महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले असतानाच, त्यापाठोपाठ महापालिका क्षेत्रातील आशा वर्कर्सना पाच हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून विनाविलंब हे अनुदान खात्यात जमा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर १७ लाख रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे.
ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान नुकतेच जाहीर झाले. याबाबत कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याबरोबर ऑनलाइनद्वारे चर्चा करून ही घोषणा केली होती. गेल्यावर्षीपेक्षा यंदा अडीच हजार रुपये जास्त रक्कम कर्मचाऱ्यांना मिळाली असून या अनुदानाची रक्कम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी देण्यातही आली आहे. सानुग्रह अनुदानामुळे ठाणे महापालिकेवर सुमारे १४ कोटी इतका अतिरिक्त भार पडला आहे. त्यापाठोपाठ आता महापालिका क्षेत्रातील आशा वर्कर्सना पाच हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ३४६ आशा वर्कर्स आहेत. त्यांच्या शिष्टमंडळाने माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सानुग्रह अनुदानासह काही मागण्या त्यांच्याकडे मांडल्या. त्यावर, मुख्यमंत्री शिंदे यांनी आशा वर्कर्सला पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून विनाविलंब हे अनुदान खात्यात जमा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर सुमारे १७ लाख रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे.