ठाणे : ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या दिघा गाव स्थानकाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रकपत्रिकेतून नाव वगळल्याने ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांसह कार्यक्रमस्थळी जाऊन शक्तिप्रदर्शन केले. याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमलेले होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने त्यांच्यात घोषणाबाजीबरोबरच ढोल-ताशांच्या वादनाची चढाओढ सुरू होती. यामुळे स्थानकात तणावाचे वातावरण होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी दिघा गाव स्थानकाचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रकपत्रिकेत ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचे नाव वगळण्यात आले होते. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा >>>ठाणे : दिघा गाव स्थानकाचे उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न
या स्थानकाचे लोकार्पण होणार असल्याने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते शुक्रवार दुपारपासून स्थानकात ठाण मांडून बसले होते. माजी खासदार संजीव नाईकही त्या ठिकाणी होते. त्यानंतर अचानक दुपारी ३ वाजता खासदार राजन विचारे आणि त्यांचे कार्यकर्ते ढोल-ताशाचे वादन करत स्थानकात शिरले. या ठिकाणी एक मंच उभारण्यात आला होता. त्यासमोर भाजपचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकत होते. त्या मंचावर खासदार विचारे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आले. या ठिकाणी ठाकरे गट आणि भाजपकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही लेझीम आणि ढोल-ताशा पथकाला स्थानकात बोलावले. दोन्ही बाजूने ढोल-ताशाचे वादन सुरू होते.