बदलापूर: गेल्या वर्षात शेवटच्या काही महिन्यात मुंबई आणि उपनगरात हवेचा दर्जा खालावल्याचे दिसून आले होते. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही ठाणे जिल्ह्यातील ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी या शहरातील हवेची गुणवत्ता घसरल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी ते ३ जानेवारी या दरम्यान विविध शहरांमध्ये हवेची गुणवत्ता निर्देशांक सरासरी १८० ते ३०० पर्यंत असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीत दिसून आले आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातही अशुद्ध हवेनेच झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यात मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरल्याने दिसून आले होते. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रस्ते धुवून त्यावरील धूळ कमी करणे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विशिष्ट नियमावलीची अमलांबजावणी करण्याची सक्ती करणे, कचरा, धूळ कमी करण्यासाठी उपययोजना करणे अशा गोष्टी करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरून सखोल स्वच्छता मोहीम राबवत आहेत. तशाच सूचना ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या पालिकांना देण्यात आल्या आहेत. कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ यासारख्या नगरपालिकांनाही अशाच सूचना ज्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांचे पालन होत असेल तरी त्यामुळे हवेचा निर्देशांक जिल्ह्यात सुधारत असल्याचे दिसून येत नाही.

हेही वाचा… जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन मातोश्रीवरून यायचे, नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे दिसून आले होते. आता जानेवारीच्या पहिल्या तीन दिवसातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम धोका आणि वाईट प्रकारातच असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपमधून समोर आले आहे. यात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला आहे. बदलापुरात या तीन दिवसात सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० म्हणजे वाईट दर्जाचा होता. तर उल्हासनगर शहरात सरासरी निर्देशांक २३० इतका होता. भिवंडीत हाच निर्देशांक सरासरी २२० इतका होता. तर ठाणे शहरात कासारवडवली येथील हवा तपासणी केंद्रात सरासरी १६० तर उपवन येथील केंद्रात सरासरी २६० निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हवा तपासणी केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरल्याचेच दिसून आले आहे.

प्रतिक्रियाः थंडीच्या काळात हवेत धूळ, धूर आणि प्रदुषण विरत नाही. त्यामुळे घरातल्या हवेतही प्रदुषण जाणवते. सध्या बदलापुरात घरातही पीएम २.५ यंत्रावर दररोज सरासरी रात्रीच्या वेळी १५० च्या आसपास आहे. – अभिजीत मोडक, खासगी हवामान अभ्यासक, बदलापूर.

बदलापूर१ जानेवारी – १९६२ जानेवारी – २०३३ जानेवारी – २१८
उल्हासनगर१ जानेवारी – १९८२ जानेवारी – २२८३ जानेवारी – २४८
ठाणे – उपवन१ जानेवारी – २५७२ जानेवारी – ३००३ जानेवारी – २६७
ठाणे – कासारवडवली१ जानेवारी – १५०२ जानेवारी – १६६३ जानेवारी – १८७
भिवंडी१ जानेवारी – २२५२ जानेवारी – २३२३ जानेवारी (उपलब्ध नाही)
कल्याण१ जानेवारी – १३०२ जानेवारी (उपलब्ध नाही)३ जानेवारी – १३०

(आकडेवारी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या ऍपवरून घेतलेली आहे.)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At the beginning of the new year the air quality in the cities of thane badlapur ulhasnagar bhiwandi in thane district has declined dvr