ठाणे : कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली २६ पाकिटे आढळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु हे प्रकरण खोटे असल्याचा आरोप दिघे यांनी केला. भरारी पथकाने कोपरी पोलीस ठाण्यात आमचे वाहन नेले होते. त्यावेळी त्यांना वाहनात काहीही आढळून आले नव्हते. माझ्याकडे त्यासंदर्भाचे चित्रीकरण आहे असा दावा दिघे यांनी केला आहे.
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहे. दिघे यांच्याविरोधात शिंदे गटातील एका महिला पदाधिकारीने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघे, सचिन गोरिवले, प्रदीप शेंडगे, रविंद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी, ब्रीद यांनी संगनमतकरून सचिन गोरिवले यांच्या वाहनामध्ये मद्य आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे ठेवली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार केदार दिघे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा >>>ठाणे : मतदानाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्याच्या गृहजिल्ह्यात बैठका
याबाबत केदार दिघे यांना विचारले असता, खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. आमचे वाहन भरारी पथकाने तपासण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर आणले होते. त्यावेळी काहीही आढळून आले नव्हते, त्यासंदर्भाचे चित्रीकरण आमच्याकडे आहे असा दावा त्यांनी केला आहे.सत्ताधारी घाबरले असून माझी गाडी मी स्वतःहून पोलीस स्टेशनला नेल्यानंतर त्या गाडीची तपासणी होऊन त्यामध्ये काहीही सापडले नसताना जाणीवपूर्वक माझं नाव गुन्ह्यामध्ये घेऊन मला टारगेट केले जात असल्याचा पलटवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनी केला आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत गावठी मद्य विक्रेत्यांवर पोलिसांच्या धाडी
कोपरी पाचपखाडीत ज्यांनी पैशांचा महापूर आणला आहे, जे साड्या वाटप करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र माझी गाडी तपासतानाचा व्हिडिओ समोर आहे. त्या व्हिडिओमध्ये गाडीमध्ये काही सापडले नाही हे स्पष्ट दिसत आहे. मात्र तरीही जाणीवपूर्वक काल रात्रीच्या घटनेनंतर आज सकाळी गुन्हा दाखल होतो. यामध्ये केवळ मला बदनाम करण्याचा हेतू असून पैशांचा महापूर आणणाऱ्या आणि साडी वाटप करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.