ठाणे – कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १ लाख ५९ हजार ६० मतांनी विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे हे पहिल्या फेरी पासून मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेर फटाके फोडून जल्लोष करायला सुरुवात केली होती. एकनाथ शिंदे यांना १ लाख २० हजार ७१७ इतकी आघाडी मिळाली आहे.
कोपरी – पाचपाखडी विधानसभा मतदार संघातून दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची महत्वाची लढत मानली जात होती. प्रचारा दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार, लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना, महिला सशक्तीकरण, युवांसाठी योजना, वीज सवलत असे मुद्दे एकनाथ शिंदे यांच्या प्रचारात मांडण्यात आले होते.
तर, गद्दार विरुद्ध निष्ठावंत, रक्ताचे आणि खरे वारसदार, वाढलेली महागाई, गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढ, रोजगार, गुजरातला गेलेले प्रकल्प, वाहतूक कोंडी, पाणी टंचाईची समस्या, जाती-धर्माचे राजकारण, असे मुद्दे केदार दिघे यांच्या प्रचारात होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि केदार दिघे यांच्यात चूरशीची लढत होईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु, मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत मुख्यमंत्री शिंदे यांना मोठ्या फरकाने आघाडी मिळाल्यामुळे शिंदे यांचा विजय निश्चित असे चित्र स्पष्ट झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील शिंदे यांच्या घराबाहेर जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.
हेही वाचा >>>मुरबाडमध्ये कथोरेंनी चक्रव्युव्ह भेदले, ५० हजारांहून अधिक मतांची विजयी आघाडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १ लाख २० हजार ७१७ मतांची आघाडी घेत , त्यांचा बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. त्यांना या निवडणुकीत एकूण १ लाख ५९ हजार ६० इतकी मते मिळाली आहेत. तर, उबाठा गटाचे केदार दिघे यांना ३८,३४३ इतकी मत मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे.
याचं मतदार संघातून काँग्रेस चे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे देखील अपक्ष उभे होते. परंतु, त्यांना नोटा पेक्षाही कमी मतांवर समाधान मानावे लागले आहे. या मतदार संघातून नोटाला २ हजार ६७६ इतके तर, मनोज शिंदे यांना १, ६५३ इतके मत पडली आहेत.