लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कळवा, मुंब्रा, दिवा, आगासन तसेच घोडबंदर भागात मोठ्या संख्येने उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामाविषयी सातत्याने तक्रारी पुढे असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना ही बांधकामे थांबावीत यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ठाणे शहरात महापालिका प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदविण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यात साहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये. सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ वापरून ही बांधकामे पूर्णपणे तोडण्यात यावीत. कर्तव्यात कसूर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले. अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर भागात नव्याने बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. या बेकायदा बांधकामावर महापालिकेकडून कारवाई होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून ७६९ अनधिकृत बांधकामे आहेत. त्यापैकी ६६३ अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी बीट डायरीत केलेली आहे. ही सर्व बांधकामे, पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरुपाची असली तरी ती तत्काळ तोडून टाकावीत, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता, दबाव आला अशा प्रकारची कोणतीही कारणे न सांगता अनधिकृत बांधकामांचे निष्कासन झाले पाहिजे. त्याची संपूर्ण जबाबदारी साहाय्यक आयुक्तांची राहील. त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळाचे उपायुक्त करतील. मात्र, या कामात कोणतीही हयगय होऊ नये असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आपण कसूर करीत आहोत असे चित्र निर्माण होणे आपल्याला भूषणावह नाही. आपल्या पदनिर्देशित कर्तव्याचे पालन आपल्याला करावे लागेल. न्यायालयांनी त्यासंदर्भात दिलेल्या आदेशांचे विनाविलंब पालन केले जावे. त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

अनधिकृत बांधकामाची बीट डायरीत नोंद झाली की साहाय्यक आयुक्तांनी तेथे स्थळ पाहणी केली पाहिजे. तसेच तोडकाम करताना स्वत: उपस्थित राहिले पाहिजे. अनधिकृत बांधकामात टप्प्याटप्प्याने वास्तव्य सुरू झाले की त्याचे निष्कासन आणखी अवघड होते असेही आयुक्त म्हणाले. या बैठकीत, साहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या पदावर काम करायचे असेल तर सर्व दबाव दूर सारून काम करावे लागेल. अनधिकृत बांधकामांविषयी न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली असून कामाच्या पद्धतीवरही टिपणी केलेली आहे. सबब सांगण्याच्या प्रकारावरही न्यायालयाने आक्षेप घेतला असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.

Story img Loader