ठाणे : वयाचे ७७ वे वर्ष म्हणजे आपल्या कुटुंबियांच्या समवेत राहून आराम करण्याचे दिवस, अशी साचेबद्ध वयाची व्याख्या मोडून काढत कल्याण मधील अनुपमा ताम्हाणे यांनी अंध व्यक्तींना ब्रेल लिपी शिकवण्याचे व्रत स्वीकारले. कल्याण मधील अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत अनुपमा ताम्हाणे या वयाच्या ७७ व्या वर्षीही अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपी शिकवण्यासाठी जात असून सर्वांसाठी त्यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. तर या कार्यात आता त्यांनी त्यांची नात आणि नातवाला देखिल सहभागी करून घेतले होते.

विविध शहरात अनेकजण सामाजिक कार्याचा वसा हाती घेत समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. यामध्ये अवयवदान, नेत्रज्ञान, शैक्षणिक मदत, आर्थिक मदत अशा विविध समाजकार्याचे काम संस्था आणि नागरिक करत असतात. त्यांचे हे कार्य सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरते. याच पद्धतीने अंध व्यक्तींसाठी काहीतरी करावे या हेतूने कल्याण येथील अनुपमा ताम्हाणे यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी ब्रेल लिपी शिकून अंध विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निश्चय केला. १५ मे २०१३ ला त्यांनी ब्रेल लिपी शिकवण्यास सुरूवात केली. यात त्यांचे मार्गदर्शन संपदा पळणीरकर यांनी केले. अवघ्या दोन महिन्यात त्यांनी ब्रेल लिपी आत्मसात केली. यामध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही ब्रेल लिपी त्या शिकल्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ब्रेल लिपीत प्रश्नोत्तरे लिहिणे, त्यांना धडे वाचून दाखवणे, गणिते सोडवून घेणे यासह आर्थिक मदत करू लागल्या. कल्याण येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) येथे त्या स्वयंसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी एका विद्यार्थ्यासाठी तब्बल चार वर्षे ब्रेल लिपीत प्रश्नोत्तरे लिहून देण्याचे काम ही केले. संगणक ज्ञान नसतानाही त्यांनी संगणकावर ब्रेल लिखाण सुरू केले आणि सहावी ते आठवीच्या भूगोल, इतिहास विषयाच्या प्रश्नोत्तरांचे लेखन केले. त्या वयामानानुसार दररोज जाणे होत नसले तरी महिन्यातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत त्या करत असतात.

अनुपमा ताम्हाणे या आता अनाथाश्रम, वृद्धाश्रम, गतिमंद मुलांच्या आश्रमशाळा, अशा अनेक संस्थांना भेट देऊन त्यांच्या परीने सामाजिक कार्य करित आहे. दधिची देहदान मंडळ, शबरी सेवा समिती, धान्य बँक अशा विविध संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांची नात आणि नातू यांनी शालेय काळात अंध विद्यार्थ्यांना परिक्षेत पेपर लिहण्यासाठी सहाय्यक म्हणुन काम केले.

आता वय वर्ष ७७ असल्याने महिन्यातील ठराविक दिवस संस्थेला भेट देऊन त्यांच्याशी निश्चित संवाद साधते. अंध विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मदतीच गरज असते. या हेतूने हे कार्य करण्यास सुरूवात केली. अनुपमा ताम्हाणे

Story img Loader