खा. असदुद्दीन ओवेसी यांचे आवाहन
काँग्रेस, भाजप पक्षांकडे विकासाचे धोरण आणि कार्यक्रम नाही. ७० वर्षे काँग्रेसने आणि अलीकडच्या काळात भाजपने लोकांना विकासाच्या नावाखाली फसवले. या लोकांच्या विरोधात आत शांत बसून नव्हे, तर पेटून उठून लढण्याची गरज आहे. जनतेने भूलथापा मारणाऱ्या भाजप, काँग्रेससह शिवसेना पक्षाला विसरावे, असे आवाहन ‘एमआयएम’चे अध्यक्ष खा. असदुद्दिन ओवेसी यांनी रविवारी कल्याण येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत केले.
कोळी बांधवांची पारंपरिक टोपी घालून खा. ओवेसी यांनी भाषण केले. भारतीय रिपलब्किन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर, आमदार वारिस पठाण उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना देऊन सर्वाना जगण्याचे समान हक्क दिले. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. मोदी, फडणवीस आपणास न्याय देतील असा तुमचा विश्वास असेल तर तो भ्रम आहे. तुमच्या मतांवर हे लोक राज्य करून तुमच्या मुलांना तुरुंगात टाकत आहेत. या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवाल तेवढे तुम्ही फसाल, असे ओवेसी यांनी स्पष्ट सांगितले. या यशासाठी प्रकाश आंबेडकर यांना साथ द्या. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचा पाडाव केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा काय मामला आहे ते समजत नाही. ते मोदींना एवढे का घाबरतात, असा प्रश्न ओवेसी यांनी केला.
संघप्रणीत भाजप सरकार केंद्रात संविधानाच्या माध्यमातून सत्तेवर आले. बहुमत नव्हते तोपर्यंत त्यांनी सहकाराची भाषा केली. चार वर्षांपूर्वी बहुमत मिळताच भाजपने आपले खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली. असे हे केंद्रातील बहुरंगी सरकार आता उखडून फेकले पाहिजे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.