बदलापूरः ऑनलाईन माध्यमातून सहजरित्या पैसे कमावण्याच्या जाहिरातींचा समाजमाध्यमांवर पूर आला असून याला बळी पडून अनेक नागरिकांना लाखोंचा गंडा घातला जात असल्याचे समोर आले आहे. सोबतच ऑनलाईन वस्तू खरेदी, ऑनलाईन माध्यमातून चांगला परतावा आणि कार्य पूर्ती करण्याच्या नव्या प्रकारांचा समावेश आहे. गेल्या सात दिवसात परिमंडळ चारमध्ये सात प्रकरणांमध्ये तब्बल २३ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाईन अमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून केले जाते आहे.
बदलापूर पश्चिमेत राहणाऱ्या कोमल कोलते यांना आरोपी अर्शिता शर्मा, ऐश्वर्या महिला आणि शुक्ला टिचर नावाच्या इसमानेप्रवासासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या गुगल मॅपवर अभिप्राय लिहण्याचे कार्य पूर्ण करण्याचे काम सांगितले. त्या मोबदल्यात चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून त्यांच्या खात्यातून ११ लाख ३८ हजार रूपये वळते करून फसवणूक केली. अशाच दुसऱ्या प्रकरणात अंबरनाथ शहरातील प्रगती सिंग या महिलेला युट्युबवर व्हिडीओला लाईक्स देण्याच्या मोबदलण्यात चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले. पैसे मिळवण्याच्या नादात त्यांना २ लाख ८५ हजार ९०० रूपये गमवावे लागले. त्यांना टेलिग्रामवर व्हिडीओ पाठवून ते लाईक करण्यास सांगण्यात आले होते. पैसे मिळवण्यासाठी पुढे फिर्यादी यांना एका खात्यावर एक हजार रूपये पाठवायला सांगितले. त्यानंतर पैसे मिळतील पण आधी खात्यावर पैसे पाठवा असू सांगून ३० हजार ९००, ५९ हजार ३९ हजार आणि ५० हजार खात्यात टाकण्यास सांगितले. बदलापूर पूर्वेत अशाच प्रकरणात प्रतिक्षा कवचे या तरूणीला मोबाईलवर लेख वाचण्याचे पैसे देण्याचे अमिष दाखवले. काही लेख वाचल्यानंतर त्यांना काही पैसे पाठवण्यात आले. मग फिर्यादी यांना पैसे पाठवण्याचे सांगून अधिकचा परतावा देण्याचे अमिष दाखवून १ लाख ८५ हजार रूपयांचे फसवणूक केली.
हेही वाचा >>>मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा शरद पवारांना पाठिंबा
बदलापुरातच शैलेशकुमार शहा यांना टीम वीवर ऍप सुरू करून ऑनलाईन विजबिल भरण्यास सांगितले. हे करत असताना त्यांच्या खात्यातून ३ लाख ६७ हजार ७६० रूपये काढून फसवणूक केली. अंबरनाथच्या निलेश देशपांडे यांना ऑनलाईन कार्य देऊन ते पूर्ण केल्यानंतर पैशांचे अमिष दाखवून ९० हजारांना लुबाडण्यात आले. त्यांना दिड लाख रूपये भरण्यास सांगितल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळले. तर अंबरनाथ पूर्वेतच विनी रोहेरा यांना इंस्टाग्रामवरून शर्ट विकत घेणे महागात पडले आहे. घेतलेला शर्ट कुठेतरी रखडला असून तो मिळवण्यासाठी सहा रूपये ऑनलाईन लिंकवर देण्यास त्यांना साांगितले. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र काही वेळात त्यांच्या खात्यातून पाच वेळा २० हजार रूपये असे एक लाख वळते झाले. विठ्ठलवाडीत एका अशाच फसवणुकीच्या प्रकरणात ऑनलाईन माध्यमातून घर भाड्याने देणे तब्बल दिड लाखाला पडले आहे. या सर्व प्रकरणांत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमुळे ऑनलाईन व्यवहार जपून करण्याचे आवाहन वारंवार करूनही नागरिक मोहात पडत असल्याचे दिसून येते आहे.