सध्या अक्षरांची वाणी पुढे नेणे अत्यंत आवश्यक आहे. शासन त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहेच, परंतु आपण सर्वानी या कामी सहकार्य करायला हवे, असे मत ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी मैदान, ठाणे येथे आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव २०१४-२०१५ या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ऐतिहासिक साहित्याची परंपरा लाभलेले व मराठीचे मोठे स्थान असलेल्या ठाणे शहरात हा ग्रंथोत्सव होत आहे ही बाब उल्लेखनीय आहे.  ग्रंथोत्सवात होणाऱ्या कविसंमेलन, परिसंवाद कार्यक्रमांतून तरुण, नवकवींना स्वत:ला व्यक्त व्हावेसे वाटणे व तशी संधी त्यांना यामार्फत मिळणे हे कौतुकास्पदच आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास प्रा. अशोक बागवे, मधुकर आरकडे, संभाजी भगत, महेश केळुस्कर, अनंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी केले .
ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रमानंतर कवी नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त कविता वाचनाने त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमातील मान्यवरांनी या वेळी ढसाळ यांच्या कवितांचे वाचन केले तर कवी अरुण म्हात्रे यांनी नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपीठा’ काव्यसंग्रहातील काही रचना वाचून त्यांना अभिवादन केले. नामदेव ढसाळ हे प्रतिभावान कवी होते. त्यांनी जगण्यातील वास्तवता शिकवली. त्यांची कविता मनाला भावते, अशा भावना नायगांवकर यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा