कल्याण : कल्याण जवळील मोहने येथे मुख्य बाजारपेठेत मागील अनेक वर्षापासून आठवडी बाजार भरतो. या बाजारामुळे मोहने बाजारपेठेसह लगतचे रस्ते विक्रेत्यांनी व्यापले जात होते. या भागातून जाणाऱ्या वाहनांचा रस्ता बंद होता. पादचाऱ्यांना चालणे या भागातून अवघड होत होते. अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील आणि पथकाने सोमवारी या बेकायदा बाजारावर कारवाई करून हा बाजार बंद पाडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बेकायदा आठवडी बाजाराच्या माध्यमातून पालिकेला महसूल मिळत नव्हता. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरातील विक्रेते या आठवडी बाजारात वस्तू विक्रीसाठी येत होते. आठवडी बाजारात स्वस्तात वस्तू मिळतात म्हणून कल्याण, अटाळी, टिटवाळा, आंबिवली, शहाड भागातील नागरिक याठिकाणी खरेदीसाठी येत होते.

मोहने येथील मुख्य बाजारपेठेत बेकायदा आठवडी बाजार भरत असल्याची माहिती अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना मिळाली होती. या बाजारामुळे वाहनांचा मार्ग बंद होत होता. विक्रेते रस्ता अडवून व्यवसाय करत होते. अ प्रभागात एकही बेकायदा बांधकाम, नियमबाह्य कृती होता कामा नये. बेकायदा बाजार भरता कामा नयेत, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे अ प्रभागातील अधिकाऱ्यांना निर्देश आहेत. या आदेशाप्रमाणे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गेल्या महिनाभरात टिटवाळा, मांडा परिसरातील सुमारे ९०० हून बेकायदा बांधकामे भुईसपाट केली.

भूमाफियांना धडा शिकवल्यानंतर साहाय्यक आयुक्त पाटील यांनी आपला मोर्चा अ प्रभाग हद्दीत भरत असलेल्या बेकायदा आठवडी बाजारांकडे वळविला आहे. मोहने येथे सोमवारी संध्याकाळच्या वेळेत साहाय्यक आयुक्त पाटील फेरीवाला हटाव पथक, तोडकाम पथकासह अचानक मोहने आठवडी बाजारात हजेरी लावली. तेथे विक्रेत्यांना काही कळण्याच्या आत हा बेकायदा बाजार हटविण्याची कारवाई केली. रस्ते अडवून बसलेल्या विक्रेत्यांची सामान जप्त करण्यात केले. ठेले तोडण्यात आले. हातगाड्या तोडून टाकण्यात आल्या. कारवाई सुरू होताच अनेक विक्रेते पळून गेले तर काहींचे सामान जप्त करण्यात आले. आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून अ प्रभागाचे अधिकारी ही कारवाई करत असल्याने कोणीही राजकीय नेता, स्थानिक पदाधिकारी ही कारवाई रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे धाडस करत नाही.

मोहने येथे अनेक वर्षापासून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर बेकायदा बाजार भरत होता. या बाजारामुळे या भागातील वाहतूक ठप्प होत होती. पादचाऱ्यांना चालणे अवघड होत होते. आयुक्तांच्या निर्देशावरून या बेकायदा बाजारावर कारवाई करण्यात आली. अ प्रभाग हद्दीत जेवढे बेकायदा आठवडी बाजार भरतात त्या सर्वांवर टप्प्याने कारवाई केली जाणार आहे.
प्रमोद पाटील साहाय्यक आयुक्त,अ प्रभाग.