डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर कल्याण दिशेकडील बाजुत पंखे नसल्याने प्रवासी घामाघुम होत आहेत. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. विविध भागातून डोंबिवली रेल्वे स्थानकात येणारे प्रवासी फलाटावर आल्यावर पंखे शोधत अंगाची तलखी शमविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चार कल्याण दिशेने पंखे नसल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
फलाटावरील चार ते पाच डबे येत असलेल्या भागात पंखे नाहीत. पंखे असलेल्या भागात उभे राहून लोकल आली की धावत जाऊन फलाटावरील गर्दीमुळे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासी हातामधील रुमाल, पेपराची घडी करून फलाट क्रमांक तीन आणि चारवर कल्याण दिशेने उभे राहून अंगाची तलखी शमविण्याचा प्रयत्न करतात. कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाचही फलाटांवर, तिकीट खिडक्यांच्या ठिकाणी प्रवासी पंखा असलेल्या ठिकाणी झुंडीने उभी राहून थंड हवेचा स्वाद घेतात. असे चित्र फलाटांंवर जागोजागी दिसत आहे. मात्र, फलाट क्रमांक तीन आणि चारवर कल्याण दिशेने चार ते पाच डबे येणाऱ्या ठिकाणी पंखे नाहीत. प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण दिशेकडील बाजु रेल्वेकडून विस्तारित करण्यात आली आहे. या फलाटावर सरकत्या जिन्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. रेल्वे अधिकारी याविषयी उघडपणे काही बोलत नाहीत. या रखडलेल्या कामाचा त्रास फलाट क्रमांंक तीन आणि चारवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो. फलाट क्रमांक तीनवरून मुंबईला जाणाऱ्या धिम्या लोकल धावतात. बहुतांशी प्रवासी या लोकलने प्रवास करत असल्याने प्रवाशांची सर्वाधिक गर्दी फलाट क्रमांक तीनवर असते.
याशिवाय फलाट क्रमांक चारवरून कर्जत, कसारा, आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ, खोपोलीकडे जाणाऱ्या अति जलद लोकल धावतात. दूरवर राहणारा हा प्रवासी अति लोकलला सर्वाधिक प्राधान्य देतो. फलाट क्रमांक चारवर प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. हे प्रवासी घामाघुम होत लोकलची वाट पाहत उभे असतात. फलाट क्रमांक चारवरून अनेक भाजी, दूध विक्रेते प्रवास करतात. अगोदरच अवजड भाजीचे बोजे, दुधाच्या किटल्या उचलून उन्हाने घामाघुम झालेले हे विक्रेते हातामधील टाॅवेलच्या साहाय्याने स्वताला हवा घालत फलाटावर बसलेले असतात. रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण दिशेकडील बाजुला पंखे बसविण्याची तत्परता दाखवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.