बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानक होम प्लॅटफॉर्मच्या उभारणीनंतर फलाट क्रमांक एक आणि दोनवर लोकलचा थांबा मंगळवारपासून बदलण्यात आला आहे.पूर्वीच्या थांब्यापेक्षा आता लोकल कर्जतच्या दिशेने दीड डब्बा पुढे थांबणार आहेत. मंगळवारी याबाबतची उद्घोषणा स्थानकात करण्यात येत होती. मात्र बदललेल्या थांब्यामुळे मंगळवारी प्रवाशांचा गोंधळ उडाला. महिला प्रवाशांनाही लोकलमध्ये जागा पकडण्यासाठी धावपळ करावी लागली.
बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या काही वर्षांपासून होम प्लॅटफॉर्मची उभारणी केली जाते आहे. या होम प्लॅटफॉर्मची उभारणी ऑक्टोबर अखेरीस पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते.मात्र अजूनही होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या होम प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त पादचारी पुलाची उभारणी सुरू आहे. तर होम प्लॅटफॉर्मवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. मात्र होम प्लॅटफॉर्ममुळे कर्जतच्या दिशेने फलाट क्रमांक एक आणि दोनची लांबी वाढली आहे.
हेही वाचा… खंजीर खुपसणाऱ्यांचा माज उतरवू; कल्याणमधील बैठकीत शिवसेना उपनेते विजय साळवी यांचा इशारा
होम प्लॅटफॉर्म उभारण्यापूर्वी फलाट कर्जतच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलापर्यंत नव्हता. आता मात्र पादचारी पुलाला क्रमांक एक आणि दोन असे दोन्हीही फलाट जोडले गेलेले आहेत. त्यामुळे फलाट क्रमांक एक आणि दोनवर उभ्या राहणाऱ्या लोकल गाड्या कर्जतच्या दिशेने दीड डब्बा पुढे नेऊन उभ्या करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मंगळवारपासून याची अंमबजावणी सुरू झाली. सकाळपासूनच लोकल गाड्या पुढे उभ्या करण्याबाबत स्थानकात घोषणा करण्यात येत होती. बदलापूर स्थानकात प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे जागा मिळवण्यासाठी अनेक प्रवासी गाडी थांबण्यापूर्वीच लोकलमध्ये प्रवेश करत असतात.
हेही वाचा… कल्याणमध्ये पत्नी, मुलाची हत्या करणाऱ्या पतीकडून ७०० लोकांची ४० कोटीची फसवणूक
त्यामुळे अशा प्रवाशांची मंगळवारी तारांबळ उडाली. प्रत्येक लोकलचे प्रवाशी बहुतांश प्रमाणात ठरलेले असतात.त्यामुळे जागा पकडणाऱ्या प्रवाशांना कसरत करावी लागली. फलाट क्रमांक एकवरून सुटणाऱ्या मुंबई दिशेच्या लोकल गाड्यांमध्ये मधल्या प्रथम दर्जाच्या डब्यात जाण्यासाठी काही प्रवासी रांग लावत असतात. या प्रवाशांनाही नेमकी कुठे रांग लावावी हे स्पष्ट होत नव्हते. बदललेल्या थांब्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून रेल्वे पोलीस दलाचे जवान फलाट क्रमांक एक आणि दोनवर उपस्थित होते.