठाणे : शहरातील २२ वर्षीय आर्यन देवळेकर या तरुणाची लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा निवड मंडळाच्या परिक्षेत पहिच्याच प्रयत्नात यश मिळाले आहे. आसाम रेजिमेंट येथे आर्यनची लेफ़्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. येवढ्या कमी वयात आर्यनला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरावर कौतूक केले जात आहे.
आर्यनचे बालपण ठाण्यात गेले आहे. त्याचे शिक्षण ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत पूर्ण झाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आर्यनने सेवा निवड मंडळाची परिक्षा दिली. या परिक्षेत आर्यनला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले आहे. यानिमित्त आर्यनच्या शाळेत त्याचा कौतूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्याच्या शिक्षकांनी आर्यनच्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. आर्यनचे चेन्नई येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून ८ मार्च रोजी त्याची आसाम रेजिमेंट येथे लेफ़्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे.
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कौतुक सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, लेफ़्टनंट आर्यन देवळेकर म्हणाला की, मुलांनी स्वप्न बघितले पाहिजे कारण स्वप्न नक्की पूर्ण होतात मी देखील असेच स्वप्न पहिले आणि परिश्रम घेतले आणि आज लेफ़्टनंट झालो. सुरुवातीपासूनच शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांची साथ मिळाली म्हणून मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो असे सांगून शाळेतील जुन्या आठवणींना त्याने उजाळा दिला. या सोहळ्याला पी. ई. सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती यादव, हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक दादा कर्णवर, संस्थेच्या सभासद रेखा वाघ, तसेच आर्यनचे पालक हर्षद आणि मानसी देवळेकर उपस्थित होते.