उपाहारगृहाच्या मागील वर्षाचे मुल्यांकन टाळण्यासाठी तसेच नवे वस्तू आणि सेवा कराचे खाते काढून देण्यासाठी २० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वस्तू आणि सेवा कर विभागाचा साहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ याला मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांचे घोडबंदर येथील कापुरबावडी भागात उपाहारगृह आहे.
त्यांच्या उपाहारगृहाचे मागील वर्षाचे मुल्यांकन टाळण्यासाठी आणि वस्तू आणि सेवा कराचे नवे खाते काढून देण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभागाचा साहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ याने काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ८ जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी पथकाने सापळा रचून २० लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना शिरसाठ याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.