उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील आणखी एका लाचखोर अधिकारी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडला आहे. बांधकामावर कोणत्याही प्रकारची करवाई न करण्यासाठी व्यावसायिकाकडे लाच मागितल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेतील प्रभाग क्रमांक एकचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांच्यासह प्रभाग समितीचा मुकादम आणि कंत्राटी चालक यांना अटक केली आहे. आरोपी लोकसेवक यांनी ५० हजारांची लाचेची मागणी करून २० हजारांची लाच स्वीकारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाण्यात गारांचा पाऊस

उल्हासनगर महापालिकेत गेल्या काही वर्षात अनेक अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे उल्हासनगर शहरातील आणि विशेषत पालिकेतील भ्रष्टाचार वारंवार चव्हाट्यावर आला आहे. यातच सोमवारी एका बांधकाम कंत्राटदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तासह मुकादम आणि कंत्राटी चालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. प्रभाग समिती एकच्या क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक एकचा प्रभारी मुकादम प्रकाश संकत आणि सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर संकत याने तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारून गोवारी यांचा वाहनचालक असलेल्या कंत्राटी चालक प्रदीप उमाप याला दिली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आणि त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांच्यासाठी पैसे घेतल्याचे सांगितल्याने गोवारी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर उल्हासनगर महापालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा >>> “जर मर्द असाल तर…” संजय राऊतांचं शिंदे गटाला थेट आव्हान; ठाण्यातील प्रकारावर घेतलं तोंडसुख!

कारवाईनंतर वरचे पद ?

उल्हासनगर महापालिकेत भ्रष्टाचाराचा मोठा इतिहास आहे. अनेक प्रभारी अधिकारी लाचखोरीत सापडले आहेत. त्यातील बहुतांश आज प्रभारी म्हणून वरिष्ठ कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. लिपिक, टंकलेखक, विभाग प्रमुख, चालक, मुकादम, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त अशा अनेकांना गेल्या काही वर्षात अटक झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकूनही पुन्हा वरच्या पदावर काम करता येत असल्याने कारवाईची भीती निघून गेली आहे.

भ्रष्टाचाराचा काळा इतिहास

सप्टेंबर २०२२ मध्ये प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी यांच्यासाठी प्रभारी मुकादम रतन जाधव आणि सफाई कामगार विजय तेजी या दोघांनी २५ हजारांची लाच स्वीकारली. यावेळी दोघांना रंगेहात पकडले होते. प्रभाग समिती दोनचे सहायक आयक्त अनिल खतुरानी यांना लाच घेतल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी जानेवारी २०२२ मध्ये निलंबित केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ डिसेंबर रोजी कारवाई करत खतुरानी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. डिसेंबर २०२१ मध्ये वाहन विभागातील कंत्राटी वाहन चालक आण मदतनीस यांना पगार वेळेवर काढून देण्यासह इतर सुविधा देण्यासाठी एका कंत्राटी वाहन चालकाच्या मदतीने लाच घेणाऱ्या वाहन विभाग व्यवस्थापक यशवंत सगळेवर कारवाई झाली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assistant commissioner of ulhasnagar municipal corporation arrested for accepting bribes zws