ठाणे : गेले काही दिवस विविध बांधकामे, दुरुस्त्या आणि अस्वच्छतेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाला बकाल रूप आले आहे. फलाटांवर आणि स्थानकाबाहेर गोण्यांमधील राडारोडा, पावसामुळे स्थानक परिसर चिखलमय झाला आहे. तर, पादचारी पूल, विश्रांतीगृह आणि तिकीट खिडक्यांलगत गर्दुल्ले, भिक्षेकरुंनी ठाण मांडल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले काही दिवस स्थानकात पादचारी पुलांची उभारणी सुरू आहे. तर काही पुलांच्या दुरुस्तीची कामे केली जात आहेत. फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले. स्थानकाच्या पूर्वेला तिकीटघर तोडून सॅटीस पुलाची निर्मिती केली जात आहे. सध्या या साऱ्या अडथळ्यांना पार करून प्रवाशांना उपनगरी गाड्या पकडाव्या लागत आहेत.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

बांधकामातील टाकाऊ साहित्य (राडारोडा) स्थानक परिसरात गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आला आहे. फलाट क्रमांक दोनजवळील विश्रांती कक्षाच्या मागील बाजूस राडारोड्याने भरलेल्या गोण्यांचा ढीग रचण्यात आला आहे. याच भागात विटा, खडी इतरत्र विखुरलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून प्रवासी तिकीट घराच्या दिशेने जातात. सध्या राडारोड्याच्या गोण्या प्रवाशांसाठी अडथळा ठरू लागल्या आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे स्थानक भागात पाणी तुंबले होते. त्यातून सध्या प्रवाशांना वाट काढावी लागत आहे.

फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या विटा, तसेच काही राडारोडा फलाटावर ठेवण्यात आला आहे. शिवाय स्थानकातील पादचारी पुलांलगत दुपारच्या वेळेत भिक्षेकरुंचा वावर वाढत चालला आहे. अनेकदा भिक्षेकरू फलाट क्रमांक दोन येथे असलेल्या विश्रांती कक्षातही शिरकाव करीत आहेत.

हेही वाचा : डोंबिवलीत फडके रस्त्यावरील झाड कोसळले, जीवित हानी नाही

रोज आठ लाख प्रवासी

ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वे आणि नवी मुंबईत जाण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गाच्या रेल्वेगाड्यांची वाहतुक होत असते. ठाणे शहरात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ठाण्यासह कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, मुलुंड, नाहूर, भांडूप या भागातील प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकात येतात. त्यामुळे स्थानकातून दररोज सुमारे सात ते आठ लाख प्रवाशी प्रवास करतात.

हेही वाचा : कल्याण: लोकलमध्ये लंपास झालेले दागिने पुन्हा मिळाले

काही दिवसांपासून स्थानक परिसरात राडारोडा पडून आहे. पादचारी पुलांवर भिक्षेकरुंचा वावर आहे. त्यामुळे स्थानक विद्रुप होत आहे. – रमेश लिहिनार, प्रवासी.

प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठिकाणी राडारोड्याचे ढिगारे नाहीत. कामे प्रगतीपथावर आहेत. हे ढिगारे हटवून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत. – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At thane railway station passengers struggle due to mud heaps of sacks css
Show comments