उल्हासनगरात कलानींना नाकारले, आयलानींवरच विश्वास; कुमार आयलानी विक्रमी मतांनी विजयी

अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या उल्हासनगर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी सहज विजय मिळवला आहे.

assembly election 2024 Ulhasnagar assembly elections BJP Kumar Ailani wins
उल्हासनगरात कलानींना नाकारले, आयलानींवरच विश्वास; कुमार आयलानी विक्रमी मतांनी विजयी (PC:TIEPL)

उल्हासनगरः अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या उल्हासनगर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी सहज विजय मिळवला आहे. आयलानी ३० हजार ७५४ मतांनी विजयी झाले आहेत. आयलानी यांना ८२ हजार २३१ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे ओमी कलानी यांना ५१ हजार ४७७ मते मिळाली आहेत. यंदा कलानी पिता पुत्रांच्या आक्रमक प्रचारालाही उल्हासनगरच्या मतदारांनी नाकारले. ओमी कलानी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रचारात केंद्रस्थानी ठेवल्याने कुमार आयलानी यांना फायदा झाल्याचे बोलले जाते. गेल्या दोन दशकात उल्हासनगर विधानसभेत आलटून पालटून आमदार निवडून येत होते. मात्र यंदा आयलानी यांनी या परंपरेलाही छेद दिला आहे.

उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत यंदा आमदार कुमार आयलानी यांच्यासमोर कलानी कुटुंबियांचे कडवे आव्हान होते. कुमार आयलानी यांना पहिल्या यादीत स्थान मिळाल्याने त्यांची गच्छंतीच्या चर्चा रंगल्या होत्या. उल्हासनगर शहरात विशेष कामगिरी दाखवू न शकल्याने आयलानी यांच्यावर टीकाही होत होती. यंदा पहिल्यांदा पप्पू कलानी आणि त्यांचा पुत्र ओमी कलानी प्रचारात सक्रीय होते. त्यांनी आक्रमकपणे प्रचारही केला होता. मात्र कलानी पिता पुत्रांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शेवटच्या टप्प्यात कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी यांनी एका कार्यक्रमात केलेले भावनीक भाषण यामुळे कलानी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पुन्हा चर्चेत आली. उल्हासनगर विधानसभेचा भाग असलेल्या वरप, म्हारळ, कांबा या मराठी पट्ट्यात कलानी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीपेक्षा आयलानी बरे अशी प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत होती. या भागात अखेरच्या टप्प्यात मतदानही चांगले झाले. त्यामुळे कुमार आयलानी यांचा मार्ग मोकळ्या झाल्याचे बोलले जाते. पहिल्या फेऱीपासून कुमार आयलानी आघाडीवर होते. अखेर ३० हजार ७५४ मतांनी कुमार आयलानी यांनी कलानी यांना पराभवाची धुळ चारली.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आनंदोत्सव; कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

विक्रमी विजय

गेल्या काही निवडणुकांमध्ये अवघ्या काही मतांनी उमेदवार विजयी होत होते. २००४ च्या निवडणुकीत कुमार आयलानी यांचा २२ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २००९ निवडणुकीत ७ हजार मतांनी आयलानी विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ निवडणुकीत १ हजार ८६३ मतांनी ज्योती कलानी जिंकल्या होत्या. तर २०१९ निवडणुकीत २००४ मतांनी आयलानी जिंकले होते. त्यानंतर आता तब्बल ३० हजार ७५४ मतांनी आयलानी जिंकले आहेत. त्यामुळे हा मोठा विजय असल्याचे मानले जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assembly election 2024 ulhasnagar assembly elections bjp kumar ailani wins amy

First published on: 23-11-2024 at 16:12 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या