ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातून पश्चिमेकडे येण्यासाठी असलेल्या सॅटीस पुलाच्या जिन्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी पट्ट्यांची पकड गुळगुळीत झाल्याने प्रवासी त्याच्यावरून वारंवार घसरून पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच, अनेक फरशा उघडलेल्या स्थितीत असल्याने प्रवाशांना अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. कल्याण, डोंबिवली तसेच कर्जत, कसारा येथून नागरिक कामानिमित्ताने ठाणे रेल्वे स्थानकात येत असतात. तसेच ठाण्याहूनही लाखो नोकरदार मुंबई तसेच ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईला जात असतात. याचबरोबर ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, घोडबंदर, ढोकाळी अशा विविध भागात खासगी कार्यालयातील नोकरदार वर्ग दररोज प्रवास करतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेस दररोज प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पश्चिमेस सॅटीस पूलावरून पालिकेच्या परिवहन सेवेच्या बस गाड्यांची वाहतूक होते. तसेच सॅटीस पुलाखाली रिक्षाचा थांबा आहे. सॅटीस पुलाखाली जाण्यासाठी दोन जिने आहेत. या जिन्यावरील पायऱ्यांवर प्रवाशांना चालताना पकड बसावी यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्या गुळगुळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच जिन्यावरील अनेक फरशी तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे लोखंडी पट्टीवर आणि फरशी खोल गेलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे या जिन्यावरून प्रवास करताना अनेक प्रवासी पाय घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातून पश्चिमेस सॅटीस पुलाखाली रिक्षा पकडण्यासाठी जात असतो. या जिन्यावर लावण्यात आलेल्या पायऱ्यांची निसरड्या झाल्याने त्यावरून पाय घसरतो. – आरोही शिंदे, प्रवासी

ठाणे रेल्वे स्थानक पश्चिमेस जाण्यासाठी असणाऱ्या जिन्यावरून दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना जिन्यावरून जात असताना पाय घसरून पडू नये, पकड बसावी यासाठी पायऱ्यांवर लोखंडी पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र या पायऱ्यांवर असणाऱ्या लोखंडी पट्ट्या गुळगुळीत झाल्या आहेत. या लोखंडी पट्ट्या निसरड्या अवस्थेत असल्याने अपघात होत असतात. तरी संबंधित प्रशासनाने यावर लक्ष देऊन ते सुस्थितीत करावे. – नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था

या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाशी वारंवार संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader