डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील कृष्णा टाॅवरच्या बाजूस आणि पालिका पाण्याच्या टाक्यांच्या समोरील भागात सार्वजनिक वर्दळीचा रस्ता बंद करून एका सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम भूमाफियांनी सुरू केले आहे. या बेकायदा बांधकामांविषयी स्थानिक रहिवासी, जागरूक नागरिकांच्या पालिकेतील तक्रारी वाढल्याने पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी बांधकामधारकांना नोटीस बजावली आहे.
या नोटिसीप्रमाणे बांधकामधारकांनी जमिनीची मालकी, इमारत बांधकाम परवानगीची कागदपत्रे येत्या तीन दिवसात म्हणजे शुक्रवारपर्यंत पालिकेत सादर करायची आहेत. तोपर्यंत बांधकाम तातडीने बंद करून याठिकाणी कोणताही विक्री व्यवहार करण्यास साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना नोटिसीव्दारे प्रतिबंध केला आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत अल्पवयीन कामगाराचा शॉक लागून मृत्यू
चरू बामा म्हात्रे शाळेमागील सोसायट्या आणि कृष्णा टाॅवर भागातील अनेक रहिवासी बेकायदा इमारत सुरू असलेल्या मोकळ्या जागेवरून यापूर्वी येजा करायचे. या मोकळ्या भूखंडावर दोन महिन्यापूर्वी भूमाफियांनी इमारत बांधणीसाठी खड्डा खोदला. या इमारतीमुळे आजुबाजुच्या इमारतींचे येण्या जाण्याचे मार्ग बंद झाले. तसेच इमारत पूर्ण झाली तर घरात काळोख पसरण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात होती. याविषयी माहिती कार्यकर्ते विनोद जोशी यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे तक्रार केली होती.
या बेकायदा इमारतीवर कारवाई केली नाहीतर मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा तक्रारदार विनोद जोशी यांनी दिला होता. या तक्रारीनंतर साहाय्यक आयुक्त सावंत यांनी कोपर मधील कृष्णा टाॅवरच्या जवळ सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांची पाहणी केली. या इमारतीच्या ठिकाणी हजर असलेल्या कामगाराला साहाय्यक आयुक्त सावंत यांनी येत्या तीन दिवसात या इमारतीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. पालिका अधिकारी येताच कामाच्या ठिकाणचे माफिया पळून गेले.
या बेकायदा इमारतीचे काम चौबे नावाचा इसम आणि एका लोकप्रतिनिधीच्या मुलाच्या आशीर्वादाने सुरू असल्याची माहिती परिसरातील रहिवाशांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिली. येत्या तीन दिवसात भूमाफियांनी या बांधकामाची कागदपत्रे सादर केली नाही तर ते बांधकाम तातडीने भुईसपाट केले जाईल, असे साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा >>>आनंद नगर, मुलुंड कचराभूमीवर कलाकेंद्र आणि रुग्णालय बनवा, मुलुंड ठाण्याच्या वेशीवरील रहिवाशांचे स्वाक्षरी अभियान
इमारती रडारवर
पावसाळा संपल्याने ह प्रभागातील आता ज्या बेकायदा इमारतींविषयी तक्रारी आहेत. अशा सर्व इमारतींची पाहणी करून त्या इमारतींविषयीची विहित प्रक्रिया पार पाडून त्या इमारती तोडण्याची कारवाई केली जाईल. नवापाडा भागातील पालिका शाळा आणि साईबाबा मंदिराजळील बेकायदा इमारतीची पाहणी करून या इमारतीलाही नोटीस देण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सांगितले.
कोपरमधील चरू बामा म्हात्रे शाळेमागे सुरू असलेल्या बांधकामांची पाहणी करून संबंधितांना त्या बांधकामांची कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कागदपत्रे सादर करण्यास बांधकामधारक अयशस्वी ठरल्यास त्यांचे बांधकाम तातडीने जमीनदोस्त केले जाईल.- राजेश सावंत,साहाय्यक आयुक्त,ह प्रभाग, डोंबिवली.