ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांचा भार वाढला असून वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमध्ये रिक्षा अडकून पडत असल्यामुळे सायंकाळच्या वेळी घरी परतणाऱ्या प्रवाशांना रिक्षा मिळणे कठीण होत आहे. रिक्षाची वाट पाहात प्रवाशांना एक तास थांब्यांवर ताटकळत उभे रहावे लागत असल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात सार्वजनिक वाहतूकीसाठी टिएमटीच्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. परंतु पुरेशा बसगाड्या नसल्याने अनेकजण शेअर रिक्षाने प्रवास करतात. ठाणे स्थानकातील गावदेवी तसेच तलावपाळी परिसरात वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर या भागात जाणाऱ्या शेअर रिक्षांचे थांबे आहेत. या थांब्यांवर गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… दिवाळीच्या मुहूर्तावर कल्याण फुलबाजार तेजीत ! झेंडू सह सर्व फुलांना उत्तम भाव असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

सध्या दिवाळीचा कालावधी असल्यामुळे शहरातील मुख्य बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. खरेदीसाठी अनेकजण स्वत:चे खासगी वाहन घेऊन घराबाहेर पडत आहे. यामुळे रस्त्यांवर वाहनांचा भार वाढला आहे. राम मारुती रोड, गावदेवी परिसर तसेच जांभळी नाका बाजारपेठेत मोठ्यासंख्येने नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. तर, राम मारुती मार्ग आणि गावदेवी परिसरातून शहरातील विविध ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक होत असते. परंतू, याठिकाणी सध्या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंद गर्दी असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडी रिक्षा बराच वेळ अडकून पडत आहेत. यामध्ये वेळ आणि इंधन खर्च होत आहे. त्यामुळे अनेक रिक्षा चालक सायंकाळच्या वेळी रिक्षा बंद ठेवत असल्याची माहिती ठाण्यातील एका रिक्षा चालकाकडून देण्यात आली. सायंकाळच्या वेळी रिक्षाचा निर्माण होणारा तुटवड्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. प्रवाशांना सायंकाळच्या वेळी रिक्षासाठी अर्धा ते एक तास तात्कळत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत असून प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.

हेही वाचा… ऐन दिवाळीत बदलापुर, अंबरनाथमध्ये पाण्याचा ठणठणाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोंडी नसलेल्या मार्गाचे भाडे स्विकारले जाते

सध्या दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमध्ये बराच वेळ वाहन अडकून पडत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण रिक्षाचे असते. रिक्षा कोंडीत अडकत असल्यामुळे स्थानक परिसरात प्रवाशांना लवकर रिक्षा उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे. आधीच रिक्षांचा तुटवडा त्यात, अनेक रिक्षा चालक कोंडीत अडकू नये यासाठी ज्या ठिकाणी कोंडी होते त्या मार्गावरचे भाडे स्विकारत नसल्याची माहिती समोर आली आहे.