डोंबिवली: लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा भाग आणि लोकांसमोर आपले नाव सतत राहावे म्हणून खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी सर्वाधिक वर्दळीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवर १० ते १५ बाकडे आपल्या खासदार निधीतून अलीकडे बसविले होते. या बाकांवर खासदार शिंदे यांच्या सौजन्याने असा स्पष्ट उल्लेख होता. आचारसंहितेचा हा भंग असल्याने रेल्वे प्रशासनाच्या हा विषय ‘लोकसत्ता’ मधील बातमीच्या माध्यमातून निदर्शनास आला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी खासदारांचे नाव असलेल्या भागाला रंग फासून आपले कर्तव्य पार पाडले.
आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय फलक, केंद्र, राज्य शासनांच्या योजनांची माहिती देणारे डिजिटल फलक, राजकीय नेत्यांच्या प्रतीमा निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी झाकून टाकल्या आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल इंडियाची माहिती देणारी स्वयंचलित यंत्रणेची जाहिरात कपडा टाकून ठेवण्यात आली आहे. असे असताना कल्याण लोकसभेचे उमेदवार असताना शिवसेनेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावे डोंबिवली रेल्वे स्थानकात बसविण्यात आलेल्या बाकांवर रेल्वे प्रशासन किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाकड्यावरील खासदारांचे नाव झाकण्याची कृती न केल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत होते.
हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिकेची एमआयडीसीकडील पाणी देयकाची ६५३ कोटींची थकबाकी माफ
काही जाणत्या प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले होते. परंतु, खासदारांचा रोष नको म्हणून रेल्वे अधिकारी त्याकडे काणाडोळा करत होते. ‘लोकसत्ता’ने गुरूवारी यासंदर्भातचे वृत्त प्रसिध्द करताच, रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांची गंभीर दखल घेतली. डोंबिवली रेल्वे स्थानकातील खासदारांच्या नावे बसविण्यात आलेल्या बाकांवरील खासदारांच्या नावाला भगवा रंग लावून त्यांचे नाव झाकून टाकले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे अडीच ते तीन लाख प्रवासी येजा करतात. या रेल्वे स्थानकात सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत प्रवाशांना उभे राहण्यास, चालण्यास जागा नसते. डोंबिवली रेल्वे स्थानकातील मोक्याच्या जागी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी बाकडे बसविले आहेत. परंतु या बाकांच्या मध्ये जागा तयार करून गरज नसताना घाईघाईने लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा भाग म्हणून खासदार समर्थकांनी त्यांच्या नावाचे बाकडे डोंबिवली रेल्वे स्थानकात आणून ठेवले आहेत. हे बाकडे खिळ्यांंनी घट्ट रोवले नाहीत. त्यामुळे गर्दीचा लोट आला तर अनेक वेळा हे बाकडे सरकतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा : शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून, हात पाय बांधले; बांधकाम व्यावसायिकाच्या येऊर येथील फार्म हाऊसवर दरोडा
खासदार डाॅ. शिंदे चांगले काम करतात. पण गर्दीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांना बाकांवर बसण्यास वेळ नाही. तेथे उगाच बाकांची अडगळ करू नये. त्यापेक्षा लोकलची गर्दी कशी कमी होईल, प्रवाशांना लोकल डब्यात बसायला कसे मिळेल यादृष्टीने खासदार शिंदे यांनी अधिक प्रयत्न करावेत.
लता अरगडे (अध्यक्षा, उपनगरीय महिला रेल्वे प्रवासी संघटना)